स्पोर्ट्स

IND vs SA : 'अक्षर की वॉशिंग्टन?', अर्शदीपच्या निवडीवर फिरकीपटूचे भवितव्य; टीम इंडियासमोर निवडीचा पेच

IND vs SA T20 World Cup 2026 : भारत-द. आफ्रिका हाय-व्होल्टेज सामना २२ फेब्रुवारी रोजी रंगणार

रणजित गायकवाड

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' फेरीत रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दीप दासगुप्ताच्या मते, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील निवड ही अर्शदीप सिंगच्या समावेशावर अवलंबून असेल.

अर्शदीपच्या निवडीवर फिरकीपटूचे भवितव्य

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना दासगुप्ता याने स्पष्ट केले की, अक्षर आणि वॉशिंग्टन यांच्यातील निवड ही एकमेकांशी जोडलेली प्रक्रिया आहे. तो म्हणाला, ‘जर अर्शदीप सिंग संघात खेळत असेल, तर संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला पसंती देऊ शकते. मात्र, जर अर्शदीप खेळणार नसेल, तर मी वॉशिंग्टन सुंदरची निवड करेन. याचे मुख्य कारण म्हणजे वॉशिंग्टन नवीन चेंडूने नियमितपणे गोलंदाजी करू शकतो आणि सुरुवातीची दोन षटके टाकू शकतो. अक्षर आणि वॉशिंग्टन यांच्या कौशल्यात फारसा फरक नाही, पण परिस्थितीनुसार त्यांचे महत्त्व बदलते.’

बुमराहला हवे 'स्वातंत्र्य'

दासगुप्ता यांनी पुढे नमूद केले की, जसप्रीत बुमराहच्या चार षटकांचा प्रभावी वापर करण्यासाठी अर्शदीपची उपस्थिती महत्त्वाची आहे. ‘अर्शदीप संघात असल्यास बुमराहला अधिक लवचिकपणे वापरता येते. त्याच्यावर सुरुवातीच्या षटकांचे ओझे राहत नाही. त्यामुळे सुंदर आणि अक्षर यांच्या निवडीचे पारडे अर्शदीपच्या समावेशावरून झुकू शकते,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

आफ्रिकेच्या डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध सुंदर ठरू शकतो 'हुकमी एक्का'

द. आफ्रिकेच्या फलंदाजीचा विचार करता वॉशिंग्टन सुंदरचे पारडे जड वाटते. आफ्रिकेच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी क्विंटन डी कॉक, रायन रिकलटन आणि डेव्हिड मिलर हे तीन खेळाडू डावखुरे आहेत. डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध ऑफ-स्पिनर प्रभावी ठरतो, हा तांत्रिक फायदा सुंदरच्या बाजूने जातो.

‘दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन डावखुरे फलंदाज असल्याने वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित याच रणनीतीमुळे त्याला नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळवण्यात आले असावे, जेणेकरून त्याला विश्वचषकाची लय गवसेल,’ असे दासगुप्ता यांनी सांगितले.

फलंदाजीच्या खोलीवर परिणाम नाही

अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला घेतल्याने भारताच्या फलंदाजीची खोली कमी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ८ व्या क्रमांकावर अक्षरच्या फलंदाजीची कदाचित तितकी गरज भासणार नाही आणि वॉशिंग्टन सुंदर देखील फलंदाजीत तितकाच सक्षम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT