दुबई येथे आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. गट टप्प्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकचा एकतर्फी पराभव केला होता. यानंतर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे.
टोकाचा ताणतणाव, इंच न इंच लढवण्याची जिद्द आणि एकेक धावेसाठी, एकेक बळीसाठी रण पेटत असताना भारताने रविवारी आशिया चषकातील पहिल्या सुपर4 सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आणखी एकदा चारीमुंड्या चीत केले आणि तमाम भारतवासियांना नवरात्रोत्सवानिमित्त विजयाची हवीहवीशी भेट दिली. नवरात्रोत्सवातील नऊ दिवसात वेगवेगळे रंग भरले जातात. यातील पहिला रंग विजयाचा भरत टीम इंडियाने या उत्सवाचा आनंद खर्या अर्थाने द्विगुणित केला!
वजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी प्रारंभापासूनच आक्रमक फलंदाजीवर भर दिला आणि यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांवर सातत्याने दडपण राहिले. या जोडीने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा सिलसिला कायम ठेवत चौकार, षटकारांची सातत्याने आतषबाजी केली. अभिषेक शर्मा तुलनेत अधिक आक्रमक पवित्र्यात होता तर शुभमन गिलने यावेळी स्ट्राईक रोटेट करण्यावर अधिक भर दिला होता.
या जोडीने 105 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून देत विजयाची भक्कम पायाभरणी केली. शुभमन गिल डावात बाद होणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला अश्रफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होत परतावे लागले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आल्या पावली खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्याने भारताला आणखी एक धक्का सोसावा लागला. आक्रमक फलंदाजी करणारा अभिषेक 74 धावांवर तिसर्या गड्याच्या रुपाने बाद झाला तर संजू सॅमसन देखील 17 चेंडूत 13 धावांवर रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. लागोपाठ अंतराने गडी बाद होत राहिल्याने भारतावर काही काळ दडपण जरुर निर्माण झाले. पण, धावसरासरी उत्तम असल्याने भारताने विजयाकडील आगेकूच प्रतिकूल परिस्थितीतही कायम ठेवली होती.
सरतेशेवटी तिलक वर्मा 19 चेंडूत नाबाद 30 व हार्दिक पंड्या 7 चेंडूत 7 यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करत पाकिस्तानला आणखी एक सणसणीत चपराक दिली. या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना बुधवार दि. 24 रोजी बांगलादेशविरुद्ध होत आहे.
पाकिस्तानने पहिली 8 षटके पूर्ण होण्याआधी एकूण 4 गोलंदाज आजमावून पाहिले. मात्र, यातील एकाही गोलंदाजाला भारताची सलामी जोडी फोडता आलीच नव्हती. मागील सामन्यात भारतीय फलंदाजांना सतावत राहिलेल्या शाहिन शाह आफ्रिदीला येथे पहिल्या दोन षटकात अजिबात प्रभाव टाकता आला नाही. अभिषेक व शुभमन यांनी चौफेर फटकेबाजी करत शाहिनसह सर्वच गोलंदाजांची लक्तरे काढली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने पहिल्या 8 षटकातच 96 धावा चोपल्या.
दोन्ही संघात मागील काही दिवसातील ताणतणाव चांगलाच टोकाला पोहोचला असून याचे प्रत्यंतर या लढतीतही अनेकदा आले. एकदा तर हॅरिस रौफ व अभिषेक शर्मा यांच्यात मैदानातच जुंपली. रौफ व अभिषेक शर्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाल्यानंतर मैदानी पंचांनी त्यात हस्तक्षेप करत दोघांनाही दूर सारले व त्यानंतर खेळाला पुढे सुरुवात झाली. गिलने 142 किमी वेगाचा चेंडू सहजपणे चौकारासाठी पिटाळून लावल्यानंतर ही वादावादी झाली होती.
शेवटच्या 18 चेंडूत 19 धावांची आवश्यकता असताना तिलकने फहीमचा पहिला चेंडू निर्धाव जाऊ दिला. मात्र, त्यानंतर पुढील चेंडूवरच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकावरुन उत्तुंग षटकार फटकावत विजय खर्या अर्थाने आवाक्यात आणला. त्यानंतर उर्वरित 4 चेंडूत भारताने आणखी 4 धावा वसूल केल्या आणि विजयाच्या दिशेने आगेकूच केली.
शेवटच्या 2 षटकात केवळ 9 धावा आवश्यक असताना हार्दिक पंड्या शाहिनवर आक्रमण चढवणे अपेक्षित होते. पण, पहिल्या 3 चेंडूत तो एकच धाव घेऊ शकल्याने काहीसे दडपण निर्माण झाले होते. चौथ्या चेंडूवर मात्र तिलक वर्माने लाँगऑफच्या दिशेने षटकार खेचत दडपण झुगारुन टाकले आणि पाचव्या चेंडूवर लेग साईडकडे चौकार फटकावत भारताच्या दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
हॅरिस रौफने संजू सॅमसनला बाद करून भारताला चौथा धक्का दिला. सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला पण १७ चेंडूत १३ धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता.
भारताने १४ षटकांत तीन गडी गमावून १३२ धावा केल्या. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा क्रीजवर होते. भारताला आता विजयासाठी आणखी ४० धावांची आवश्यकता.
अब्रार अहमदने भारताला तिसरा झटका दिला. त्याने अभिषेक शर्माचा डाव संपुष्टात आणला. अभिषेक शानदार फलंदाजी करत होता आणि ३९ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावा काढून बाद झाला. भारताने १२३ धावांवर तिसरी विकेट गमावली.
सूर्यकुमार सूर्यकुमार यादव एकही धाव न घेता बाद झाला. पाकिस्तानला दुसरी विकेट मिळाली, त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला एकही धाव न घेता बाद केले. अभिषेक आणि गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली, परंतु पाकिस्तानने सूर्यकुमार यादव आणि गिलच्या विकेट घेऊन पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
भारताचा उपकर्णधार शुभमन गिल फहीम अश्रफच्या गोलंदाजीवर बाद झाला. अवघ्या तीन धावांनी त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. गिल २८ चेंडूत ८ चौकारांसह ४७ धावा काढून बाद झाला. गिल आणि अभिषेक यांनी १०५ धावांची सलामी दिली.
अभिषेक शर्माने २४ चेंडूत तिसरे टी२० अर्धशतक पूर्ण केले. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने शुभमन गिलसह पाकिस्तानवर दबाव आणला. भारतीय उपकर्णधारही त्याच्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला.
पॉवरप्ले संपला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला धमाकेदार सुरुवात दिली. भारताने पहिल्या सहा षटकांत एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या.
पाकिस्तानने दिलेले 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. पॉवरप्ले संपण्यापूर्वी ५० धावांचा टप्पा गाठला. पाच षटकांनंतर भारताने बिनबाद ५५ धावा केल्या.
भारताने तीन षटकांनंतर ३१ धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शुभमन गिलने चौकार मारला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव सुरू झाला आहे. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने षटकार मारून डावाची सुरुवात केली आहे.
आशिया कप सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पाकिस्तानने भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत २० षटकांत पाच गडी गमावून १७१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने ५८ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने दोन, तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.
मोहम्मद नवाज धावबाद झाला. सलमान आघाने बुमराहच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. आघाने क्रीज गाठली, पण नवाज क्रीज गाठू शकला नाही. सूर्यकुमारने हे पाहिले आणि चेंडू फेकला.
शिवम दुबेने साहिबजादा फरहानला बाद करून भारताला चौथी विकेट मिळवून दिली. फरहानला सामन्यात दोन जीवदान मिळाले होते, परंतु यावेळी सूर्यकुमार यादवने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही आणि त्याचा डाव संपवला. फरहान ४५ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला, ज्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
कुलदीप यादवने हुसेन तलतला बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. ११ चेंडूत १० धावा काढून तलत बाद झाला.
सईम अयुबच्या रूपात भारताला दुसरी विकेट मिळाली. शिवम दुबेने अयुबला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. अयुब १७ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला. यामुळे अयुब आणि फरहान यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ही विकेट मिळण्यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ड्रींक्सदरम्यान मैदानावर आले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यानंतरच भारताला ही भागीदारी तोडण्यात यश आले.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा घेतला असून ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अभिषेक आणि कुलदीपने फरहानचे सोपे झेल सोडले.
साहिबजादा फरहान आणि सईम अयुब यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. खराब क्षेत्ररक्षणाचे परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. फरहान आणि अयुब हे आक्रमक खेळ करत आहेत. पाकिस्तानने नऊ षटकांनंतर एक बाद ८३ धावा केल्या आहेत.
पॉवरप्लेमध्ये भारताला एक ब्रेकथ्रू मिळाला, तर पाकिस्तानने मागील सामन्यापेक्षा चांगली सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण खराब राहिले. दोन झेल सोडले. सहा षटकांच्या अखेरीस पाकिस्तानने एक बाद ५५ धावा केल्या.
पाकिस्तान वेगाने धावा काढत आहे. तिस-या षटकात फखर जमानची विकेट मिळाली पण या षटकात 9 धावा निघाल्या. त्यानंतर बुमराहने फेकलेल्या ४थ्या षटकात पाकिस्ताने दोन चौकारासह १० धावा काढल्या. यासह पाकची धावसंख्या ४ षटकांअखेर १ बाद ३६ होती.
हार्दिक पंड्याने फखर जमानची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या ८ डावांमध्ये १५ बळी घेण्याची किमया केली, जो भारत-पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील कोणत्याही गोलंदाजाने घेतलेला सर्वाधिक बळींचा विक्रम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आतापर्यंतच्या ८ डावांमध्ये तो कधीही बळी न घेता परतलेला नाही.
हार्दिक पांड्याने फखर जमानची विकेट घेतली. संजू सॅमसनने विकेटच्या मागे झेल पकडला. हार्दिक पंड्याने टाकलेला ऑफ-कटर चेंडू फखरसाठी घातक ठरला. चेंडू थोडा आखूड टप्प्याचा होता, त्यामुळे बॅटच्या कडेला लागून सरळ यष्टीरक्षकाकडे गेला. फखर जमान १५(९) [चौकार-३] धावा करून हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनकरवी झेलबाद झाला. मैदानावरील पंचांनी चेंडूने जमिनीला स्पर्श केला आहे का, हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. चेंडू जमिनीजवळून सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला होता. ‘झूमर' (zoomer) तंत्रज्ञानाचा वापर करून तिसरे पंच सर्व बाजूने तपासणी करत होते. अखेरीस, त्यांनी फखर जमान बाद असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय पाहून फखर जमानला धक्का बसला, तो काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता. पण तिसऱ्या पंचांचा निर्णय अंतिम असल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. यावेळी पाकिस्तानची धावसंख्या १ बाद २१ होती.
जसप्रीत बुमराहने दुसरे षटक टाकले. त्याच्या या षटकात पाकिस्ताने ११ धावा वसूल केल्या फखर जमानने तिस-या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारले. दुस-या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद १७
हार्दिक पंड्याने पहिले षटक टाकले. पहिले दोन चेंडू त्याने टीच्चून मारा केला. त्यानंतर तिस-याच चेंडूवर साहिबजादा फरहानने मोठा फटका खेळला. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, स्विंग होत होता. फरहानने बॅट आडवी फिरवली, ज्यामुळे बॅटच्या जाड कडेला लागून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने उडाला. अभिषेकला काही फूट पुढे पळण्याची गरज होती, पण चेंडूची दिशा व गती यांचा चुकीचा अंदाज लावल्यामुळे तो जागेवरच उभा राहिला. अखेरीस त्याला पुढे झेपावत डायव्ह मारावा लागला, पण चेंडू हातातून निसटला.
पहिल्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ६
भारत : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : सईम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
भारताने आपल्या पहिल्या सुपर 4 सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. हर्षित राणा, अर्शदीप सिंगच्या जागी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचे पुनरागम झाले आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले. हसन नवाज आणि खुशदिल शाह यांना बाहेर काढले आहे.
भारताने ओमानविरुद्ध वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची चाचणी घेतली, परंतु कोणताही गोलंदाज फारसा प्रभावी ठरला नाही. तथापि, अर्शदीपने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळींचा टप्पा गाठला, तो अशी कमगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. हर्षितलाही एक विकेट मिळाली.
दुबईची खेळपट्टी संथ आहे. पण फिरकीपटूंना अनुकूल आहे. भारतीय संघ अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकूटावर अवलंबून असेल. अक्षर पटेल हा ओमानविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे भारतासाठी चिंता वाढली होती. पण क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी स्पष्ट केले की अक्षर चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाची शक्यता वाढते.
पण जर अक्षर बरा होऊ शकला नाही, तर वॉशिंग्टन सुंदर किंवा रियान पराग त्याची जागा घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, भारतीय संघ या फिरकी त्रिकूटासह परतू शकतो, बुमराह आणि हार्दिक पंड्या जलद गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारतील.
पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, या फिरकी त्रिकूटाने एकूण सहा बळी घेतले होते, तर बुमराह आणि हार्दिकने मिळून तीन बळी घेतले होते. या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, भारत कदाचित जास्त बदल करणार नाही. मागिल विजयी संघाला कायम ठेवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अर्शदीप आणि हर्षित यांना पुन्हा वगळले जाऊ शकते आणि बुमराह आणि वरुण हे पुन्हा अंतिम 11 च्या संघात पुनरागमन करू शकतात.
ओमानविरुद्ध भारताची फलंदाजी कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. सॅमसन वगळता इतर फलंदाज फारसे प्रभावी दिसले नाहीत. सर्वात मोठी चिंता म्हणजे शुभमन गिलच्या कामगिरीचा अभाव. त्याला लवकरच फॉर्ममध्ये परतावे लागेल. अभिषेक शर्मालाही त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करावे लागेल. सॅमसनने ओमानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि भारतीय संघ व्यवस्थापन त्याला पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी कुठे पाठवते हे पाहणे रंजक असेल. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल अशी शक्यता आहे.
दुबईमध्ये दोन्ही संघांमध्ये चार टी-२० सामने झाले आहेत. यापैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर दोन सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
टी-२० मध्ये दोन्ही संघांमधील एकूण रेकॉर्डबाबत, भारत आणि पाकिस्तानने आतापर्यंत एकूण १४ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
आयसीसीने असेही स्पष्ट केले की पायक्रॉफ्ट यांनी खेळ भावनेचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही, आयसीसीने रविवारी (दि. 21) होणाऱ्या भारत-पाकिस्तान सुपर 4 सामन्यासाठी पायक्रॉफ्ट यांचीच मॅच रेफरी म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की आयसीसी त्यांच्या एलिट पॅनेलशी वचनबद्ध आहे आणि पीसीबीच्या मागण्यांपुढे झुकण्यास तयार नाही.
आर. अश्विनने पाक संघावर जहरी टीका करताना म्हटले आहे की, ‘‘सामनाधिकारी हे शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक नाहीत, जे खेळाडूंना ‘चला, हस्तांदोलन करा.’ याची सक्ती करायला. मागिल सामन्यात पायक्रॉफ्ट यांनी कसही चूक केलेली नाही?’
आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना होणार आहे. या स्पर्धेतील हा दोन्ही संघांमधील ही दुसरा सामना आहे. मागील सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने हस्तांदोलन वाद पेटला होता. त्यानंतर पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती, परंतु आयसीसीने तसे करण्यास नकार दिला.
आता, सुपर 4च्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यातही अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील. दरम्यान, भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पाठिंबा दर्शवला आहे.