भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने सध्या ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून, मालिकेतील शेवटचे दोन सामने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे खेळवले जाणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज क्रिस्टियन क्लार्क आणि टिम रॉबिन्सन यांना संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं की, ‘‘क्लार्क आणि रॉबिन्सन मायदेशी परतणार असून त्यांच्या जागी जिमी नीशम, लॉकी फर्ग्युसन आणि टिम सीफर्ट आता संघात सामील झाले आहेत. तसेच, 'बिग बॅश लीग'मध्ये (BBL) खेळत असलेला सलामीवीर फिन ॲलन २७ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरममध्ये संघाशी जोडला जाईल.’’
२४ वर्षीय क्रिस्टियन क्लार्कने २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते. मात्र, आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने ४ षटकांत ४० धावा देत केवळ एक बळी मिळवला. दुसरीकडे, टिम रॉबिन्सनने मालिकेतील पहिल्या सामन्यात १५ चेंडूंत २१ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्यांच्या जागी मॅट हेन्री आणि टिम सीफर्ट यांना संधी देण्यात आली. एका सामन्यातील अपयशानंतर या दोन्ही खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज फिन ॲलन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या 'बिग बॅश लीग'मध्ये त्याने पर्थ स्कॉचर्सकडून खेळताना ११ सामन्यांत ४६६ धावा कुटल्या. या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. त्याच्या समावेशामुळे न्यूझीलंडची फलंदाजी अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीनेही ॲलनची कामगिरी महत्त्वाची ठरेल.
आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांत भारतीय संघाने किवी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने १५४ धावांचे लक्ष्य अवघ्या १० षटकांत पूर्ण करून एकतर्फी विजय मिळवला होता. २८ आणि ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांतही विजयी घोडदौड कायम राखण्याचा टीम इंडियाचा मानस असेल, तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सन्मानजनक पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल.