स्पोर्ट्स

IND vs PAK : कोलंबोत टीम इंडियाचा 'रुद्राभिषेक'; महाशिवरात्रीला पाकिस्तान विरुद्ध विजयाचा महातांडव!

India vs Pakistan : भारताचा पाकिस्तानचा ६१ धावांनी उडवला धुव्वा, सुपर 8 फेरीत दिमाखात धडक

रणजित गायकवाड

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियमवर क्रिकेटचा रणसंग्राम नव्हे, तर भारतीय गोलंदाजीचा 'रुद्रावतार' पाहायला मिळाला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भारतीय संघाने आठव्यांदा वर्चस्व गाजवत पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. पाक संघाची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. इशान किशनची वादळी फलंदाजी आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी फिरवलेल्या 'चक्रव्यूहात' अडकून पाकिस्तानचा ११४ धावांत खुर्दा झाला.

इशानचा 'झंझावात' आणि सूर्याचे 'तेज'

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला खरा, पण त्यानंतर मैदानात आलेला इशान किशन पाकिस्तानी गोलंदाजांसाठी 'काळ' ठरला. त्याने ४० चेंडूंत ७७ धावांची (१० चौकार, ३ षटकार) स्फोटक खेळी करत पाकिस्तानचा 'पॉवरप्ले'च हिरावून घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने (३२) आणि शेवटच्या षटकात शिवम दुबे (२७) व रिंकू सिंहने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने १७५ धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले.

पाकिस्तानी फलंदाजीचे लोटांगण

१७६ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानला पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला शून्यावर बाद करून पहिला झटका दिला. त्यानंतर आला जगाचा तारणहार जसप्रीत बुमराह! त्याने सईम अयुब आणि कर्णधार सलमान आघाला आपल्या 'ब्रह्मास्त्रा'ने गारद केले. पाकिस्तानची अवस्था २ षटकांत ३ बाद १३ अशी दयनीय झाली होती.

स्पिनर्सचे 'मायाजाल': अक्षर आणि वरुणचा तडाखा

वेगवान गोलंदाजांनी कंबरडे मोडल्यानंतर फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानला अडकवण्याचे काम अक्षर पटेलने केले. त्याने सेट झालेल्या उस्मान खानला (४४) आणि दिग्गज बाबर आझमला (५) तंबूत धाडून पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा धुळीस मिळवल्या. वरुण चक्रवर्तीने आपल्या 'मिस्ट्री'चा असा काही प्रभाव पाडला की, त्याने सलग दोन चेंडूंत दोन बळी घेत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. कुलदीप यादव आणि तिलक वर्मानेही प्रत्येकी एक बळी घेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचीच 'हुकूमत' कायम

टी-२० विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचा दबदबा आजही अबाधित आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आतापर्यंत विश्वचषकाच्या इतिहासात एकूण ९ सामने खेळले गेले आहेत. या ९ लढतींपैकी तब्बल ८ वेळा टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत विजयश्री खेचून आणली आहे, तर पाकिस्तानला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

आजच्या या दिमाखदार विजयामुळे भारताने या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचे आपले वर्चस्व केवळ सिद्धच केले नाही, तर ते अधिक भक्कम केले आहे. विश्वचषकाच्या व्यासपीठावर भारताला रोखणे पाकिस्तानसाठी पुन्हा एकदा 'अशक्य' असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

थोडक्यात धावफलक:

भारत: १७५-७ (२० षटके) - इशान किशन ७७, सूर्यकुमार यादव ३२.

पाकिस्तान: ११४-१० (१८ षटके) - उस्मान खान ४४.

भारतीय गोलंदाजी: हार्दिक २/१६, बुमराह २/१७, अक्षर २/२९, वरुण २/१७.

वरुण चक्रवर्तीने टिपली फहीम अश्रफची विकेट; पाकिस्तान ८ बाद ९०

पाकिस्तानच्या पराभवाची औपचारिकता आता केवळ काही चेंडूंची उरली आहे. भारताचा 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्तीने फहीम अश्रफला बाद करून पाकिस्तानला आठवा धक्का दिला आहे. यासह भारतीय संघ विजयाच्या अगदी समीप पोहोचला आहे.

अशी पडली विकेट:

चतुराईपूर्ण गोलंदाजी : १६ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर (१५.३ ओव्हर) वरुणने ऑफ-स्टंपवर एक 'फ्लॅट' (वेगवान) चेंडू टाकला.

फटका फसला : फहीम अश्रफने बॅकफूटला जाऊन ओढून (Pull) फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूचा वेग आणि खेळपट्टीचा संथपणा यामुळे त्याचा टायमिंग चुकला.

रिंकूचा सहज झेल : डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या रिंकू सिंगने पुढे धावत येत अतिशय सोपा झेल टिपला. फहीम अश्रफ १० धावा करून माघारी परतला.

स्टेडियममधील भारतीय पाठीराखे आता मोठ्या उत्साहात विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. पाकिस्तानचा डाव आता १०० धावांच्या आतच गुंडाळला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानची फलंदाजी आता पूर्णपणे पत्त्यासारखी कोसळली आहे. फिरकीपटूंच्या वर्चस्व असलेल्या या सामन्यात अर्धवेळ गोलंदाज टिळक वर्माने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शादाब खानला बाद करून पाकिस्तानची उरलीसुरली आशाही संपुष्टात आणली आहे.

अशी पडली विकेट:

पहिल्याच चेंडूवर शिकार: १३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर (१२.१ ओव्हर) कर्णधार सूर्याने चेंडू टिळक वर्माच्या हाती सोपवला. शादाब खानने आक्रमक पवित्रा घेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

दुबेचा पुन्हा एकदा झेल: खेळपट्टी संथ असल्याने चेंडू बॅटवर नीट आला नाही आणि शादाबच्या हातात बॅट फिरली. लॉंग-ऑफला उभ्या असलेल्या शिवम दुबेने कोणताही चुकी न करता झेल टिपला. शादाब १५ चेंडूंत १४ धावा करून माघारी परतला.

पाकिस्तानची केविलवाणी अवस्था:

पाकिस्तानची धावसंख्या आता ७ बाद ७८ अशी झाली असून, पराभव आता त्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताच्या मुख्य गोलंदाजांनंतर आता अर्धवेळ गोलंदाजही बळी घेत असल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे.

कुलदीप यादवचा धमाका! मोहम्मद नवाज स्वस्तात बाद

भारताचा 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मोहम्मद नवाजला अडकवून पाकिस्तानला सहावा धक्का दिला आहे. १२ व्या षटकात कुलदीपने नवाजचा अडसर दूर करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

अशी पडली विकेट:

फुल टॉसवर शिकार: ११.४ षटकांत कुलदीपने नवाजला एक 'फुल टॉस' चेंडू टाकला. नवाजने त्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू नीट टोलवता आला नाही.

दुबेचा सुरेख झेल: चेंडू हवेत उंच उडाला. डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या शिवम दुबेने उजवीकडे धावत जाऊन आपल्या 'बादली'सारख्या हातांमध्ये छातीपर्यंत आलेल्या उंचीचा झेल अतिशय आत्मविश्वासाने टिपला.

मोहम्मद नवाज ५ चेंडूंत ४ धावा करून माघारी परतला.

कुलदीपचा 'रस्टी' फॉर्म?

कुलदीपने या षटकात दोन वेळा फुल टॉस चेंडू टाकले, जे त्याच्याकडून सहसा पाहायला मिळत नाहीत. थोडा गंजलेला (Rusty) वाटत असूनही, कुलदीपने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले आहे.

धावफलकाची स्थिती:

पाकिस्तान: ११.४ षटकांत ७३/६

पाकिस्तानसाठी एकमेव झुंज देणारा फलंदाज उस्मान खान अखेर फिरकीच्या जाळ्यात अडकला आहे. ११ व्या षटकात अक्षर पटेलने आपली चतुराई दाखवत उस्मानला यष्टीचीत केले. उस्मानच्या बाद होण्याने पाकिस्तानच्या विजयाच्या सर्व शक्यता आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे.

अशी पडली विकेट:

१०.४ व्या षटकांत उस्मान खान आक्रमक पवित्रा घेत मोठा फटका मारण्यासाठी क्रीझच्या खूप बाहेर आला. हे ओळखून अक्षरने चेंडू थोडा आखूड आणि वेगाने टाकला, ज्याला अतिरिक्त उसळी मिळाली. चेंडू उस्मानच्या बॅटला गुंगारा देऊन मागे गेला. यष्टीरक्षक इशान किशनने अत्यंत चपळाईने चेंडू पकडला आणि उस्मान परत क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वीच यष्ट्या उडवल्या. उस्मान खानने ३४ चेंडूंत ४४ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

पाकिस्तानचा एकमेव धोकादायक ठरू शकणारा फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघाने विजयाकडे कूच केली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने धावत जाऊन अक्षर पटेलला मिठी मारत या यशाचा आनंद साजरा केला.

पावरप्लेमध्ये भारताचे पारडे जड

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजीची पावरप्लेमध्ये दाणादाण उडाली आहे. ६ व्या षटकाच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला असून पाकिस्तानची अवस्था ४ बाद ३८ अशी अत्यंत नाजूक आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या पहिल्याच षटकात पाकिस्तानच्या फलंदाजांना हात उघडू दिले नाहीत.

ठळक घडामोडी:

वरुणचे 'मायाजाल' : ६ व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या वरुण चक्रवर्तीने आपल्या मिस्ट्री स्पिनने केवळ ४ धावा दिल्या. उस्मान खानने एकदा हवेत फटका मारला होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या थोडे पुढे पडल्याने तो थोडक्यात वाचला.

दडपणाखाली पाकिस्तान : पावरप्लेच्या ६ षटकांत अवघ्या ३८ धावा आणि ४ मुख्य बळी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला आहे. साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान आघा आणि बाबर आझम हे महत्त्वाचे फलंदाज आधीच तंबूत परतले आहेत.

कुलदीपचे आगमन बाकी : पाकिस्तानची स्थिती आधीच बिकट असताना, भारताचा हुकमी एक्का कुलदीप यादव अद्याप गोलंदाजीला यायचा आहे. ज्या पद्धतीने खेळपट्टी चेंडूला 'ग्रीप' देत आहे, ते पाहता कुलदीपसमोर टिकणे पाकिस्तानसाठी मोठे आव्हान असेल.

धावफलकाची स्थिती (६ षटकांनंतर):

पाकिस्तान : ३८/४

जसप्रीत बुमराहच्या धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच फिरकीपटू अक्षर पटेलने पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला. पाकिस्तानचा आधारस्तंभ आणि अनुभवी फलंदाज बाबर आझम अवघ्या ५ धावांवर त्रिफळाचीत झाला.

अशी पडली विकेट:

५ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर अक्षर पटेलने वेगाने आणि सरळ रेषेत चेंडू टाकला. बाबर आझमने आपल्या स्वभावानुसार न खेळता एक बेजबाबदार 'स्लॉग' शॉट मारण्याचा प्रयत्न केला. अक्षरच्या चेंडूचा वेग बाबरला चकवून गेला आणि चेंडू थेट मधल्या यष्टीवर (Middle Stump) आदळला. बाबर ७ चेंडूंत ५ धावा करून बाद झाला.

पाकिस्तानचे मानसिक खच्चीकरण:

कर्णधार सलमान आघानंतर बाबर आझमनेही खराब फटका मारून आपली विकेट फेकली. ५ षटकांच्या आतच पाकिस्तानचे ४ महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने सामना आता पूर्णपणे भारताच्या खिशात गेल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानचे खेळाडू दबावाखाली पूर्णपणे विखुरलेले पाहायला मिळत आहेत.

जसप्रीत बुमराहने सलामीवीर अयुबला बाद केल्यानंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने सलमान अली आघाला बाद करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

अशी पडली विकेट:

दुसऱ्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर (१.६ ओव्हर) बुमराहने 'शॉर्ट ऑफ लेन्थ' चेंडू टाकला जो वेगाने आत आला. सलमान आघाने तो मिड-विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, जो पूर्णपणे चुकला. चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला. मिड-ऑनला उभ्या असलेल्या हार्दिक पंड्याने मागे सरकत हा अतिशय सोपा झेल टिपला. पंचांनी बाद घोषित करताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. पाकिस्तानी कर्णधार ४ चेंडूत ४ धावा करून बाद झाला.

पाकिस्तानची दयनीय अवस्था:

जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात २ बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले आहे. केवळ १२ धावांवर पाकिस्तानचे ३ मुख्य फलंदाज बाद झाले आहेत. बुमराहच्या या 'स्पेल'मुळे भारतीय विजयाची शक्यता आता कैक पटीने वाढली आहे.

हार्दिक पंड्याने दिलेल्या पहिल्या धक्क्यानंतर आता जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपला जलवा दाखवला. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बुमराहने पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर सईम अयुबला पायचीत करून पाकिस्तानची अवस्था बिकट केली आहे.

बुमराहची जादू : दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर (१.२ ओव्हर) बुमराहने एक अतिशय वेगवान आणि आत येणारा 'इनस्विंगर' टाकला.

फलंदाज चकवा : अयुबला बुमराहच्या या चेंडूचा अंदाजच आला नाही. चेंडू इतक्या वेगाने आत आला की सॅमची बॅट खाली येण्यापूर्वीच तो थेट मधल्या यष्टीच्या रेषेत पॅडवर आदळला. पंचांनी तात्काळ बाद घोषित केले. सॅम अयुबने २ चेंडूत ६ धावा (१ षटकार) केल्या.

अवघ्या ८ धावांवर पाकिस्तानने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. हार्दिकनंतर बुमराहने घेतलेल्या या बळीमुळे भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली.

हार्दिक पंड्याचा मोठा प्रहार; साहिबजादा फरहान शून्यावर बाद

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानचा स्फोटक सलामीवीर साहिबजादा फरहानला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले आहे.

अशी पडली विकेट:

पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर (०.४ ओव्हर), हार्दिकने अतिशय अचूक 'शॉर्ट ऑफ लेन्थ' चेंडू टाकला. चेंडूला मिळालेली उसळी आणि बाहेर जाणारे वळण यामुळे फरहान फसला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन हवेत उडाला. रिंकू सिंहने कोणताही चुकून न करता एक सुरेख झेल टिपला.

हार्दिकची चपखल रणनीती

अर्शदीप सिंग आज खेळत नसल्यामुळे हार्दिकने स्वतः नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहान हा जसप्रीत बुमराहला चांगले खेळण्यासाठी ओळखला जातो, पण भारताने हार्दिकला समोर आणून पाकिस्तानची ही रणनीती उधळून लावली. फरहानला ४ चेंडूंत खातेही उघडता आले नाही.

चेंडू खेळपट्टीवर 'ग्रीप' होत आहे. जर फिरकीपटूंनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, तर चेंडू वळण्यासोबतच थोडा थबकून येत आहे. अशा संथ खेळपट्टीवर १७५ ही धावसंख्या केवळ 'बचाव करण्यायोग्य' नाही, तर ती सरासरीपेक्षा जास्त आहे.

फिरकीचे 'चकव्यूह' : पाकिस्तानने १८ षटके फिरकी गोलंदाजी केली, याचाच अर्थ खेळपट्टी फिरकीला किती साथ देत आहे हे स्पष्ट होते. आता भारताकडे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारखे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. कुलदीपची फिरकी आणि वरुणची गुगली समजणे पाकिस्तानी फलंदाजांसाठी, विशेषतः दबावाखाली, कठीण असेल.

अक्षर आणि अभिषेकचे 'सरप्राईज पॅकेज' : अक्षर पटेलकडे डाव्या हाताने अचूक गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे, तर अभिषेक शर्माला जरी फलंदाजीमध्ये यश मिळाले नसले, तरी तो आपल्या कामचलाऊ फिरकीने मधल्या षटकांत महत्त्वाचे बळी मिळवून देऊ शकतो.

इशान किशनचा प्रभाव : इशान किशनच्या ७७ धावांच्या (४० चेंडू) खेळीने भारताला ती 'मोमेंटम' मिळवून दिली, जी इतर फलंदाजांना संथ खेळपट्टीमुळे मिळवता आली नाही. त्याची ही खेळीच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते.

पाकिस्तानसाठी आव्हान

पाकिस्तानला हे लक्ष्य गाठण्यासाठी सुरुवातीपासूनच जोखीम पत्करावी लागेल. पण, जर त्यांनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, तर चेंडू ग्रीप होत असल्यामुळे झेल जाण्याची शक्यता अधिक असेल. कोलंबोच्या या खेळपट्टीवर १७६ धावांचा पाठलाग करणे म्हणजे 'लोखंडाचे चणे' चावण्यासारखे आहे.

रिंकू-दुबेचा शाहीनवर हल्ला!

पाकिस्तान विरुद्ध पहिला फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या. शेवटच्या षटकात रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी शाहीन आफ्रिदीला लक्ष्य करत महत्त्वपूर्ण धावा वसूल केल्या, ज्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली.

शेवटच्या षटकातील थरार (२० वे षटक)

रिंकूचा 'फिनिशिंग' टच : रिंकू सिंहने शाहीनच्या गोलंदाजीवर एक अफलातून षटकार आणि एक चपळ चौकार मारला. त्याने अवघ्या ४ चेंडूत ११ धावांची महत्त्वपूर्ण भर घातली.

दुबेचा प्रहार आणि दुर्दैवी धावबाद : शिवम दुबेने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला, मात्र पाचव्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. दुबेने १७ चेंडूत २७ धावांची उपयुक्त खेळी केली.

शाहीनचे पुनरागमन : शेवटच्या दोन चेंडूंवर शाहीनने केवळ १ धाव देत शिवम दुबे (धावबाद) आणि अक्षर पटेल यांना बाद केले. अक्षर पटेल मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.

या सामन्यात पाकिस्तानने तब्बल १८ षटके फिरकी गोलंदाजांकडून टाकून घेतली, जो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील एक संयुक्त विक्रम ठरला आहे.

इशान किशनच्या ७७ धावा आणि शेवटच्या षटकातील रिंकू-दुबेच्या फटकेबाजीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. आता भारताचे गोलंदाज महाशिवरात्रीच्या या मुहूर्तावर या धावसंख्येचा बचाव कसा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारताची धावसंख्या वेगाने वाढवण्याच्या प्रयत्नात असलेला कर्णधार सूर्यकुमार यादव अखेर १९ व्या षटकात माघारी परतला आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिकने त्याला बाद करून भारताची मोठी धावसंख्या उभारण्याची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत.

अशी पडली विकेट

१९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर (१८.५ ओव्हर), सूर्यकुमारने लेग-साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. उस्मान तारिकने चेंडूचा वेग कमी करून तो 'फ्लॅट' टाकला, ज्यामुळे सूर्याचा फटका फसला. चेंडू हवेत उंच गेला, पण सीमारेषा पार करू शकला नाही. क्षेत्ररक्षक सॅम अयुबने सुरुवातीला थोडी चूक केली, पण शेवटी त्याने सुरेख झेल टिपला.

सूर्याची खेळी:

सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. त्याने शिवम दुबेसोबत डावाला आकार दिला खरा, पण डेथ ओव्हर्समध्ये त्याला अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही.

उस्मान तारिकचा प्रभावी स्पेल:

उस्मान तारिकने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अतिशय कंजूस गोलंदाजी केली. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले आणि शेवटी सूर्याचा महत्त्वाचा बळी घेतला.

१८ व्या षटकात १४ धावा कुटल्या; भारत १५० पार

गेल्या काही षटकांत शांत बसलेल्या भारतीय फलंदाजांनी १८ व्या षटकात पाकिस्तानच्या अबरार अहमदवर हल्ला चढवला आहे. या षटकात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी एक चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचत भारताला ४ बाद १५४ धावांवर नेले आहे.

१८ व्या षटकातील थरार:

सूर्याची नजाकत: अबरारच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने कमालीचा तांत्रिक फटका खेळला. संथ खेळपट्टीवर बॅकफूटला जाऊन त्याने सरळ बॅटने चेंडू सीमारेषेबाहेर (चौकार) धाडला.

दुबेचा पॉवर-पॅक षटकार: अनेक चेंडूंपासून मोठ्या फटक्याच्या शोधात असलेल्या शिवम दुबेला अखेर संधी मिळाली. अबरारने चेंडू थोडा शॉर्ट टाकताच दुबेने त्याचा फायदा घेत 'मिड-विकेट'च्या वरून एक लांबच लांब षटकार ठोकला.

लय सापडली: या षटकात भारताने एकूण १४ धावा वसूल केल्या, ज्यामुळे धावगतीला पुन्हा वेग आला आहे. सूर्यकुमार ३२ धावांवर, तर शिवम दुबे १८ धावांवर खेळत आहे.

पाकिस्तानी गोलंदाजांनी आवळला फास! १७ व्या षटकात केवळ ४ धावा; भारत १४० वर रोखला

सामन्याच्या अंतिम षटकांत धावांची गती वाढवण्याची अपेक्षा असताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला जखडून ठेवले आहे. १७ व्या षटकात उस्मान तारिकने भेदक मारा करत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या जोडीला मोठे फटके मारण्यापासून रोखले. १७ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १४० अशी आहे.

१७ व्या षटकातील ठळक घडामोडी

कंजूस गोलंदाजी : उस्मान तारिकने टाकलेल्या या षटकात भारताला एकही मोठा फटका मारता आला नाही. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना पूर्णपणे अडकवले.

सूर्यकुमारची कसरत : कर्णधार सूर्यकुमार यादवने विविध फटके मारण्याचा प्रयत्न केला, मात्र उस्मानने हुशारीने चेंडू 'वाईड' टाकला आणि कधी 'गुगली'चा वापर करून सूर्याला चकित केले. सूर्यकुमार सध्या २४ चेंडूत २६ धावांवर खेळत आहे.

दुबेचा संघर्ष : शिवम दुबेलाही चेंडू नीट बॅटवर घेता आला नाही, त्यानेही एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला. तो ९ चेंडूंत १० धावांवर खेळत आहे.

धावफलकाची स्थिती:

भारत: १७ षटकांत १४०/४

दुबे-सूर्याकडून खिंड लढवण्याचे प्रयत्न

सलग दोन चेंडूंवर दोन बळी गमावल्यानंतर भारतीय संघाने सावध पवित्रा घेतला आहे. १६ व्या षटकात शिवम दुबे आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी धावफलक हालता ठेवत भारताला ४ बाद १३६ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.

१६ व्या षटकातील ठळक घडामोडी

दुबेचा चौकार : मोहम्मद नवाजने टाकलेल्या या षटकात शिवम दुबेने आपला इरादा स्पष्ट केला. त्याने षटकाच्या पाचव्या चेंडूवर बॅकफूटला जाऊन 'पुल'चा फटका मारला, जो दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चपळाईने सीमारेषेबाहेर (चौकार) गेला.

सावध फलंदाजी : हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेने कोणतीही जोखीम न पत्करता एकेरी धावांवर भर दिला आहे. सूर्यकुमार यादव २० चेंडूंत २४ धावांवर खेळत आहे.

नवाजची गोलंदाजी : मोहम्मद नवाजने आपले ४ षटकांचे स्पेल पूर्ण केले असून त्याने २८ धावा दिल्या आहेत, मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही.

धावफलकाची स्थिती:

भारत : १६ षटकांत १३६/४

तिलक वर्मा 25 धावांवर बाद, भारताला 126 धावांवर तिसरा झटका

पाकिस्तानचा फिरकीपटू सॅम अयुबने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. तिलक वर्माला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याला शून्यावर बाद करून भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. भारताने अवघ्या दोन चेंडूंत दोन मोठे बळी गमावले आहेत.

अशी पडली विकेट:

१५ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर (१४.३ ओव्हर), मैदानात उतरताच हार्दिकने आक्रमक पवित्रा घेतला. अयुबने हुशारीने 'कॅरम बॉल' टाकला आणि चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर ठेवला. हार्दिकने चेंडू हवेत उडवला, मात्र चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागल्याने त्याला अंतर गाठता आले नाही. लॉंग-ऑफला उभ्या असलेल्या बाबर आझमने सुरेख झेल टिपला. अयुबने सलग दोन चेंडूंवर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याला बाद केले. हार्दिक 'गोल्डन डक'चा शिकार झाल्याने भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले.

धावफलकाची स्थिती:

भारत : १२५/४ (१४.३ षटके)

सईम अयुबची कामगिरी : ३ बळी (इशान, तिलक, हार्दिक)

भारताला तिसरा धक्का!

इशान किशननंतर आता स्थिरस्थावर झालेला फलंदाज तिलक वर्मा देखील बाद झाला असून भारताला १५ व्या षटकात तिसरा झटका बसला आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू सईम अयुबने आपल्या फिरकीच्या जाळ्यात तिलक वर्माला अडकवून पाकिस्तानला महत्त्वाचे यश मिळवून दिले.

अशी पडली विकेट:

१५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर (१४.२ ओव्हर), अयुबने यष्टीच्या रोखाने अचूक चेंडू टाकला. तिलक वर्माने तो चेंडू 'स्वीप' करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू वेगाने फिरला आणि बॅटला हुलकावणी देत थेट पॅडवर आदळला.

पंचांनी तात्काळ 'एलपीडब्ल्यू' (LBW) बाद घोषित केले. चेंडू यष्टीच्या रेषेत असल्याने टिळकने रिव्ह्यू न घेताच मैदानाबाहेर जाणे पसंत केले.

तिलकची कामगिरी :

तिलक वर्माने २४ चेंडूंत २५ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. इशान किशनच्या वादळी खेळीनंतर तिलकने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

धावफलकाची स्थिती:

भारत : १२५/३ (१४.२ षटके)

भारताचा डेथ ओव्हर्ससाठी 'प्लॅटफॉर्म' सज्ज; १४ षटकांत १२५ धावा!

सामन्यात १४ व्या षटकाचा खेळ संपला असून भारताने २ बाद १२५ धावा केल्या आहेत. 'ड्रिंक्स ब्रेक'नंतर भारताने आता शेवटच्या ६ षटकांत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कंबर कसली आहे.

१४ व्या षटकातील महत्त्वाचे क्षण

सूर्याचा फटका आणि शादाबची चूक : मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने मागे वळून 'स्वीप' मारला. बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शादाब खानने चेंडू अडवण्यात मोठी चूक केली आणि चेंडू सीमापार गेला. सूर्याच्या या चौकारामुळे पाकिस्तानचा दबाव कमी झाला.

सावध तिलक : तिलक वर्मा सध्या २३ चेंडूंत २५ धावांवर खेळत असून त्याने सूर्याला चांगली साथ दिली आहे.

धावगती : या षटकात भारताने ७ धावा वसूल केल्या. सूर्यकुमार यादव २१ धावांवर खेळत आहे.

इशान किशनने दिलेल्या वादळी सुरुवातीनंतर भारताकडे आता शेवटच्या ६ षटकांत फटकेबाजी करण्यासाठी भक्कम पाया उपलब्ध आहे. सूर्यकुमार आता आपला गिअर बदलून 'रुद्रावतार' धारण करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

कोलंबोत टीम इंडियाची संथ पण सावध आगेकूच; १३ षटकांत ११७ धावा फलकावर

इशान किशनच्या वादळी खेळीनंतर भारतीय फलंदाजांनी आता संयमी पवित्रा घेतला आहे. उस्मान तारिकने टाकलेल्या १३ व्या षटकात भारताने १० धावा वसूल केल्या असून, १३ षटकांती भारताची धावसंख्या २ बाद ११८ अशी झाली आहे.

१३ व्या षटकातील ठळक घडामोडी

सूर्याची फटकेबाजी : कर्णधार सूर्यकुमार यादवने उस्मान तारिकच्या पहिल्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोरदार फटका मारून ३ धावा वसूल केल्या. सूर्यकुमार सध्या १२ चेंडूंत १४ धावांवर खेळत आहे.

तिलकचा संयम : दुसऱ्या टोकाला तिलक वर्माने स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला असून तो २२ चेंडूंत २५ धावांवर खेळत आहे.

पाकिस्तानचा प्रयत्न : उस्मान तारिकने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र 'वाईड' चेंडू आणि धावून घेतलेल्या धावा यामुळे भारताने या षटकात १० धावा मिळवल्या.

भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भक्कम पाया रचला आहे. आता शेवटच्या ७ षटकांत 'सूर्या-तिलक' जोडी किती आक्रमक खेळते, यावर भारताची अंतिम धावसंख्या अवलंबून असेल.

भारताचे शतक!

सामन्यातील १२ व्या षटकाचा खेळ संपला असून भारताने २ बाद १०७ धावा करून डावावर आपली पकड कायम ठेवली आहे. इशान किशन बाद झाल्यानंतर आता टिळक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव जोडी जमवण्याचा प्रयत्न करत आहेत.

१२ व्या षटकातील थरार

तिलक वर्माचा प्रहार: मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने 'एक्स्ट्रा कव्हर'च्या वरून एक अप्रतिम 'इनसाईड-आऊट' षटकार ठोकला. बऱ्याच वेळानंतर टिळकने आक्रमक हात दाखवत भारताचे शतक पूर्ण केले.

DRS चा थरार : षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवविरुद्ध पाकिस्तानने LBW साठी जोरदार अपील केले होते. मैदानावरील पंचांनी 'नॉट आऊट' दिल्यानंतर पाकिस्तानने 'रिव्ह्यू' (DRS) घेतला, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याने सूर्यकुमार वाचला.

धावगती : या षटकात भारताने ९ धावा वसूल केल्या. सूर्यकुमार ९ धावांवर, तर तिलक २१ धावांवर खेळत आहेत.

धावफलकाची स्थिती

भारत : १२ षटकांत २ बाद १०७ धावा

इशान किशनच्या वादळी खेळीनंतर आता ही जोडी मधल्या षटकांमध्ये धावगती कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे.

इशान किशनची वादळी खेळी संपुष्टात! ७७ धावांवर पाकिस्तानला मिळाले यश; सूर्यकुमार मैदानात

भारताचा सलामीवीर इशान किशन याने पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढल्यानंतर अखेर पाकिस्तानला त्याचे यश मिळाले. नवव्या षटकात सईम अयुबने इशानचा त्रिफळा उडवून भारताला दुसरा मोठा धक्का दिला. इशान बाद झाल्यानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानावर आला आहे.

इशान किशनचा झंझावात

कमी चेंडूत मोठी धावसंख्या : इशानने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ७७ धावांची स्फोटक खेळी साकारली. यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकले.

परिस्थितीवर मात : खेळपट्टी फिरकीला अनुकूल आणि आव्हानात्मक असतानाही इशानने पाकिस्तानी गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवले आणि भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले.

कशी पडली विकेट?

नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर (८.४ ओव्हर) सॅम अयुबने इशानला चकवून त्याचा बचाव भेदला आणि चेंडू थेट यष्टींवर आदळला. इशान बाद होताच पाकिस्तानी खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला, कारण तो ज्या पद्धतीने खेळत होता, भारताची धावसंख्या २०० च्या पार जाणे निश्चित दिसत होते.

भारताचा सलामीवीर इशान किशन आज पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. ८ व्या षटकात पाकिस्तानने आपला अनुभवी फिरकीपटू शादाब खानला पाचारण केले, मात्र इशानने त्याचे स्वागतही चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीने केले. ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ८२ वर पोहोचली. यावेळी इशान ७२ धावांवर खेळत होता.

८ व्या षटकातील महत्त्वाचे क्षण

शादाबवर हल्ला : इशानने शादाबच्या दुसऱ्याच चेंडूवर जबरदस्त 'स्लॉग-स्वीप' मारत षटकार ठोकला. त्यानंतर लेग-साइडला टाकलेल्या खराब चेंडूवर त्याने चौकार वसूल केला.

मैदानावर वर्चस्व : इशान सध्या इतक्या आत्मविश्वासाने खेळत आहे की, त्याने रिव्हर्स स्वीप आणि डाऊन द ग्राऊंड शॉट्स खेळत शादाबच्या षटकात तब्बल १७ धावा लुटल्या.

विक्रमाच्या उंबरठ्यावर : इशान किशनने २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारत-पाक टी-२० सामन्यांतील हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.

आकडेवारी आणि विक्रम:

भारत-पाक टी-२० सामन्यांतील सर्वात वेगवान अर्धशतके:

  • मोहम्मद हाफीज - २३ चेंडू (२०१२)

  • अभिषेक शर्मा - २४ चेंडू (२०२५)

  • इशान किशन - २७ चेंडू (२०२६)

भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन सध्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत आहे. अबरार अहमदने टाकलेल्या सातव्या षटकात सलग तीन चौकार ठोकत इशानने आपले अर्धशतक दिमाखात पूर्ण केले. ७ षटकांनंतर भारताची धावसंख्या आता १ बाद ६५ झाली.

इशान किशनची वादळी कामगिरी

२७ चेंडूत ५० धावा : इशानने अवघ्या २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. संघात पुनरागमन केल्यापासून त्याचा हा 'ड्रीम फॉर्म' कायम असून त्याने पाकिस्तानी आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या आहेत.

सलग तीन चौकार : सातव्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर इशानने अबरारला सलग तीन चौकार मारले. पहिला चौकार 'शॉर्ट थर्ड'च्या दिशेने, दुसरा थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून आणि तिसरा 'एक्स्ट्रा कव्हर'वरून खेचला.

दुसऱ्या टोकाला साथ : तिलक वर्मा (१० धावा) सध्या इशानला उत्तम साथ देत असून इशानच्या फटकेबाजीमुळे डगआऊटमधील सर्व खेळाडूंनी उभे राहून त्याचे कौतुक केले.

इशान किशनच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानचा संघ दबावाखाली आला असून भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

भारताने पहिल्या ६ षटकांचा (पॉवरप्ले) खेळ संपला तेव्हा ५२/१ अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे.

सहाव्या षटकातील ठळक घडामोडी

नशिबाची साथ आणि फटकेबाजी: सॅम अयुबने टाकलेल्या सहाव्या षटकात भारताने ११ धावा वसूल केल्या. या षटकात इशान किशनने 'मिड-ऑन'च्या वरून एक चौकार खेचला, तर तिलक वर्माने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बॅटची कड लागून मिळालेल्या चौकाराने भारताचे अर्धशतक फलकावर लावले.

इशानची तुफानी खेळी: इशान किशन सध्या २५ चेंडूत ४२ धावा करून खेळत असून तो आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे.

तिलक वर्चाचा संयम: तिलक वर्मानेही ७ चेंडूत १० धावा करत इशानला चांगली साथ दिली आहे.

पॉवरप्लेनंतरची स्थिती

  • भारत: ५२/१ (६ षटके)

  • इशान किशन: ४२* (२५)

  • तिलक वर्मा: १०* (७)

पहिल्या षटकात केवळ १ धाव देणाऱ्या पाकिस्तानला पुढील ५ षटकांत भारतीय फलंदाजांनी ५१ धावा कुटून बॅकफूटवर ढकलले आहे.

पहिल्या षटकातील धक्क्यातून सावरत भारतीय संघाने आता आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर इशान किशन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. पाचव्या षटकात भारताने ११ धावा वसूल केल्या. ५ षटकांअखेर भारताची धावसंख्या १ बाद ४१ अशी झाली.

पाचव्या षटकातील महत्त्वाचे क्षण:

षटकाराने स्वागत: पाकिस्तानने नवा गोलंदाज अबरार अहमदला पाचारण केले, मात्र इशानने त्याच्या पहिल्याच चेंडूवर स्वीप शॉट मारत 'बॅकवर्ड स्क्वेअर लेग'वरून षटकार ठोकला.

इशानची चौफेर फटकेबाजी: षटकातील चौथ्या चेंडूवर इशानने अबरारची 'गुगली' अचूक ओळखली आणि कव्हरच्या दिशेने शानदार चौकार मारला.

तिलकची साथ: तिलक वर्मा सध्या ५ धावांवर खेळत असून त्याने इशानला स्ट्राईक देण्यावर भर दिला आहे.

धावफलकाची स्थिती:

  • भारत: ५ षटकांत ४१/१

  • इशान किशन: २१ चेंडूंत ३६ धावा (४ चौकार, २ षटकार)

  • अबरार अहमद: १ षटकात ११ धावा (० बळी)

इशान किशनने ज्या पद्धतीने शाहीन आफ्रिदीनंतर आता अबरार अहमदवर दबाव टाकला आहे, त्यावरून भारत पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

इशानचा आफ्रिदीवर हल्लाबोल, पहिल्या षटकातील धक्क्यांनंतर भारताचे चोख प्रत्युत्तर

पहिल्या षटकात अभिषेक शर्माची विकेट स्वस्त गमावल्यानंतर भारतीय संघ दबावाखाली येईल असे वाटले होते. मात्र, सलामीवीर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्याच षटकात पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर तुफान हल्ला चढवत भारताला सावरले आहे.

दुसऱ्या षटकातील थरार (१५ धावा)

इशानचा षटकार : शाहीनच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशनने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक गगनभेदी षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले.

नशिबाची साथ : षटकातील दुसऱ्या चेंडूवर इशानच्या बॅटची कड लागून चेंडू स्टंपच्या जवळून निसटला आणि नशिबाने चौकार मिळाला.

तिलकची साथ : षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिलक वर्मानेही एक देखणा चौकार खेचला. शाहीनने टाकलेला हा चेंडू बॅटची कड घेऊन गेला असला तरी तो सीमापार पोहोचला.

पहिल्या षटकाचा थरार

पाकिस्तानची रणनीती : कर्णधार सलमान आगाने स्वतः गोलंदाजीची सुरुवात करत सर्वांना चकित केले. त्याचा हा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी ठरला.

अभिषेकची विकेट : पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अभिषेकने 'पुल' मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून मिड-ऑनला उभ्या असलेल्या शाहीन आफ्रिदीच्या हातात विसावला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या पहिल्याच षटकात भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या ४ चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने स्वतः गोलंदाजीचे पहिले षटक टाकण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला आहे.

अशी पडली विकेट

पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर (०.६ ओव्हर), सलमानने टाकलेला चेंडू यष्टीच्या रोखाने वेगाने आत आला. अभिषेकने तो चेंडू 'पुल' करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत उडाला. मिड-ऑनला उभ्या असलेल्या शाहीन आफ्रिदीने कोणताही चुकी न करता सोपा झेल टिपला.

निराशाजनक कामगिरी

अभिषेक शर्मा या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही शून्यावर बाद झाला होता आणि आजही त्याला खाते उघडता आले नाही. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताला पहिल्याच षटकात मोठा झटका बसल्याने आता सर्व जबाबदारी इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या खांद्यावर आली आहे.

क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी सुरुवातीला गोलंदाजांना मदत करेल, असा अंदाज पाकिस्तानने वर्तवला आहे.

भारतीय संघात महत्त्वाचे बदल

टॉस हारल्यानंतरही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने समाधान व्यक्त केले. भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती, असे त्याने स्पष्ट केले. भारतीय संघात आज दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा याचे संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.

कर्णधारांचे मत:

सूर्यकुमार यादव (भारत) : "आम्ही प्रथम फलंदाजीच करू इच्छित होतो. गेल्या दोन सामन्यांत आम्ही धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. हा मोठ्या दबावाचा सामना आहे आणि कोणताही संघ जिंकू शकतो."

सलमान आगा (पाकिस्तान) : "खेळपट्टी थोडी चिकट वाटत असल्याने सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेल. आम्ही आमचा संघ कायम ठेवला असून या आव्हानासाठी सज्ज आहोत."

दोन्ही संघांचे अंतिम ११ खेळाडू

भारत : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान : सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक.

कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान?

खेळपट्टीनुसार, भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचाही समावेश केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत रिंकू सिंह किंवा अर्शदीप सिंगला बाहेर बसावे लागू शकते. बाबर आझमविरुद्ध कुलदीपचा प्रभावी रेकॉर्ड आणि आशिया कप फायनलमध्ये त्याने घेतलेल्या चार विकेट्स पाहता, त्याला या सामन्यात संधी देणे हा एक चांगला पर्याय असेल. आतापर्यंतच्या पहिल्या दोन वर्ल्ड कप सामन्यांमध्ये कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. जर कुलदीप या सामन्यात खेळला तर भारत तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवेल, कारण त्यांच्याकडे आधीच वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे दोन चांगले फिरकी गोलंदाज आहेत.

इशान किशनचा रुद्र अवतार

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवली आहे. संघात पुनरागमन केल्यापासून इशानने आपल्या फलंदाजीची एक वेगळीच धार दाखवून दिली आहे.

विक्रमी पॉवरप्ले आणि स्फोटक खेळी

नामिबियाविरुद्धची आक्रमक खेळी: अमेरिकेविरुद्धच्या संथ खेळीनंतर, नामिबियाविरुद्ध इशानने अक्षरशः बॅटचा तडाखा लावला. अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला येत त्याने अवघ्या २४ चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी साकारली.

ऐतिहासिक कामगिरी: इशानच्या या फटकेबाजीमुळे भारताने पहिल्या ६ षटकांत ८६/१ अशी मजल मारली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही भारताची सर्वात स्फोटक पॉवरप्ले कामगिरी ठरली आहे.

इशान किशनच्या या निर्भय फलंदाजीमुळे भारताला डावाच्या सुरुवातीलाच मोठी गती मिळत आहे. आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही इशानची ही 'पॉवरप्ले पॉवर' भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

टॉस जिंका, फलंदाजी निवडा; धावांचा पाठलाग ठरतोय कर्दनकाळ

आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यांचा कल पाहता, 'प्रथम फलंदाजी' करणाऱ्या संघांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मैदानावरील खेळपट्टीचे स्वरूप धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

मैदानाची आतापर्यंतची आकडेवारी

विजयाची हॅट्ट्रिक : या मैदानावर पूर्ण झालेले तिन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीच जिंकले आहेत. (श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेने अनुक्रमे आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियावर मात केली आहे).

धावांचे अंतर : प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या १७१.३ आहे, तर पाठलाग करणाऱ्या संघांची सरासरी केवळ १३४.७ इतकी खाली घसरली आहे.

बळींचा पाऊस : धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत धावांचा पाठलाग करणारा प्रत्येक संघ 'ऑल आऊट' झाला आहे.

पॉवरप्लेचा प्रभाव : प्रथम फलंदाजी करताना संघ सरासरी ५३.७ धावा करतात, तर दुसऱ्या डावात हे प्रमाण ४१.० धावांपर्यंत मर्यादित राहते.

प्रेमदासा स्टेडियमवर धावसंख्या उभारणे हाच विजयाचा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जात आहे. त्यामुळे आजच्या भारत-पाक महामुकाबल्यात नाणेफेक अत्यंत कळीची भूमिका बजावेल.

शाहीन आफ्रिदीचा धसका नको

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सुरुवातीच्या षटकांत 'डेमोलिशन मॅन' मानले जात असले, तरी भारताविरुद्धची त्याची टी-२० आकडेवारी मात्र वेगळेच चित्र मांडत आहे. शाहीनने आतापर्यंत भारताला काही धक्के दिले असले, तरी सातत्यपूर्ण भेदक मारा करण्यात तो अपयशी ठरल्याचे दिसून येते.

शाहीनची भारताविरुद्धची आकडेवारी

मर्यादित यश : ६ सामन्यांत २१.५ षटके टाकून त्याने केवळ ५ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी ३५.४० आणि इकॉनॉमी ८.१० इतकी असून, ती फारशी प्रभावी वाटत नाही.

स्ट्राईक रेटचा अभाव : भारताविरुद्ध शाहीनला विकेट मिळवण्यासाठी सरासरी २६ चेंडू खर्च करावे लागतात. पॉवरप्लेमध्ये मोठी पडझड करणाऱ्या गोलंदाजासाठी हा स्ट्राईक रेट सामान्य मानला जातो.

विजयाचे सूत्र : आकडेवारीनुसार, जर भारतीय फलंदाजांनी शाहीनची सुरुवातीची २ षटके सावधपणे खेळून काढली आणि विकेट गमावली नाही, तर त्यानंतर भारतीय फलंदाज त्याच्यावर सहजपणे धावा कुटतात.

शाहीनच्या सुरुवातीच्या स्पेलचा बचाव करणे हीच भारताची खरी रणनीती असेल. ही २ षटके सुरक्षितपणे पार पाडली, तर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याकडे कूच करू शकतो.

पाकिस्तानविरुद्ध पंड्या भारताचा 'ट्रम्प कार्ड'

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात अष्टपैलू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा 'एक्स-फॅक्टर' ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये हार्दिकची कामगिरी नेहमीच सरस राहिली असून, विशेषतः त्याच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला आहे.

हार्दिकची पाकिस्तान विरुद्ध प्रभावी कामगिरी

भेदक गोलंदाजी : ९ सामन्यांत १५ बळी घेणाऱ्या हार्दिकची सरासरी १४.६० इतकी उत्कृष्ट आहे. प्रत्येक ११ चेंडूंवर तो एक गडी बाद करतो, जे या हाय-व्होल्टेज संघर्षात अत्यंत दुर्मिळ मानले जाते. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३ धावांत ८ विकेट्स अशी आहे.

भरवशाची फलंदाजी : फलंदाजीत त्याने ७ डावांत ९८ धावा केल्या असून, प्रतिकूल परिस्थितीत त्याने अनेकदा संयमी खेळ केला आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ४० असून त्याने ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले आहेत.

जेव्हा जेव्हा भारतीय संघ दबावाखाली असतो, तेव्हा हार्दिक पंड्या 'प्रेशर वॉल्व्ह'प्रमाणे काम करून सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवतो. आजच्या सामन्यातही त्याच्या अष्टपैलू खेळावर सर्वांच्या नजरा असतील.

प्रेमदासा स्टेडियमचे समीकरण: पॉवरप्लेमधील विकेट्स ठरणार निर्णायक

आर. प्रेमदासा स्टेडियमवरील सामन्यांच्या आकडेवारीवरून एक महत्त्वाचा कल समोर आला आहे. येथे पॉवरप्लेमध्ये (पहिली ६ षटके) केवळ धावा करणे पुरेसे नसून, विकेट्स टिकवणे हे विजयासाठी सर्वात महत्त्वाचे सूत्र ठरत आहे.

मैदानाची सांख्यिकी काय सांगते?

झिम्बाब्वेची सरशी: झिम्बाब्वेने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ४७ धावा केल्या आणि अखेर १६९ धावांपर्यंत मजल मारून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा पराभव : याउलट, ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या ४.३ षटकांतच ४ महत्त्वाचे फलंदाज गमावले. परिणामी, पॉवरप्लेमध्ये ३८ धावा असूनही त्यांचा डाव १४६ धावांत आटोपला.

आयर्लंडचा संघर्ष : आयर्लंडने ४५ धावांची वेगवान सुरुवात केली, मात्र ३.२ षटकांत पडलेल्या विकेटमुळे त्यांच्यावर दबाब वाढला आणि पाठलाग कठीण झाला.

प्रेमदासा स्टेडियमवर जर संघाने पॉवरप्लेमध्ये विकेट्स राखून ठेवल्या, तर १६० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणे किंवा उभारणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांसाठी सुरुवातीची ६ षटके अत्यंत कळीची ठरतील.

रोहित-विराटविना सामना

२००७ नंतर पहिल्यांदाच भारत-पाक टी-२० विश्वचषक सामन्यात रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांपैकी कोणीही नसेल.

पाऊस ठरणार का 'व्हिलन'?

श्रीलंकेत पावसाचा धोका नेहमीच असतो, विशेषतः पावसाळ्यात. मात्र, गेल्या ३६ तासांपासून कोलंबोतील हवामान फारसे आशादायक नाही. सामन्याच्या सुरुवातीला उशीर होण्याची किंवा वारंवार खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एक जमेची बाजू म्हणजे, प्रेमदासा स्टेडियमचे ग्राऊंड स्टाफ अतिशय कार्यक्षम असून त्यांनी संपूर्ण मैदान कव्हरने झाकून सुरक्षित ठेवले आहे. येथील उत्तम निचरा प्रणालीमुळे सामना खेळवण्याच्या आशा कायम आहेत.

महामुकाबल्यासाठी सारे काही थांबले!

जेव्हा भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येतात, तेव्हा जगातील इतर सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर हा हाय-व्होल्टेज सामना अखेर पार पडत आहे. गेल्या २० दिवसांतील घडामोडी पाहता, हा सामना केवळ एक खेळ नसून त्याला अनेक पदर आहेत. आज सर्वांच्या नजरा टीव्हीकडे खिळल्या आहेत; सोमवारचा मूड काय असेल, हे आज रात्री १२ वाजेपूर्वीच स्पष्ट होईल.

'नो-हँडशेक' धोरण आणि मैदानाबाहेरील चर्चा

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून भारताने हे 'नो-हँडशेक' धोरण स्वीकारले आहे. त्यावेळी या निर्णयावरून मोठा वादंग निर्माण झाला होता आणि पाकिस्तानने आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली होती. आजच्या सामन्यापूर्वी या विषयाची चर्चा खुद्द सामन्यापेक्षाही जास्त होताना दिसली. टीम इंडिया आपल्या निर्णयावर ठाम असल्याने आता पाकिस्तान याला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पावसाचा लपंडाव आणि आव्हाने

कोलंबोमध्ये सूर्यप्रकाश आणि ढगांचा खेळ सुरू आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे अद्याप धोका टळलेला नाही. काळवंडलेले ढग प्रेमदासा स्टेडियमच्या दिशेने सरकत आहेत. आजचा सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय पूर्ण होणे हा एक चमत्कारच ठरेल. त्यातच भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासूनचा तणाव कायम असल्याचे दिसत आहे.

भारतीय संघ काही वेळातच मैदानात दाखल होईल. नाणेफेकीसाठी दोन तास शिल्लक असताना पावसाने विश्रांती घेतल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. जरी ढगाळ वातावरण आणि प्रचंड आर्द्रतेमुळे तापमान प्रत्यक्ष आकड्यांपेक्षा जास्त भासत असले, तरी पावसाचे चिन्ह नसल्याने सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित लढत आज (दि. १५) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. स्टेडियमची दारे उघडताच चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करण्यास सुरुवात केली. सध्या आकाश ढगाळ असून हवेत दमटपणा जाणवत असला, तरी सुदैवाने अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT