स्पोर्ट्स

South Africa Record : द. आफ्रिकेचा भारतीय भूमीवर ऐतिहासिक पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IND vs SA 2nd Test : भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे आव्हान

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : कर्णधार टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने भारतीय भूमीवर एक असाधारण आणि ऐतिहासिक पराक्रम करत ३१ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतासमोर ठेवलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्यामुळे, त्यांनी फक्त मालिका विजयाच्या जवळच मजल मारली नाही, तर भारतीय मैदानात आजवरच्या सर्वाधिक मोठ्या आघाडीचा नवा मापदंडही प्रस्थापित केला आहे.

नवा इतिहास : भारताविरुद्ध ५४८ धावांची प्रचंड आघाडी

दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासमोर ५४९ धावांचे जवळजवळ अशक्य असे आव्हान ठेवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. दुस-या डावात फलंदाजी करताना त्यांनी तब्बल ५४८ धावांची अवाढव्य आघाडी घेतली.

कांगारूंचा विक्रम मोडला

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. कांगारू संघाने २००४ मध्ये नागपूर कसोटीत भारताविरुद्ध ५४२ धावांची आघाडी घेतली होती. बावुमाच्या संघाने केवळ ६ धावांच्या फरकाने हा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या विक्रमामुळे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली, कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता सूपडा साफ करण्याची दाट शक्यता निर्माण केली आहे.

दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा दबदबा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभा केला होता. याला प्रतुत्तर देताना भारतीय संघ केवळ २०१ धावांत गारद झाला. ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आफ्रिकेच्या खेळाडूंनी दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी केली आणि ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला. या कामगिरीमुळे भारताला सामना वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी आता शेवटच्या डावात एक ऐतिहासिक आणि अत्यंत संयमी खेळ करावा लागणार आहे.

ट्रिस्टन स्टब्सचे शतक हुकले

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने लक्ष्यवेधी आणि शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याला रविंद्र जडेजाने क्लिन बोल्ड करून तंबूत पाठवले. स्टब्जने १८० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि १ षटकारासह ९४ धावा केल्या. स्टब्स बाद झाल्यानंतर कर्णधार बावुमाने कोणताही विलंब न करता लगेच डाव घोषित केला, जेणेकरून भारतीय संघाला लवकरात लवकर फलंदाजीसाठी बोलावून त्यांच्यावर दबाव आणता येईल. आफ्रिकेच्या डावादरम्यान, टोनी डी जोरजी (४९) याचे अर्धशतकही एका धावेने हुकले.

भारतासमोर 'करो या मरो'ची स्थिती

सध्याची परिस्थिती पाहता भारतीय संघासमोर एकतर विक्रमी पाठलाग करून सामना जिंकणे किंवा उर्वरीत अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस फलंदाजी करून सामना अनिर्णित राखणे हे दोन पर्याय आहेत. क्रिकेट रसिकांचे डोळे आता भारतीय फलंदाजीकडे लागले आहेत. या संकटातून ते मार्ग काढतात की दक्षिण आफ्रिका ३१ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी मालिका क्लीन स्वीप करून नवा इतिहास रचते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT