स्पोर्ट्स

IND vs PAK Asia Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा निसटता पराभव; झहूरच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तान U19 संघाचा ३ गडी राखून विजय

रणजित गायकवाड

अल अमिरात (ओमान) : १९ वर्षांखालील आशिया चषक (ACC U19 Asia Cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अत्यंत अटीतटीच्या व थरारक सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या प्रतिष्ठेच्या हाय-व्होल्टेज लढतीत पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने ३ गडी राखून विजय मिळवला.

पाकिस्तानच्या या विजयात यष्टीरक्षक-फलंदाज हमझा झहूर याचे झुंजार शतक निर्णायक ठरले. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या प्रारंभी अत्यंत भेदक मारा करत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता; मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या अभेद्य भागीदाऱ्यांच्या जोरावर पाकिस्तानने अखेर विजयश्री खेचून आणली. हमझा झहूरने नाबाद १०० धावांची खेळी साकारली. त्याने आपल्या या शतकी खेळीत १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली; मात्र पाकिस्तानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय डावाला गळती लागली आणि संपूर्ण संघ ४६.३ षटकांत २०८ धावांवर गारद झाला. भारताकडून युवा फलंदाज अर्जुन राजपूतने एकाकी झुंज देत जबरदस्त शतक झळकावले. अर्जुनने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ ८५ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने १०७ धावांची तडाखेबंद खेळी उभारली. पाकिस्तानतर्फे गोलंदाजीत रिझवानउल्लाह आणि निकाब शफीक यांनी अचूक मारा करत प्रत्येकी ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

भारताने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अवघ्या १५ षटकांत ६१ धावांवर पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, अत्यंत बिकट परिस्थितीत हमझा झहूरने हसनैन अब्बास डार याच्या साथीने संयमी फलंदाजी करत सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.

या जोडीने सहाव्या गड्यासाठी १०७ धावांची बहुमूल्य शतकी भागीदारी रचून भारतीय संघाला सामन्यातून निष्प्रभ केले. हसनैनच्या रूपाने पाकिस्तानची आणखी एक जोडी फुटली आणि त्यानंतर त्यांचे आणखी दोन गडी बाद झाले; मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून पूर्णपणे निसटला होता. हमझाने अखेरपर्यंत संयम न गमावता संघाला विजय मिळवून दिला.

विशेष म्हणजे, १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी २०२५ च्या १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही पाकिस्तानने भारताचा तब्बल १९१ धावांच्या मोठ्या फरकाने मात दिली होती. त्या सामन्यात पाकिस्तानने उभारत केलेल्या ३४७/८ धावांच्या आव्हानापुढे भारताचा डाव अवघ्या २६.२ षटकांत १५६ धावांवर आटोपला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT