पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा. Pudhari photo
स्पोर्ट्स

Ind vs Pak T20 |हायव्होल्टेज सामन्याआधी मैदानाबाहेर थरार! 'हॅन्डशेक'वरून पाकिस्‍तानच्‍या कर्णधाराने टीम इंडियाला डिवचले

India vs Pakistan T20 | भारतीय संघाचे कोलंबोमध्ये जंगी स्वागत, रविवार रंगणार बहुचर्चित सामना

पुढारी वृत्तसेवा

India vs Pakistan T20

कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज टी-२० विश्वचषक सामन्यापूर्वी मैदानाबाहेरील वातावरण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने 'हॅन्डशेक' (हस्तंदोलन) वादावर पुन्हा एकदा भाष्य केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

'उद्या काय होते ते पाहूच'

पत्रकार परिषदेत बोलताना सलमान अली आगा याने हा सामना खिलाडूवृत्तीने खेळला जाईल, अशी आशा व्यक्त केली. मात्र, भारताच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्याने अत्यंत सूचक विधान केले. "हा सामना खऱ्या अर्थाने खिलाडूवृत्तीने खेळला जाईल, अशी मला आशा आहे. भारतीय संघ हस्तांदोलन करणार का? हे आपल्याला उद्याच समजेल," असे म्हणत त्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले.

यापूर्वीही आगाने व्‍यक्‍त केले होते मत

यापूर्वी आशिया चषकादरम्यान भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचा आरोप करत आगाने टीका केली होती. "अशा कृती खेळासाठी आणि तरुण चाहत्यांसाठी योग्य नाहीत. आम्हाला याचे वैयक्तिक दुःख नाही, पण खेळाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. खेळाडू हे आदर्श असतात आणि त्यांनी योग्य उदाहरण घालून दिले पाहिजे," असे त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

भारतीय संघाचे जंगी स्वागत

दरम्‍यान, भारतीय संघ शुक्रवारी कोलंबोमध्ये दाखल झाला. विमानतळावर स्थानिक ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याविष्काराने टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अर्शदीप सिंगनेही ठेका धरत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नेहमीप्रमाणेच गंभीर मुद्रेत दिसले.

सरावाचे वेळापत्रक जाहीर

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघ शनिवारी स्वतंत्रपणे सराव करतील. भारतीय संघ सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सराव करेल. सायंकाळी ५:३० वाजता पत्रकार परिषद आहे.

कोणत्‍या संघाचे पारडे जड?

मैदानावरील गणितांचा विचार करता भारताची मदार इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि टिळक वर्मा यांसारख्या स्फोटक फलंदाजांवर असेल. सलामीसाठी अभिषेक शर्मा किंवा संजू सॅमसन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीला पूरक असल्याने वरुण चक्रवर्तीची भूमिका महत्त्वाची ठरेल, तर अर्शदीप आणि हार्दिकचा पाकिस्तानविरुद्धचा जुना रेकॉर्ड भारतासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT