विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. सलग दुसरी कसोटी मालिका गमावल्यानंतर, भारताला मायदेशात सलग दुसरी वन-डे मालिका गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून शनिवारी (दि. 5) होणारा तिसरा आणि निर्णायक वन-डे सामना ‘करो वा मरो’ असा असणार आहे. विशेष म्हणजे, 1986-87 नंतर भारताने मायदेशात कसोटी आणि वन-डे अशा दोन्ही मालिका एकाच दौऱ्यात गमावलेल्या नाहीत. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून दुर्मीळ दुहेरी मालिका विजय मिळवण्याची संधी आहे.
दरम्यान, या तिसऱ्या वन-डे सामन्यात नाणेफेक आणि दव या गोष्टी निर्णायक ठरू शकतात. या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने 4 विकेटस् राखून रोमांचक पुनरागमन केले होते. आता शनिवारच्या निर्णायक लढतीत टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू कोण असतील, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर रन मशिन विराट कोहली उतरणार हे निश्चित आहे. त्याने मागील दोन वन-डे सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. चौथ्या क्रमांकावर युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या वन-डेत त्याने धमाकेदार शतक (105 धावा) ठोकत मोलाची भूमिका बजावली होती.
कर्णधार के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर खेळणार असून, तो यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल, त्याची जागा पक्की आहे. सलामीचा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालला पहिल्या दोन सामन्यांत अपयश आले असले, तरी संघ व्यवस्थापन त्याच्यावर आणखी एकदा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो.
या निर्णायक सामन्यात टीम इंडियातील काही खेळाडूंना बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने गेल्या दोन सामन्यांत 3 विकेटस् घेतल्या आहेत. युवा वेगवान गोलंदाज नितीशकुमार रेड्डी, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर प्रभावी खेळ दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. युवा फलंदाज आणि यष्टिरक्षक ध्रुव ज्युरेल, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची जागा पक्की आहे, तर फिरकीपटू म्हणून अनुभवी कुलदीप यादव याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघात पुन्हा एक संधी मिळू शकते.
भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), टेंबा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ऑटनिएल बार्टमन.