स्पोर्ट्स

IND vs PAK U19 Final : पाकिस्तानचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी! 'या' दिवशी रंगणार भारत-पाक फायनल

अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत भारताची अंतिम फेरीत धडक

रणजित गायकवाड

मस्कत : १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. या दिमाखदार विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, आता जेतेपदासाठी भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशवर ९ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.

दरम्यान, गुरुवारी (दि. १२) ओमानमधील अल अमीरात क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ८ बाद २२७ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल भारताने कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीच्या ९३ आणि आर्यवीर सेहवागच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजयाचे लक्ष्य सहज गाठत अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले.

कॅप्टन लक्ष्यचे शतक ७ धावांनी हुकले

विजयासाठी २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सलामीवीर आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ११७ धावांची भक्कम भागीदारी रचली. आर्यवीरने ५७ चेंडूंत ४ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. १७ व्या षटकात अली नियाझीने त्याला बाद केले.

दुसरीकडे, कर्णधार लक्ष्यने ९० चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावांची धडाकेबाज खेळी केली, मात्र त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. लक्ष्यने दुसऱ्या गड्यासाठी व्ही. के. विनीतसोबत ७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ३२ व्या षटकात सोहेल खानने लक्ष्यला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर विनीतने (६२ चेंडूंत नाबाद ५७ धावा) यशवर्धन चौहानसोबत (१४ चेंडूंत नाबाद १६ धावा) तिसऱ्या गड्यासाठी ३६ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा करत हा सामना जिंकला.

ईशान सूदची प्रभावी गोलंदाजी, अफगाणिस्तान २२७ धावांवर रोखले

तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकात ईशान सूदने अबिदुल्ला नादरजानला (१४ धावा) बाद करत अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. फरीदुल्ला एहसासही १३ धावा काढून माघारी परतला. सुभान झखैलने ४४ चेंडूंत ३१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर यष्टिरक्षक नोमान सालारझई (७८ चेंडूंत ५१ धावा, २ चौकार, २ षटकार) आणि शाह फैसल रहीम (७२ चेंडूंत ५१ धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

मधल्या फळीत आमिर हमझाला भोपळाही फोडता आला नाही, तर ताहिर सरवर १ आणि मोहम्मद अली ८ धावा काढून बाद झाले. अखेरच्या षटकांत कर्णधार सोहेल खानने ४४ चेंडूंत नाबाद ३६ धावांची जबाबदार खेळी करत रहीमसोबत सातव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी रचली आणि अफगाणिस्तानला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून ईशान सूदने सर्वाधिक यश मिळवत ९ षटकांत ४३ धावा देऊन ३ गडी बाद केले. त्याला आर्यन सवसानीने २ गडी बाद करत उत्तम साथ दिली, तर काव्य परेश पटेल, यशवर्धन चौहान आणि अर्जुन राजपूत यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

शनिवारी रंगणार भारत-पाकिस्तान अंतिम थरार

गुरुवारी झालेल्या या विजयासह भारताला साखळी फेरीतील पराभवाचा वचपा घेण्याची संधी चालून आली आहे. साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा ३ गडी राखून पराभव केला होता. आता १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी ओमानमधील अल अमीरात क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी १० वाजता होईल. साखळी सामन्यातील पराभवाचा हिशोब चुकता करत आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय युवा संघ सज्ज झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT