स्पोर्ट्स

IND vs SA 5th T20 : धोकादयक डी कॉक-ब्रेविस अक्खेर बाद, बुमराह-पंड्याचा मॅजिक स्पेल

IND vs SA T20 Series : भारताचे लक्ष्य मालिका विजयावर

रणजित गायकवाड

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताकडे सध्या मालिकेत २-१ अशी आघाडी आहे. लखनऊमधील चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे, तर भारताला मालिका खिशात घालण्यासाठी आज विजय अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकला बाद करून दिलेल्या धक्क्यातून दक्षिण आफ्रिकेचा संघ सावरतो न सावरतो, तोच अष्टपैलू हार्दिक पंड्याने यजमानांना दुसरा मोठा झटका दिला आहे. सलग दोन षटकांत दोन सेट फलंदाज बाद झाल्याने आता दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला आहे.

पंड्याची 'चतुर' गोलंदाजी

डावाच्या ११.१ षटकात हार्दिकने आपल्या अनुभवाचा वापर करत एक 'स्लोअर शॉर्ट लेंथ' चेंडू टाकला. डेवाल्ड ब्रेव्हिसने ऑफ स्टंपच्या बाहेरून हा चेंडू ओढून मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग कमी असल्याने तो बॅटच्या वरच्या बाजूला लागून हवेत उडाला. डीप मिड-विकेटला उभ्या असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने उजवीकडे धावत एक सुरेख झेल टिपला आणि ब्रेव्हिसची खेळी संपुष्टात आणली.

डेवाल्ड ब्रेव्हिसची खेळी: ३१ धावा (१७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार)

हार्दिकने पहिल्या षटकातील चुका सुधारत या चेंडूवर अचूक टप्पा आणि उंची राखली. एका बाजूने धावगती वाढत असताना हार्दिक पांड्याने मिळवून दिलेली ही विकेट भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. एकामागून एक दोन सेट फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्याने टीम इंडियाने आता सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

बुमराहचा 'मॅजिक स्पेल'! सेट झालेल्या डी कॉकला जाळ्यात ओढले

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असतानाच, 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का मानले जाते. जेव्हा टीम इंडिया दबावाखाली होती आणि धावांचा पाऊस पडत होता, तेव्हा बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जादूने ही धोकादायक भागीदारी मोडीत काढली.

असा फसला 'डी कॉक'

१०.२ षटकांत बुमराहने आपला अनुभव पणाला लावत एक अत्यंत चतुर 'स्लोअर बॉल' टाकला. चेंडूचा वेग अचानक कमी झाल्याने डी कॉकला त्याचा अंदाज आला नाही आणि त्याने चेंडू थेट बुमराहच्या दिशेने खेळला. बुमराहने कोणतीही चूक न करता आपल्या मांड्यांजवळ आलेला झेल अलगद टिपला.

डी कॉकची खेळी : ६५ धावा (३५ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार)

भारताचा 'संकटमोचक'

डी कॉक बाद झाल्यानंतर तो बुमराहकडे पाहतच राहिला. ३५ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी करून डी कॉक सामन्याचा निकाल भारताच्या हातातून हिरावून नेईल असे वाटत असतानाच बुमराहने भारताला मोठे यश मिळवून दिले. या विकेटमुळे सामन्याचे पारडे पुन्हा एकदा भारताच्या बाजूने झुकले आहे.

वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव घेत क्विंटन डी कॉकने आपले १८ वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक पूर्ण केले.

सलामीचा जोडीदार रिझा हेंड्रीक्स आज धावांसाठी झगडत असताना, दुसऱ्या बाजूने क्विंटन डी कॉकने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव चोरत त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील आपले १८ वे अर्धशतक साकारले. हेंड्रीक्स फॉर्मात नसल्याने डी कॉकला मोठी खेळी करणे गरजेचे होते आणि त्याने नेमकी तीच कामगिरी करून दाखवली. अर्धशतक पूर्ण होताच डी कॉकने बॅट उंचावून प्रेक्षक आणि ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. दक्षिण आफ्रिकेसाठी हे अर्धशतक केवळ वैयक्तिक विक्रम नसून, मोठ्या धावसंख्येसाठी रचलेला एक भक्कम पाया ठरला आहे.

मैदानावर आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. रिझा हेंड्रीक्स आणि क्विंटन डी कॉक या जोडीने डावाची सुरुवात इतकी आक्रमक केली की भारतीय गोलंदाज सुरुवातीला हतबल दिसले.

डी कॉकची चौफेर फटकेबाजी

डावाच्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकने आपले इरादे स्पष्ट केले. त्याने अर्शदीप सिंगला सलग तीन चौकार लगावत डावाला वेग दिला. पण खरा थरार तिसऱ्या षटकात पाहायला मिळाला. या षटकात डी कॉकने अर्शदीपवर तुटून पडत एक षटकार आणि तीन चौकार खेचले. या एकाच षटकात दक्षिण आफ्रिकेने तब्बल २३ धावा वसूल केल्या.

पावरप्लेमध्ये धावांचा ओघ कायम

पहिल्या तीन षटकांच्या वादळानंतरही आफ्रिकेने आपली लय कायम ठेवली. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या षटकात अनुक्रमे ९, ८ आणि ७ धावा घेत त्यांनी धावफलक हलत ठेवला. यामुळे पावरप्ले संपेपर्यंत भारतावर मोठे दडपण निर्माण झाले होते.

हेंड्रीक्सच्या रूपाने भारताला पहिले यश

अखेर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळाले. स्थिर झालेला सलामीवीर रिझा हेंड्रीक्स बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेला ७० धावांवर पहिला झटका बसला. ७ षटकांच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची स्थिती १ बाद ७० अशी झाली.

चक्रवर्तीच्या जाळ्यात हेंड्रीक्स अडकला

दक्षिण आफ्रिकेची जोडी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असतानाच, फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने भारताला पहिले आणि सर्वात महत्त्वाचे यश मिळवून दिले. मात्र, या विकेटची खरी चर्चा रंगली ती शिवम दुबेच्या अविश्वसनीय फिल्डिंगमुळे.

दुबेचा 'वन हॅन्डेड' करिष्मा

डावाच्या सातव्या षटकात (६.३ ओव्हर) वरुण चक्रवर्तीने एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. रिझा हेंड्रीक्सने तो फ्लिक केला, पण त्याचा चेंडूवर ताबा राहिला नाही आणि चेंडू हवेत उडाला. तिथे उभ्या असलेल्या शिवम दुबेने डाव्या बाजूला धावत जात, हवेत झेप घेतली आणि एका हाताने तो चेंडू अलगद टिपला. दुबेचा हा अंदाज पाहून खुद्द गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

धावगतीला लागला ब्रेक

हेंड्रीक्सची खेळी : १३ धावा (१२ चेंडू, १ चौकार)

दुस-यांदा फलंदाजी करताना दव हा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण भारतीय फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय पार चुकीचा ठरवत निर्धास्त फटकेबाजी केली. भारताने २० षटकांत २३१ धावांचा डोंगर उभारत यजमानांची दाणादाण उडवली आहे.

सलामीवीरांची स्फोटक सुरुवात भारताची सुरुवात धडाकेबाज झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची वेगवान भागीदारी करत पाया रचला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने आपल्या फलंदाजीतील स्पष्टता दाखवत मैदानाच्या चोहोबाजूंनी फटके मारले. मधल्या षटकांत लिंडेने संजूला बाद करून आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात परतल्याने आफ्रिकेने कमबॅकचा प्रयत्न केला, पण हार्दिक नावाचे वादळ येणे अजून बाकी होते.

हार्दिक पंड्याचा 'स्वॅग' अन् वेगवान अर्धशतक मैदानात येताच पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. हार्दिक आणि तिलक यांनी अवघ्या १७ चेंडूंत ५५ धावा कुटल्या. विशेषतः लिंडेच्या एकाच षटकात हार्दिकने २७ धावा वसूल करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची लय बिघडवली. हार्दिकने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावल्याने भारताचा धावफलक २३१ च्या पार पोहोचला.

अर्शदीपचा धोका कायम

आता २३१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेसमोर अर्शदीप सिंगचे मोठे आव्हान असेल. दुसऱ्या डावात नवीन चेंडू स्विंग होत असल्याने आणि अर्शदीप दोन्ही बाजूंनी चेंडू वळवण्यात माहीर असल्याने, आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी ही वाट खडतर असणार आहे.

सामन्याच्या अखेरच्या षटकांत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकायला लावणाऱ्या घडामोडी घडल्या. १९ व्या षटकापर्यंत भारताने चांगली मजल मारली होती, पण २० व्या षटकाने खऱ्या अर्थाने रंगत वाढवली. भारताने निर्धारित २० षटकांत २३१ धावांचा हिमालय उभा केला आहे.

अखेरच्या षटकांचा थरार:

१९ व्या षटकात एका चौकारासह ९ धावा मिळाल्यानंतर, साऱ्यांच्या नजरा शेवटच्या षटकाकडे होत्या. २० व्या षटकाची सुरुवातच 'वाईड' बॉलने झाली, ज्यामुळे भारताला अतिरिक्त धाव मिळाली. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने देखणा चौकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत हार्दिक पांड्याला स्ट्राईक दिला.

हार्दिकची विकेट आणि दुबेची एन्ट्री

मोठ्या फटक्यांच्या आशेने हार्दिकने जोरदार प्रहार केला, पण दुर्दैवाने त्याचा चेंडू सीमारेषेवर विसावला आणि भारतला चौथा धक्का बसला. मात्र, मैदानावर आलेल्या शिवम दुबेने येताच धमाका केला. चौथ्या चेंडूवर त्याने गगनभेदी षटकार ठोकला.

नाट्यमय शेवट

पाचवा चेंडू निर्धाव गेला, त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा वाईड पडला. यादरम्यान चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिलक वर्मा दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. मात्र, शिवम दुबेने शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवत खणखणीत चौकार वसूल केला.

या नाट्यमय शेवटच्या षटकामुळे भारताने २० षटकांच्या अखेरीस धावफलकावर २३१ धावा लावत प्रतिस्पर्धी संघासमोर विजयाचे मोठे आव्हान ठेवले आहे.

तिलक वर्मानंतर आता हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर धावांचे वादळ निर्माण केले आहे. संयमी १६ व्या षटकानंतर १७ व्या षटकात हार्दिकने असा काही गिअर टाकला की, अवघ्या १६ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण करून इतिहास घडवला.

१६ व्या षटकात 'शांतता', १७ व्या षटकात 'धडाका'

१६ व्या षटकात आफ्रिकन गोलंदाजांनी काहीसा लगाम लावत भारताला केवळ ८ धावांवर रोखले होते. मात्र, ही शांतता वादळापूर्वीची होती. १७ वे षटक सुरू होताच हार्दिकने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दाखवण्यास सुरुवात केली.

असे गाठले अर्धशतक:

  • दुसरा चेंडू : हार्दिकचा गगनभेदी षटकार

  • तिसरा चेंडू : क्लासिक चौकार

  • पाचवा चेंडू : पुन्हा एक अक्राळविक्राळ षटकार

याच षटकातील पाचव्या चेंडूवर मारलेल्या षटकारासह हार्दिकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीसाठी केवळ १६ चेंडू घेतले, ज्यातून त्याची आक्रमकता स्पष्टपणे दिसून येते.

भारत विशाल धावसंख्येकडे

हार्दिक आणि तिलक या दोघांच्याही नावावर आता अर्धशतके जमा झाली असून भारताने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली आहे. मैदानावर आता फक्त चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत असून भारतीय संघ एका ऐतिहासिक धावसंख्येकडे कूच करत आहे.

भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर आपले आक्रमण सुरूच ठेवले आहे. १४ व्या षटकातील २७ धावांच्या धुलाईनंतर, १५ व्या षटकातही तिलकने आपले वर्चस्व गाजवत शानदार अर्धशतक पूर्ण केले. या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने १५ षटकांतच १७० धावांचा डोंगर उभा केला आहे.

तिलकचे दिमाखदार अर्धशतक

१५ व्या षटकात तिलक वर्मा पूर्णपणे फॉर्मात दिसला. या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत तिलकने आपले अर्धशतक साजरे केले. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तिलकने ज्या पद्धतीने डावाची धुरा सांभाळली, ते पाहून क्रीडाप्रेमींनी त्याचे उभे राहून कौतुक केले.

धावांचा ओघ सुरूच

या षटकात केवळ मोठा फटकाच नाही, तर अत्यंत चपळाईने एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. १ चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांच्या मदतीने या षटकात एकूण १२ धावा आल्या.

१५ षटकाअखेर धावसंख्या: ३ बाद १७० धावा.

सध्या तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या ज्या वेगाने धावा कुटत आहेत, ते पाहता भारत या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार हे निश्चित झाले आहे. शेवटच्या ५ षटकांत भारतीय संघ आता २०० धावांचा टप्पा किती लवकर ओलांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हार्दिक-तिलकचा 'रुद्र अवतार'! १४ व्या कुटल्या २७ धावा

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना रोखण्याचे सर्व प्रयत्न केले, पण हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांच्या झंझावातासमोर त्यांची काहीच डाळ शिजली नाही. सामन्याच्या १४ व्या षटकात या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवत २७ धावा चोपून काढल्या.

तिलकने केली षटकाराने सुरुवात

१४ व्या षटकाची सुरुवातच धमाकेदार झाली. तिलक वर्माने पहिल्याच चेंडूवर गगनभेदी षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेत स्ट्राईक हार्दिक पंड्याकडे दिली आणि त्यानंतर जे घडले ते पाहून आफ्रिकन संघ पुरता हादरला.

हार्दिक पंड्याचा 'पॉवर शो'

उरलेले पाच चेंडू हार्दिकने आपल्या बॅटने गाजवले. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला.

  • तिसरा चेंडू : हार्दिकचा खणखणीत चौकार

  • चौथा चेंडू : चेंडू प्रेक्षकांमध्ये, सलग पहिला षटकार

  • पाचवा चेंडू : पुन्हा एकदा तोच तडाखा, सलग दुसरा षटकार

  • सहावा चेंडू : षटकाची सांगता दणदणीत चौकाराने

सामन्याचे चित्र पालटले

एकाच षटकात २ षटकार आणि २ चौकारांसह हार्दिकने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत केला. या षटकात आलेल्या २७ धावांमुळे भारताची धावगती रॉकेटच्या वेगाने वाढली आहे. आता ही जोडी भारताला एका महाबलाढ्य धावसंख्येकडे घेऊन जात आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत येईल असे वाटत असतानाच, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला आहे. सूर्याच्या विकेटनंतर पुढच्या पाच चेंडूंमध्ये या जोडीने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.

पहिल्या चेंडूवर धक्का, पण पुढे फक्त फटकेबाजी

१३ व्या षटकाची सुरुवात भारतासाठी धक्कादायक होती. पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पंड्या आणि खेळपट्टीवर असलेल्या तिलक वर्माने आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांनी मिळून १३ व्या षटकात तब्बल १६ धावा वसूल करत दडपण झुगारून दिले.

असे होते ते 'धडाकेबाज' षटक:

पहिला चेंडू: सूर्यकुमार यादव बाद (धक्का).

दुसरा चेंडू: हार्दिकचा गगनभेदी षटकार

चौथा चेंडू : तिलककडून चेंडू सीमापार, खणखणीत चौकार

सहावा चेंडू : हार्दिकची सांगता आणखी एका शानदार चौकाराने

पुन्हा मिळवली गती

सॅमसन आणि सूर्या बाद झाल्यानंतर जो धावांचा दुष्काळ पडला होता, तो या एका षटकाने संपवला आहे. तिलक आणि हार्दिकच्या या 'पॉवर-पॅक' फलंदाजीमुळे भारताने सामन्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

भारतीय चाहत्यांच्या नजरा कर्णधार सूर्यकुमार यादववर खिळल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा त्याची बॅट शांत राहिली. दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने सूर्याला आपल्या जाळ्यात अडकवून भारताला मोठा धक्का दिला. सॅमसन पाठोपाठ सूर्याही बाद झाल्याने भारतीय संघ आता अडचणीत सापडला आहे.

बॅट फिरली अन् घात झाला

१३ व्या षटकाची सुरुवात झाली तेव्हा सूर्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. १२.१ षटकांत कॉर्बिन बॉशने टाकलेला लेंथ बॉल सूर्याने इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटवर नीट आला नाही आणि फटका मारताना सूर्याच्या हातात बॅट फिरली. चेंडू हवेत उडाला आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या डेव्हिड मिलरने कोणताही चुकीचा न करता सोपा झेल टिपला.

सूर्याचा धावांचा दुष्काळ कायम

हा केवळ एक विकेट नव्हता, तर सूर्यासाठी तो एक मोठा मानसिक धक्का होता. बाद झाल्यानंतर सूर्यकुमार अत्यंत निराश होऊन मैदानाबाहेर जाताना दिसला. त्याने ७ चेंडूंमध्ये अवघ्या ५ धावा केल्या. गेल्या काही डावांपासून सुरू असलेला सूर्यकुमारच्या धावांचा दुष्काळ या सामन्यातही कायम राहिला आहे.

भारतीय डावाला आक्रमक सुरुवात करून देणारी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी तंबूत परतल्यानंतर भारतीय डावाची गती मंदावली. लागोपाठ विकेट्स पडल्यामुळे धावांचा ओघ आटला असून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे.

सॅमसनची विकेट ठरली टर्निंग पॉइंट

डावाच्या दहाव्या षटकापर्यंत भारतीय संघ सुस्थितीत दिसत होता, मात्र १० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉर्ज लिंडेने संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला. सलामीवीर अभिषेक शर्मा आधीच बाद झालेला असताना, सॅमसनच्या रूपाने दुसरा मोठा धक्का बसला आणि येथूनच भारताच्या धावगतीला खिळ बसली.

पुढील दोन षटकांत 'दुष्काळ'

मैदानावर नवीन फलंदाज आल्यामुळे आणि आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे धावा काढणे कठीण झाले. सॅमसन बाद झाल्यानंतरच्या दोन षटकांत (११ आणि १२) भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही.

११ वे षटक : केवळ ८ धावा.

१२ वे षटक : अवघ्या ६ धावा.

अशा प्रकारे, सॅमसन बाद झाल्यानंतरच्या दोन षटकांत केवळ १४ धावा आल्या. सेट झालेले दोन्ही फलंदाज बाद झाल्याने आता मधल्या फळीवर धावसंख्या वाढवण्याचे मोठे दडपण आले आहे.

10 व्या षटकाअखेर भारत 2 बाद 101 धावा

जॉर्ज लिंडेचा 'मॅजिकल' चेंडू, सॅमसन क्लिन बोल्ड

मैदानावर चौफेर फटकेबाजी करत असलेल्या संजू सॅमसनचा अडसर अखेर दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेने दूर केला. आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून लिंडेने सॅमसनचा असा काही त्रिफळा उडवला की सॅमसनसह प्रेक्षकही थक्क झाले.

नेमकं काय घडलं?

डावातील १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जॉर्ज लिंडेने आपल्या पहिल्याच चेंडूवर (९.१ ओव्हर) कमाल केली. लिंडेने टाकलेला ९० किमी प्रतितास वेगाचा 'फाईटेड' चेंडू मिडल आणि लेग स्टंपच्या रेषेत पडला. संजू सॅमसनने जागा बनवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूच्या लांबीने त्याला पूर्णपणे चकवले.

सॅमसन 'क्लीन बोल्ड'

चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेत निघाला आणि सॅमसनच्या बॅटला चकवून थेट मधल्या यष्टीवर आदळला. यष्टी हवेत उडताच लिंडेच्या आनंदाला पारावार उरला नाही. संजू सॅमसनने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची वेगवान खेळी केली, मात्र एका अप्रतिम चेंडूने त्याच्या या खेळीचा शेवट झाला.

सातव्या षटकाअखेर भारत 1 बाद 76 धावा

सहाव्या षटकाअखेर भारत 1 बाद 67 धावा

भारताला पहिला मोठा धक्का

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताला पहिला मोठा धक्का बसला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा ३४ धावांवर बाद झाला. त्याच्या विकेटने मैदानावर काही काळ गोंधळाचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण केले होते.

डावाच्या सहाव्या षटकात (५.४ षटके) कोर्बिन बॉशने टाकलेला चेंडू अभिषेकच्या बॅटच्या जवळून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात विसावला. विशेष म्हणजे, गोलंदाज बॉश किंवा यष्टीरक्षक डी कॉक यांनी बाद करण्यासाठी फारसे जोरदार आवाहन केले नव्हते. मात्र, पंच वीरेंद्र शर्मा यांनी चेंडू हातात पडताच क्षणाचाही विलंब न लावता बोट वर केले.

अभिषेकचा रिव्ह्यू वाया

स्वतःला 'नॉट आऊट' मानणाऱ्या अभिषेकने तातडीने DRS घेतला. मात्र, 'अल्ट्राएज'मध्ये चेंडू ग्लोव्हजला लागल्याचे स्पष्ट दिसले आणि तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला.

३४ धावांची खेळी संपुष्टात

बाद होण्यापूर्वी अभिषेकने २१ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह ३४ धावांची तुफानी खेळी केली.

सहाव्या षटकाअखेर स्थिती

पहिल्या विकेटसाठी अभिषेक आणि संजू सॅमसनमध्ये ५६ धावांची वेगवान भागीदारी झाली. अभिषेक बाद झाला असला तरी त्याने भारताला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. आता मैदानात संजूची साथ देण्यासाठी कोण येते, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

दक्षिण आफ्रिकेचा हुकमी एक्का मानला जाणारा मार्को जॅनसेन आज भारतीय फलंदाजांच्या निशाण्यावर आला आहे. दुसऱ्या षटकानंतर आता पाचव्या षटकातही अभिषेक आणि संजूने त्याची जोरदार धुलाई केली आहे.

जॅनसेनच्या या षटकात भारतीय जोडीने तब्बल १५ धावा वसूल केल्या. पहिल्या चेंडूवर अभिषेकने एक धाव घेऊन संजूला स्ट्राईक दिली. दुसऱ्याच चेंडूवर संजूने नयनरम्य चौकार ठोकला. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माने बॅक-टू-बॅक चौकार खेचत जॅनसेनची लय पूर्णपणे बिघडवून टाकली.

या षटकात तीन चौकार आणि तीन एकेरी धावा आल्यामुळे भारताने पॉवरप्ले संपण्यापूर्वीच मोठी मजल मारली आहे. भारताची धावसंख्या आता ५ षटकांत बिनबाद ५६ अशी झाली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने केवळ ५ षटकांत पन्नास धावांची भागीदारी पूर्ण करून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले आहे.

तिसऱ्या षटकातील शांततेनंतर चौथ्या षटकात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीचे कसब दाखवत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ऑटनेल बार्टमनची दाणादाण उडवली.

हे संपूर्ण षटक संजू सॅमसनने खेळून काढले आणि आपल्या मनगटाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर देखणे चौकार वसूल केले. त्याच्या या फटकेबाजीमुळे स्टेडियममध्ये 'संजू-संजू' असा एकच जयघोष सुरू झाला. चौथ्या चेंडूवर संजूने धावून २ धावा पूर्ण केल्या, तर दुसरा आणि पाचवा चेंडू निर्धाव गेला. या षटकात संजूने एकूण १४ धावा कुटल्या. यासह भारताची धावसंख्या आता ४ षटकांत बिनबाद ४१ अशी झाली. अभिषेक शर्मानंतर आता संजूनेही हात उघडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सुरुवातीच्या फटकेबाजीनंतर आता खेळाची रंगत अधिकच वाढली आहे. तिसऱ्या षटकात लुंगी एनगिडीने टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या षटकात धावा दिल्यानंतर एनगिडीने आपल्या अनुभवाचा वापर करत तिसऱ्या षटकात चेंडूवर चांगले नियंत्रण मिळवले. या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अभिषेक आणि संजूने प्रत्येकी एक-एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली. मात्र, त्यानंतर एनगिडीने अचूक टप्पा पकडत पुढचे सलग चार चेंडू निर्धाव टाकले.

या षटकात केवळ २ धावा आल्या. जरी हे षटक गोलंदाजाच्या दृष्टीने यशस्वी ठरले असले, तरी भारतीय सलामीवीरांनी आपली विकेट राखून ठेवली आहे.

भारताची धावसंख्या ३ षटकांत बिनबाद २७

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चौकारांची आतिषबाजी करणाऱ्या अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

अभिषेकने अवघ्या ५२८ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठून कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे, आजच्या सामन्यात फॉर्मात असलेल्या संजू सॅमसननेही हार्दिक पंड्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारतासाठी सर्वात जलद १००० टी-२० धावा (चेंडूंच्या संख्येनुसार)

१. अभिषेक शर्मा : ५२८ चेंडू

२. सूर्यकुमार यादव : ५७३ चेंडू

३. हार्दिक पांड्या : ६७९ चेंडू

४. संजू सॅमसन : ६७९ चेंडू

५. के. एल. राहुल : ६८६ चेंडू

६. तिलक वर्मा : ६९० चेंडू

भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला असून दुसऱ्याच षटकात आफ्रिकन गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मार्को जॅनसेनचे भारतीय फलंदाजांनी जंगी स्वागत केले. या षटकात त्याची अक्षरशः धुलाई झाली. अभिषेक शर्माने जॅनसेनच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार ठोकून मैदानात एकच खळबळजनक वातावरण निर्माण केले.

षटकाचा चौथा चेंडू निर्धाव पडल्यानंतर पाचव्या चेंडूवर अभिषेकने एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळताच संजू सॅमसनने आपल्या क्लासिक शैलीत एक संयमी षटकार खेचला. या षटकात भारताने तब्बल १९ धावा वसूल केल्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या बिनबाद २५ असून, भारतीय सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच मानसिक दबाव निर्माण केला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक सामन्याला दणक्यात सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी सावध पण आश्वासक सुरुवात केली.

एनगिडीचे पहिले षटक

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने आक्रमणाची धुरा सांभाळत पहिले षटक टाकले. युवा फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक शैलीची झलक दाखवत या षटकात एक नयनरम्य चौकार ठोकला. त्याने पहिल्या षटकात एकूण ५ धावा वसूल केल्या. दुखापतग्रस्त गिलच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसनने खेळपट्टीचा अंदाज घेत १ धाव काढली आणि आपले खाते उघडले. या षटकात भारताने बिनबाद ६ धावा फलकावर लावल्या.

भारतीय संघात मोठे बदल, संजू सॅमसनला संधी!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आता प्रथम फलंदाजी करून किवींसमोर डोंगराएवढे लक्ष्य उभे करण्यासाठी मैदानात उतरेल.

'कॅप्टन सूर्या'चा प्लॅन आणि संघात ३ मोठे बदल

टॉसवेळी बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, त्याला प्रथम फलंदाजीच करायची होती. तो म्हणाला, ‘खेळपट्टी उत्तम दिसत असून दवाचा प्रभाव फारसा पडणार नाही, त्यामुळे बोर्डावर धावा लावणे आमचे पहिले लक्ष्य असेल,’ असे सूर्याने स्पष्ट केले. टीम इंडियाने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

बुमराहचे पुनरागमन : वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी अनुभवी जसप्रीत बुमराह संघात परतला आहे.

वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री : फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.

शुभमन गिल बाहेर, संजू इन : सलामीवीर शुभमन गिलला लखनऊमध्ये दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यातून बाहेर आहे, त्याच्या जागी चाहत्यांचा आवडता संजू सॅमसन मैदानात उतरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची रणनीती : वर्ल्ड कपवर लक्ष

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने सांगितले की, रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेच्या संघात एनरिक नोर्कियाच्या जागी जॉर्ज लिंडेला स्थान देण्यात आले आहे. ‘मालिकेचा निकाल आणि आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,’ असे मार्करमने नमूद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) :

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेवाल्ड ब्रॅविस, डेव्हिड मिलर, मार्को जान्सेन, जॉर्ज लिंडे, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, ओटनेल बार्टमन.

SCROLL FOR NEXT