स्पोर्ट्स

IND vs NZ T20 मालिकेदरम्यान समोर आली वाईट बातमी! स्टार वेगवान गोलंदाज पुढील ३ सामन्यांमधून बाहेर, संघात मोठे बदल

रणजित गायकवाड

क्राइस्टचर्च : भारताविरुद्ध सलग दोन टी-२० सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मालिकेत संघ आधीच ०-२ असा पिछाडीवर असताना, दुसरीकडे वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. उर्वरित सामन्यांसाठी गोलंदाजीच्या फळीत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, याचा मोठा फटका अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला बसला आहे. हेन्री आता या चालू टी-२० मालिकेत उर्वरित सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यानंतर गोलंदाजांचा शारीरिक ताण नियंत्रित ठेवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. हेन्रीने दुसऱ्या सामन्यात अवघी दोन षटके गोलंदाजी केली होती; मात्र पोटरीच्या स्नायूंमध्ये ताण जाणवू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

कर्णधार मिचेल सँटनरनेही या वृत्ताला दुजोरा देत त्याला स्नायूंच्या ताणाचा त्रास असल्याचे स्पष्ट केले. हेन्री सध्या क्राइस्टचर्च येथेच मुक्कामी राहणार असून, २ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये तो एकदिवसीय संघात सामील होईल. उभय संघांमधील पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

दुसऱ्या बाजूला, धडाकेबाज वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन देखील तिसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान सावधगिरीचा उपाय म्हणून फर्ग्युसन मैदानाबाहेर गेला होता. तथापि, तो या मालिकेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. तिसऱ्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे होणाऱ्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी तो संघात पुनरागमन करेल. याखेरीज, काइल जेमिसनला मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळणार नाही. चालू टी-२० मालिकेत तो अद्याप एकाही सामन्यात मैदानात उतरलेला नाही. वेलिंग्टनमधील तिसऱ्या सामन्यानंतर जेमिसन तिथेच थांबून बेसिन रिझर्व्ह मैदानावर कॅन्टरबरी संघाकडून 'फोर्ड ट्रॉफी'चा सामना खेळणार आहे. त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय संघात रुजू होईल.

या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडने वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात फेरबदल करत ब्लेअर टिकनरचा मालिकेतील अखेरच्या तिन्ही सामन्यांसाठी संघात समावेश केला आहे, तर जोश क्लार्कसन शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाशी जोडला जाईल. विशेष म्हणजे, झॅक फॉल्क्स आणि मार्क चॅपमन दुखापतग्रस्त झाल्यानंतर या दोघांचा १६ सदस्यीय चमूत पर्यायी खेळाडू म्हणून आधीच समावेश करण्यात आला होता. याशिवाय, मॅट फिशर तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत वेलिंग्टनला रवाना होणार आहे. याव्यतिरिक्त जेकब डफी, नॅथन स्मिथ आणि ॲडम मिल्ने हे गोलंदाजही संघात उपलब्ध असून, गरजेनुसार त्यांचा वापर केला जाणार आहे.

सध्या न्यूझीलंड संघ टी-२० मालिकेत ०-२ असा पिछाडीवर असल्याने त्यांच्यासमोर पुनरागमनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या दृष्टीने वेलिंग्टन येथे होणारा तिसरा सामना संघासाठी निर्णायक ठरणार असून, पराभवाची मालिका खंडित करत मालिकेत टिकून राहण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असेल. टी-२० मालिकेनंतर दोन्ही देशांदरम्यान पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या व्यस्त वेळापत्रकानंतर न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, तिथे त्यांना चार कसोटी सामने खेळायचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT