पार्ल ; वृत्तसंस्था : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना (IND vs SA ODI) बुधवारी खेळेल तेव्हा विराट कोहलीच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा असतील. तो फलंदाजी करो की क्षेत्ररक्षण त्याच्या प्रत्येक हालचालीवर सर्वांचे लक्ष असेल. तर, राहुलच्या कर्णधारपदाची देखील खरी कसोटी असेल.
टी-20 नंतर विराटला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडायचे नव्हते आणि याप्रकरणी बीसीसीआय व त्याच्यात काही गोष्टींवर खटके उडाले. दोन वर्षे विराटला चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे मैदानाबाहेरील गोष्टींना बाजूला सारून चांगली खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत असलेला राहुल मालिकेत कोहलीकडून नक्कीच सल्ला घेईल. नवीन कर्णधार आणि सहयोगी स्टाफ ही मालिका जिंकत 2023 मध्ये भारतात होणार्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी सुरू करेल.
भारताने मजबूत संघासह शेवटची एकदिवसीय मालिका मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. यानंतर दुसर्या फळीतील संघ जुलैला श्रीलंका दौर्यावर गेला होता. राहुलने इंग्लंडविरुद्ध मध्यक्रमात फलंदाजी केली होती. त्यामुळे तो शिखर धवन सोबत डावाची सुरुवात करेल का हे पाहावे लागेल. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर संघात स्थान मिळवणारा ऋतुराज गायकवाडला कदाचित पदार्पणासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागेल.
धवनसाठी हे तीन सामने महत्त्वाचे असतील. कारण, टी-20 संघातील जागा त्याने याआधीच गमावली आहे. कोहली तिसर्या स्थानी उतरेल. तर, चौथ्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यरपैकी एकाची निवड होईल. ऋषभ पंत पाचव्या स्थानी फलंदाजी करेल आणि व्यंकटेश अय्यर सहाव्या स्थानी पदार्पण करू शकतो.
फिरकी गोलंदाजांची जबाबदारी ही युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्यावर असेल. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार जलदगती आक्रमणाची धुरा सांभाळतील. तिसरा पर्याय म्हणून दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा पैकी एकाची निवड केली जाऊ शकते. मोहम्मद सिराजदेखील फिट झाला आहे. गेल्या दौर्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 5-1 असे पराभूत केले होते; पण कसोटी मालिका जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास दुणावला आहे. तेम्बा बावुमाचा प्रयत्न कसोटीतील फॉर्म कायम ठेवण्याचा असणार आहे. जलदगती गोलंदाज मार्को जेन्सेन पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो.
संघ यातून निवडणार : (IND vs SA ODI)
भारत : के. एल. राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन-डी-कॉक, जुबैर हमजा, मार्को जेन्सेन, जान्नेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पारनेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी-वान-डेर-डुसेन, काईल वेरेन्ने.
भारत वि. द.आफ्रिका
स्थळ : पार्ल
वेळ : दुपारी 2 वाजता.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्