गुवाहाटी : भारताच्या एकामागून एक फ्लॉप शोने आणि पुन्हा एकदा झालेल्या बॅटिंग कोसळण्याने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच संतप्त झाले आहेत. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतर शास्त्री यांनी टीम इंडियाच्या संशयास्पद निवडींवर आणि सातत्याने बदलल्या जाणाऱ्या फलंदाजी क्रमावर जोरदार टीका केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने तिसऱ्या दिवशी ०/९ धावांवरून खेळ सुरू केला. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात केली. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असल्याने त्यांनी कोणताही धोका घेतला नाही, पण शांत सुरूवातीनंतर फलंदाजीसाठी तुलनेने सोप्या वाटणाऱ्या या खेळपट्टीवर भारताचा डाव गडगडला.
भारतीय संघाची अवस्था बिनबाद ६५ धावसंख्येवरून ७ बाद १२२ अशी झाली. म्हणजे अवघ्या ५७ धावांमध्ये ७ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. भारतीय फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले आणि आपली विकेट स्वस्त्यात गमावल्या. या दरम्यान, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कॉमेंट्रीदरम्यान संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘बारसापारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी ही ७ बाद १५० अशी परिस्थिती होण्यासारखी अजिबात नाही. खरेतर टीम इंडियामध्ये सध्या विनाकारण सुरू असलेल्या बॅटिंग ऑर्डरमधील प्रयोगामुळे ही वेळ आली आहे,’ असे सांगत त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
आपल्या खास आक्रमक आणि स्पष्टवक्त्या शैलीत बोलताना रवी शास्त्रींनी भारतीय संघाच्या रणनितीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘छे, अजिबात नाही. या सततच्या प्रयोगांना काहीच अर्थ उरलेला नाही. मला टीम मॅनेजमेंटच्या या विस्कळीत रणनितीचा विचारप्रवाहच समजत नाहीये. शास्त्रींनी पुढे चिंता व्यक्त केली, ‘जेव्हा संघ व्यवस्थापन या संपूर्ण मालिकेचा आढावा घेतील, तेव्हा त्यांना त्यांच्या काही खेळाडूंच्या निवडीबद्दल नक्कीच विचार करावा लागेल.’
शास्त्रींनी मागील सामन्यांचे उदाहरण दिले, ते म्हणाले की, ‘तुम्ही कोलकात्यामध्ये ४ फिरकीपटू खेळवले आणि एका फिरकीपटूला फक्त एकच ओव्हर दिली. त्याऐवजी तुम्ही एका स्पेशालिस्ट फलंदाजासोबत जायला हवे होते. त्याचप्रमाणे, इथे वॉशिंग्टन सुंदरला मागच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले, पण आता तुमच्याकडे नंबर ३ चा खेळाडू असताना सुंदरला तुम्ही चौथ्या क्रमांकावर सहज खेळवू शकला असता. सुंदर नंबर ८ चा खेळाडू नाहीये. तो नंबर ८ पेक्षा खूप चांगला आहे.’
‘राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर भारतीय फलंदाजीतील नंबर ३ ची जागा ही संगीत खुर्चीचा खेळ बनली आहे. ‘नंबर ३ च्या फलंदाजांमध्ये सतत बदल केले जात आहेत आणि अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर करुण नायरने हा रोल निभावला, तर साई सुदर्शनलाही संधी मिळाली. वेस्ट इंडिज मालिकेत सुदर्शन कायम होता, पण त्याला कोलकात्याच्या कसोटीतून वगळून वॉशिंग्टन सुंदरला आणले गेले. आणि आता गुवाहाटीमध्ये सुदर्शन परत तिसऱ्या क्रमांकावर आला आणि सुंदरला थेट नंबर ८ वर ढकलले गेले आहे. भारतीय संघ व्यवस्थापन, विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना त्यांची बॅटिंग ऑर्डर निश्चित करण्याची अत्यंत गरज आहे,’ असेही मत शास्त्री यांनी मांडले.