स्पोर्ट्स

Sanju Samson : 97*, 89, 89... सॅमसनचा अर्धशतकी 'हॅटट्रिक' धमाका! विराट कोहलीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘वर्ल्डकप विक्रम’ काढला मोडीत

ind vs nz t20 world cup 2026 final

रणजित गायकवाड

sanju samson creates history he break virat kohli's big record ind vs nz t20 world cup 2026 final

अहमदाबाद : साबरमतीच्या तीरावर वसलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज क्रिकेटच्या इतिहासातील एक सोनेरी पान लिहिले गेले. ज्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका सौंदर्याचा नमुना होता, त्या संजू सॅमसनने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले. केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर सलग तीन अर्धशतकांचा 'हॅटट्रिक' धमाका करून संजूने जागतिक क्रिकेटमध्ये आपला एक वेगळाच दरारा निर्माण केला आहे.

विराट-आफ्रिदीच्या पंगतीत संजूचा 'राजेशाही' प्रवेश

मिचेल सँटनरच्या चेंडूवर एक धाव घेत जेव्हा संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांच्या जल्लोषाचा एखाद्या ज्वालामुखीसारखा स्फोट झाला. टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीमध्ये उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही महामुकाबल्यांत अर्धशतकी झंझावात निर्माण करणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने भारताचा 'रन मशीन' विराट कोहली आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी यांच्या पंगतीत एन्ट्री घेतली.

दहा वर्षांच्या 'विराट' विक्रमाची अखेर!

२०१६ च्या विश्वचषकात विराट कोहलीने ३१९ धावांचा जो डोंगर उभा केला होता, तो आजवर अभेद्य वाटत होता. मात्र, संजूच्या बॅटमधून आज जो निखारा निघाला, त्यात हा विक्रम भस्मसात झाला. संजूने केवळ ५ सामन्यांत ३२१ धावांचा टप्पा गाठून भारतासाठी एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान पटकावला. ८९ धावांच्या त्या प्रलयंकारी खेळीने न्यूझीलंडच्या स्वप्नांचा पार धुव्वा उडवला.

मैदानात जिव्हाळा, डगआऊटमध्ये जल्लोष

संजूने जेव्हा हा इतिहास रचला, तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने डगआऊटमध्ये उभे राहून एखाद्या सच्च्या नायकासारखी त्याला दाद दिली, तर इशान किशनने मैदानातच त्याला मिठी मारून या यशाचा आनंद द्विगुणित केला. ८९ धावांची ही खेळी केवळ आकडेवारी नव्हती, तर संजूच्या 'विराट' पुनरागमनावर शिक्कामोर्तब करणारी ती एक गर्जना होती. रविवारीच्या रात्री अहमदाबादच्या आकाशात फक्त संजू नावाचाच सूर्य तळपत होता आणि त्याच्या तेजापुढे किवी गोलंदाजांची धार पूर्णपणे निस्तेज झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT