स्पोर्ट्स

IND vs PAK : 0, 0, 0, 0,..! अभिषेक शर्माच्या नावे 'गोल्डन डक'चा नकोसा विक्रम, मोडला रोहित-कोहलीचा विक्रम

Abhishek Sharma Bad Record : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणाच्या 2 सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक जगातील तिसरा खेळाडू.

रणजित गायकवाड

कोलंबो : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. पोटातील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अभिषेकला मैदानात मात्र नशिबाची साथ लाभलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात ४ चेंडूंचा सामना करूनही त्याला खाते उघडता आले नाही आणि तो सलमान आगाचा शिकार ठरला.

अभिषेकच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आपल्या पहिल्या-वहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा आशिष नेहरा आणि बांगलादेशचा इमरुल कायस यांच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम होता. विशेष म्हणजे, सध्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अभिषेकच्या या कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली.

मागील ६ डावांत ४ वेळा 'शून्य'

अभिषेक शर्माची मागील काही सामन्यांतील आकडेवारी त्याच्या प्रतिभेला साजेशी राहिलेली नाही. त्याने मागील सहा डावांत केवळ ९८ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या सहा पैकी चार डावांत तो शून्यावर बाद झाला असून, त्यातील तीन वेळा तो पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) माघारी परतला आहे. त्याची मागील सहा डावांतील धावसंख्या ०, ०, ३०, ०, ६८*, ० अशी राहिली आहे.

अभिषेकने मोडला रोहित-कोहलीचा विक्रम; गंभीर-दुबे यांच्या पंक्तीत स्थान

पाकिस्तानविरुद्ध शून्यावर बाद होताच अभिषेक शर्माने भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत काही नकारात्मक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

१. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 'डक' :

एकाच वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने युसूफ पठाण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मागे टाकले आहे, जे एका वर्षात प्रत्येकी ३ वेळा शून्यावर बाद झाले होते.

  • संजू सॅमसन : ५ वेळा (२०२४)

  • अभिषेक शर्मा: ४ वेळा (२०२६)

  • रोहित/कोहली/सूर्यकुमार: ३ वेळा

२. विश्वचषकात सर्वाधिक वेळा ‘डक’

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीयांच्या यादीत अभिषेक आता शिवम दुबे, रवींद्र जडेजा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

  • आशिष नेहरा : ३ वेळा (३ डाव)

  • अभिषेक शर्मा: २ वेळा (२ डाव)

  • विराट कोहली: २ वेळा (३३ डाव)

३. सलामीवीर म्हणून नकोसा विक्रम

टी-२० विश्वचषकात सलामीवीर म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेकने आता गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे. गंभीर आणि कोहली देखील प्रत्येकी दोन वेळा सलामीवीर म्हणून शून्यावर बाद झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT