ind vs sa super 8 match t20 world cup 2026 abhishek sharma drop sanju samson comeback
अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आता थरार वाढला असून भारतीय संघ 'सुपर-८' च्या महत्त्वाच्या लढतीसाठी सज्ज झाला आहे. रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र, या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सलग फ्लॉप ठरत असलेल्या युवा सलामीवीर अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
आपली पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या अभिषेक शर्मासाठी गट फेरी एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरली आहे. सलामीला संधी मिळूनही अभिषेकला तीनही सामन्यांत आपले खाते उघडता आले नाही. सलग तीनवेळा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'करो या मरो'च्या या टप्प्यावर संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे समजत आहे.
अभिषेकच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सॅमसनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात २२ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली होती. अभिषेकच्या तुलनेत सॅमसनचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेता, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक त्याला प्राधान्य देऊ शकतात.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ सामन्यांपैकी भारताने २१, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकातही भारताने ५ वेळा द. आफिकेला धूळ चारली असून २ सामने गमावले आहेत. २०२४ च्या फायनलमध्ये भारताने आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुस-यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.