स्पोर्ट्स

IND vs PAK : युवा भारताचा थरारक विजय! पाकिस्तानचा ५८ धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने गाजवले मैदान

India vs Pakistan cricket rivalry U19 World Cup 2026

रणजित गायकवाड

बुलावायो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक कट्टर संघर्षात भारताच्या १९ वर्षांखालील संघाने (India U19) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५८ धावांनी मात करत दिमाखदार विजय मिळवला. फलंदाजांनी उभारलेले आव्हानात्मक लक्ष्य आणि गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा या जोरावर भारताने हा विजय साकारला.

पाकिस्तानी फलंदाजांचे लोटांगण

२५३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर समीर मिन्हासला (९) हेनिल पटेलने स्वस्तात बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर हमजा झहूर (४२) आणि उस्मान खान (६६) यांनी ६५ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने बळी घेत पाकिस्तानवर दडपण कायम ठेवले. उस्मान खानने झुंजार अर्धशतक झळकावले, तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

कर्णधार आयुष आणि खिलनचा टिच्चून मारा

भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना कर्णधार आयुष म्हात्रेने अत्यंत टिच्चून मारा केला. त्याने ८ षटकांत अवघ्या २१ धावा देत ३ मोलाचे गडी बाद केले. त्याला खिलन पटेलने योग्य साथ दिली; खिलनने ९.२ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळवत पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही. फिरकीपटू विहान मल्होत्रा आणि वेगवान गोलंदाज कनिष्क चव्हाण, हेनिल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन विजयात मोलाचे योगदान दिले.

सामन्याला वळण

एका क्षणी पाकिस्तानची स्थिती ३ बाद १५१ अशी मजबूत होती. मात्र, कर्णधार आयुष म्हात्रेने अहमद हुसेनला पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि तिथून पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. शेवटच्या ७ विकेट्स पाकिस्तानने अवघ्या ४३ धावांत गमावल्या. अली हसन बलोच (३) आणि हुझैफा अहसान (१४) यांच्यासारखे फलंदाज भारतीय माऱ्यासमोर सपशेल अपयशी ठरले.

भारताचा खेळ

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अत्यंत चुरशीच्या अशा 'सुपर सिक्स' सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २५३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीच्या पडझडीनंतर वेदांत त्रिवेदीने (६८) सावरलेला डाव आणि शेवटच्या षटकांमध्ये कनिष्क चव्हाण व खिलन पटेल यांनी केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत २५२ धावांपर्यंत मजल मारली.

सुरुवातीचा थरार : ८ चेंडूंत ३ बळी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीला सार्थ ठरवला. भारताची सलामीची जोडी स्थिरावत असतानाच ८ व्या षटकात खेळाला नाट्यमय वळण मिळाले. वैभल सूर्यवंशीने २२ चेंडूंत ३० धावांची वेगवान खेळी केली खरी, मात्र मोहम्मद सय्यमने त्याला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्या पाठोपाठ आलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेला (०) सय्यमने शून्यावरच माघारी धाडले. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर अ‍ॅरॉन जॉर्जही (१६) बाद झाला. अवघ्या ४७ धावांवर भारताचे ३ प्रमुख गडी बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता.

वेदांतची संयमी खेळी आणि मोलाची भागीदारी

कठीण प्रसंगी वेदांत त्रिवेदीने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने विहान मल्होत्रासोबत (२१) चौथ्या गड्यासाठी ६२ धावांची महत्त्वाची भागीदारी करून डाव सावरला. विहान बाद झाल्यानंतर अभिज्ञान कुंडू (१६) आणि आर. एस. अंबरीश (२९) यांनी वेदांतला चांगली साथ दिली. वेदांतने ९८ चेंडूंत ६८ धावांची संयमी खेळी केली, ज्यात २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. ४० व्या षटकात तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद १८२ अशी होती.

अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस

भारताला २५० चा टप्पा ओलांडून देण्यात कनिष्क चव्हाण आणि खिलन पटेल यांच्यातील वेगवान भागीदारीचा मोठा वाटा राहिला. कनिष्कने २९ चेंडूंत ३५ धावा केल्या, तर खिलन पटेलने अवघ्या १५ चेंडूंत २१ धावा जोडून धावगती वाढवली. या दोघांनी अवघ्या ३१ चेंडूंत ५० धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दडपण आणले.

पाकिस्तानतर्फे अब्दुल सुभानने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत ३३ धावांत ३ बळी टिपले. मोहम्मद सय्यमने सुरुवातीचे दोन महत्त्वाचे बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले. अली रझा, अहमद हुसेन, मोमीन कमर आणि अली हसन बलोच यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्याला साथ दिली.

संक्षिप्त धावफलक :

  • भारत U19 : ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ धावा

  • (वेदांत त्रिवेदी ६८, कनिष्क चव्हाण ३५, वैभव सूर्यवंशी ३०; अब्दुल सुभान ३/३३, मोहम्मद सय्यम २/६९)

विहान मल्होत्राची फिरकी यशस्वी; अली हसन बलोच स्वस्तात बाद

भारताच्या विहान मल्होत्राने आपली फिरकीची जादू दाखवत अली हसन बलोचला बाद केले आहे. विहानने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बलोच तंबूत परतला असून पाकिस्तानने आपली सहावी विकेट गमावली.

विहानने 'ऑफ स्टंप'च्या बाहेर टाकलेला चेंडू वळण घेऊन उसळला. या चेंडूवर अली हसन बलोचने 'स्वीप' मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या बॅटची वरची कडा घेऊन हवेत उडाला. शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या दीपेश देवेंद्रनने कोणताही चुका न करता सोपा झेल टिपला. बलोच २० चेंडूंत केवळ ३ धावा करू शकला. या बळीमुळे भारताची सामन्यावरील पकड अधिक मजबूत झाली.

कर्णधार म्हात्रेचा पाकिस्तानला मोठा धक्का

भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने महत्त्वाची विकेट घेत सामना चुरशीचा केला आहे. त्याने सेट फलंदाज उस्मान खानला ६६ धावांवर बाद करून पाकिस्तानला मोठे खिंडार पाडले.

आयुषने टाकलेला 'फुल लेन्थ' चेंडू उस्मानने स्लोग-स्वीप करण्याचा प्रयत्न केला, जो थेट त्याच्या पायाला लागला आणि पंचांनी त्याला पायचीत (LBW) घोषित केले. मात्र, रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या खालच्या कडेला (Under-edge) लागून पायावर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. या स्पर्धेत 'डीआरएस' (DRS) उपलब्ध नसल्यामुळे उस्मान खानला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरत मैदानाबाहेर जावे लागले. त्याने ९२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली.

कर्णधार म्हात्रेची पहिल्याच चेंडूवर कमाल; अहमद हुसेनला धाडले तंबूत

भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने चेंडू हातात घेताच पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले आहे. गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेल्या आयुषने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अहमद हुसेनला अडकवले.

उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या आयुषने 'राउंड द विकेट' येत अहमद हुसेनला चकवले. आयुषचा फ्लाईटेड चेंडू खेळण्याच्या नादात हुसेनच्या बॅटची बाहेरील कडा लागली आणि यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडूने कोणताही अडथळा न येता त्याचा झेल टिपला. अहमद हुसेन केवळ २ धावा करून बाद झाला असून पाकिस्तानने आपली चौथी विकेट गमावली आहे.

अंबरिशच्या गोलंदाजीवर फरहान युसूफ बाद

सामन्याच्या 29.4 षटकात RS अंबरिशने फरहान युसूफला माघारी धाडत महत्त्वाचे यश मिळवले. स्लो आणि फुल लेंथचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकताच फरहानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य ताकद न लागल्याने चेंडू हवेत गेला आणि लॉन्ग-ऑनवर उभ्या असलेल्या खिलान पटेलने सीमारेषेजवळ मागे धावत शानदार झेल घेतला. फरहान युसूफ 39 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

कनिष्क चव्हाणचा भेदक मारा

भारतीय गोलंदाज कनिष्क चव्हाणने महत्त्वपूर्ण यश मिळवत ६५ धावांची धोकादायक ठरणारी भागीदारी फोडली. पाकिस्तानचा फलंदाज हमजा झहूर ४२ धावांवर असताना कनिष्कने त्याला त्रिफळाचीत केले.

हमीद झहूर लांबीच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू त्याच्या हाताला लागून थेट यष्टीवर आदळला आणि बेल्स खाली पडल्या. विशेष म्हणजे, कनिष्क चव्हाण पायचीतसाठी (LBW) अपील करत असताना पंचांनी त्याचे लक्ष यष्टीकडे वेधले. हमजा झहूरने ४९ चेंडूत ४२ धावा केल्या, ज्यात ८ चौकारांचा समावेश होता. या बळीमुळे भारतीय संघाचे सामन्यावरील पकड पुन्हा मजबूत झाली आहे.

हेनिल पटेलचा अचूक मारा; पाकचा सलामीवीर मिन्हासला 'पायचीत'

हेनिल पटेलने सुरुवातीलाच टिच्चून मारा करत भारताला पहिले यश मिळवून दिले. हेनिलने चौथ्या षटकात पाकिस्तानचा सलामीवीर समीर मिन्हासला पायचीत बाद करत तंबूत धाडले. हेनिलचा आत येणारा 'लेंथ बॉल' खेळताना समीर मिन्हास गोंधळला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो अपेक्षेपेक्षा कमी उसळला ज्यामुळे मिन्हासचा बचाव भेदून चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. मिन्हास ११ चेंडूंत ९ धावा करून बाद झाला. या महत्त्वपूर्ण बळीमुळे भारताने सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानवर दडपण निर्माण केले.

बुलावायो : १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अत्यंत चुरशीच्या अशा 'सुपर सिक्स' सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २५३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीच्या पडझडीनंतर वेदांत त्रिवेदीने (६८) सावरलेला डाव आणि शेवटच्या षटकांमध्ये कनिष्क चव्हाण व खिलन पटेल यांनी केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत २५२ धावांपर्यंत मजल मारली.

सुरुवातीचा थरार : ८ चेंडूंत ३ बळी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीला सार्थ ठरवला. भारताची सलामीची जोडी स्थिरावत असतानाच ८ व्या षटकात खेळाला नाट्यमय वळण मिळाले. वैभल सूर्यवंशीने २२ चेंडूंत ३० धावांची वेगवान खेळी केली खरी, मात्र मोहम्मद सय्यमने त्याला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्या पाठोपाठ आलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेला (०) सय्यमने शून्यावरच माघारी धाडले. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर अ‍ॅरॉन जॉर्जही (१६) बाद झाला. अवघ्या ४७ धावांवर भारताचे ३ प्रमुख गडी बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता.

वेदांतची संयमी खेळी आणि मोलाची भागीदारी

कठीण प्रसंगी वेदांत त्रिवेदीने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने विहान मल्होत्रासोबत (२१) चौथ्या गड्यासाठी ६२ धावांची महत्त्वाची भागीदारी करून डाव सावरला. विहान बाद झाल्यानंतर अभिज्ञान कुंडू (१६) आणि आर. एस. अंबरीश (२९) यांनी वेदांतला चांगली साथ दिली. वेदांतने ९८ चेंडूंत ६८ धावांची संयमी खेळी केली, ज्यात २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. ४० व्या षटकात तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद १८२ अशी होती.

अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस

भारताला २५० चा टप्पा ओलांडून देण्यात कनिष्क चव्हाण आणि खिलन पटेल यांच्यातील वेगवान भागीदारीचा मोठा वाटा राहिला. कनिष्कने २९ चेंडूंत ३५ धावा केल्या, तर खिलन पटेलने अवघ्या १५ चेंडूंत २१ धावा जोडून धावगती वाढवली. या दोघांनी अवघ्या ३१ चेंडूंत ५० धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दडपण आणले.

पाकिस्तानतर्फे अब्दुल सुभानने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत ३३ धावांत ३ बळी टिपले. मोहम्मद सय्यमने सुरुवातीचे दोन महत्त्वाचे बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले. अली रझा, अहमद हुसेन, मोमीन कमर आणि अली हसन बलोच यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्याला साथ दिली.

संक्षिप्त धावफलक :

  • भारत U19 : ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ धावा

  • (वेदांत त्रिवेदी ६८, कनिष्क चव्हाण ३५, वैभव सूर्यवंशी ३०; अब्दुल सुभान ३/३३, मोहम्मद सय्यम २/६९)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT