स्पोर्ट्स

IND vs NZ 1st T20 LIVE : भारताचा न्यूझीलंडवर 48 धावांनी धमाकेदार विजय

IND vs NZ T20 Series

रणजित गायकवाड

भारताने दिलेल्या २३९ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने कडवी झुंज दिली, मात्र विजयाचे शिखर गाठण्यात त्यांना अपयश आले. भारताच्या बलाढ्य फलंदाजीमुळे मिळालेल्या मोठ्या धावसंख्येच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना सहज खिशात टाकला.

ग्लेन फिलीप्साची एकाकी झुंज

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर डेव्हन कॉनवे पहिल्याच षटकात अर्शदीपचा शिकार झाला. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलीप्साने वादळी फलंदाजी करत भारतीय गोटात घबराट निर्माण केली होती. फिलीप्साने क्लीन हिट्स मारत वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह सारख्या दिग्गज गोलंदाजांवरही हल्ला चढवला. जोपर्यंत फिलीप्सा आणि चॅपमन खेळत होते, तोपर्यंत न्यूझीलंड सामन्यात कायम होते. मात्र, हे दोघे बाद होताच किवींचा डाव पत्त्यासारखा कोसळला.

गोलंदाजीतील 'हिरो'

पुन्हा एकदा अर्शदीपने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. सुरुवातीलाच महत्त्वाची विकेट घेत त्याने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. तो आजच्या विजयाचा प्रमुख सूत्रधार ठरला.

दुसरीकडे भारताचा हुकमी एक्का असलेला बुमराह आज काहीसा लयीत नसल्याचे दिसले. त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमीसारखी धार दिसली नाही, जे भारतीय चाहत्यांसाठी चिंतेचे कारण ठरू शकते.

विजयानंतरही भारतासाठी 'धोक्याची घंटा'!

सामना जरी भारताने जिंकला असला, तरी क्षेत्ररक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही अतिशय सोपे झेल सोडले. तज्ज्ञांच्या मते, द्विपक्षीय मालिकेत या चुका दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात, मात्र विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत अशा चुका भारताला महागात पडू शकतात. भारताच्या फलंदाजीच्या जोरावर हा विजय सुकर झाला असला, तरी गोलंदाजीतील बुमराहची लय आणि क्षेत्ररक्षणातील चुका यावर टीम इंडियाला काम करावे लागणार आहे.

शिवम दुबेची 'डबल' शिकार

फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेल्या शिवम दुबेने गोलंदाजीमध्ये आपली कसर भरून काढली आहे. डावाच्या शेवटच्या षटकात शिवम दुबेने लागोपाठ दोन चेंडूंवर न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडून भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केला.

१९.३ षटक : डॅरिल मिचेलचा अडथळा दूर

मिचेलने भारतासाठी डोकेदुखी ठरण्याचा प्रयत्न केला होता, पण दुबेने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. दुबेने ऑफ-स्टंपच्या बाहेर 'हाफ-व्हॉली' चेंडू टाकला. मिचेलने तो उडवण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकले. लॉग-ऑफला उभ्या असलेल्या राखीव खेळाडू रवी बिश्नोईने आपल्या डाव्या बाजूला धावत जात सीमारेषेच्या अगदी जवळ एक सुरेख झेल टिपला.

मिचेलची खेळी : २८ धावा (१८ चेंडू).

१९.४ वे षटक : 'गोल्डन डक'वर क्लार्क बाद

मिचेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस्टियन क्लार्कला दुबेने खातंही उघडू दिलं नाही. दुबेने बाहेरच्या बाजूला 'फुल टॉस' चेंडू टाकला. क्लार्कने तो जोरात मारला, पण चेंडू थेट लॉग-ऑनला उभ्या असलेल्या रिंकू सिंहच्या हातात विसावला. रिंकूने कोणताही चूक न करता हा सोपा झेल टिपला आणि दुबेने 'हॅट्ट्रिक'ची संधी निर्माण केली. दुबेच्या या कामगिरीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी टाळ्या वाजवून खेळाडूंचे आणि विशेषतः रवी बिश्नोईच्या सीमारेषेवरील त्या झेलचे कौतुक केले.

वरुण चक्रवर्तीचा 'दुसरा' तडाखा

ग्लेन फिलिप्स बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशा मार्क चॅपमनवर टिकून होत्या. मात्र, भारताचा 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्तीने चॅपमनला बाद करून किवी संघाच्या संघर्षावर पाणी फेरले आहे. १४.५ षटकांत न्यूझीलंडला पाचवा मोठा धक्का बसला. चॅपमनला मोठे फटके मारण्याशिवाय पर्याय नव्हता, आणि हीच संधी वरुणने साधली. वरुणने यष्टींच्या रेषेत चेंडू टाकला. चॅपमनने चेंडू हवेत उडवण्यासाठी क्रीजच्या बाहेर पाऊल टाकले, पण त्याचे टायमिंग चुकले. चेंडू बॅटवर नीट न लागल्याने थेट आकाशात उडाला. लॉन्ग-ऑनवरून धावत आलेल्या अभिषेक शर्माने चेंडूवर नजर टिकवून ठेवत एक सोपा झेल टिपला.

चॅपमनची खेळी : ३९ धावा (२४ चेंडू, ४ चौकार आणि २ षटकार).

फिलिप्सचं 'वादळ' शमलं

न्यूझीलंडला विजयाच्या आशा दाखवणारा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स अखेर बाद झाला आहे. अक्षर पटेलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून भारताचा विजय सुकर केला आहे. १३.३ षटकांत फिलिप्स बाद झाल्याने न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.

७८ धावांची झुंजार खेळी संपुष्टात

ग्लेन फिलिप्सने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी केली होती. त्याने अवघ्या ४० चेंडूत ७८ धावा (४ चौकार आणि तब्बल ६ गगनभेदी षटकार) फटकावल्या. अक्षरने मधल्या यष्टीवर वेगवान (Flat) चेंडू टाकला. फिलिप्सने बॅकफूटवर जाऊन 'पुल' मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉन्ग-ऑनच्या दिशेने वेगाने गेला, तिथे तैनात असलेल्या शिवम दुबेने चेंडूवर आपली नजर कायम ठेवत जमिनीच्या जवळ एक सुरेख झेल टिपला.

फिलिप्स ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होता, ते पाहता तो सामना खेचून नेतो की काय, अशी भीती वाटत होती. मात्र, अक्षरने ही महत्त्वाची विकेट घेत टीम इंडियाला सामन्यात पूर्णपणे वर्चस्व मिळवून दिले आहे.

ग्लेन फिलिप्सचं अर्धशतक

न्यूझीलंडचे तीन आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर ग्लेन फिलिप्सने एका बाजूने किल्ला लढवत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर टिकून राहत फिलिप्सने किवी संघाच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. डावाच्या १०.४ षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फिलिप्सने आपल्या पन्नास धावा पूर्ण केल्या. बुमराहने वेगात बदल करत 'ऑफ-कटर' शॉर्ट चेंडू टाकला. फिलिप्सने संयम राखत चेंडूची वाट पाहिली आणि तो थर्ड मॅनच्या दिशेने ढकलून आपली १ धाव पूर्ण केली. एका बाजूने विकेट्स पडत असताना फिलिप्सने संयम आणि आक्रमकता यांचा योग्य मेळ घालत हे महत्त्वाचे अर्धशतक झळकावले आहे. १०.४ षटकांनंतर न्यूझीलंडने सन्मानजनक धावसंख्येकडे कूच केली, तरी भारताने दिलेले २३९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फिलिप्सला आता मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागणार आहे.

वरुण चक्रवर्तीची 'गूगली' पडली भारी

वेगवान गोलंदाजांनी दिलेल्या धक्क्यांनंतर आता भारताच्या फिरकीची जादू सुरू झाली आहे. 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्तीने आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या टिम रॉबिन्सनला बाद करून पाहुण्या संघाच्या अडचणीत भर घातली. ६.३ षटकांत न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ४२ धावा अशी झाली.

असा रचला चक्रव्यूह!

टिम रॉबिन्सन खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता, पण वरुणच्या हुशारीसमोर त्याचे काही चालले नाही. वरुणचा चेंडू ओळखण्यात रॉबिन्सनने चूक केली. तो मोठा फटका मारण्यासाठी क्रीजच्या बाहेर सरसावला, पण चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू बॅटच्या आतील कडेला लागून हवेत उडाला आणि मिड-विकेटला उभ्या असलेल्या शिवम दुबेने एक अतिशय सोपा झेल टिपला.

रॉबिन्सनची खेळी : २१ धावा (१५ चेंडू, २ चौकार आणि १ षटकार).

थोडक्यात काय तर... रॉबिन्सनला चेंडू सीमापार धाडायचा होता, मात्र वरुणच्या फिरकीने त्याला पूर्णपणे चकित केले. भारताने आता सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

हार्दिकची 'सीम' मूव्हमेंट आणि अभिषेकचा झेल

डावाच्या दुसऱ्याच षटकात हार्दिकने रचिन रवींद्रला आपल्या जाळ्यात ओढले. हार्दिकने टाकलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळला. रचिनने पुढे सरसावून सरळ रेषेत फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा कोन आणि हालचाल ओळखण्यात तो चुकला. रचिनच्या बॅटची जाड कडा घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने वेगाने गेला. स्लिपमध्ये तैनात असलेल्या अभिषेक शर्माने आपल्या डाव्या बाजूला वाकत एक सुरेख झेल टिपला. रचिन केवळ १ धाव काढून माघारी परतला. अवघ्या १.३ षटकांत न्यूझीलंडची अवस्था २ बाद २ धावा अशी झाली. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर किवी फलंदाज पूर्णपणे हतबल दिसत आहेत.

सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, 'या खेळपट्टीवर किती धावा पुरेशा असतील?' जुन्या आकडेवारीनुसार येथे १५० धावांचे आव्हानही कठीण मानले जात होते. मात्र, आज भारतीय फलंदाजांनी हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरवत २३८ धावांचा डोंगर उभा केला आहे.

जुन्या डेटाला धाब्यावर बसवणारी फलंदाजी

मैदानावरील खेळपट्टी २०२४ मध्ये नव्याने तयार करण्यात आली होती, त्यामुळे जुनी आकडेवारी पूर्णपणे अप्रासंगिक ठरली. खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय पोषक असल्याचे अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगच्या फटकेबाजीवरून स्पष्ट झाले.

'सूर्या'ची रणनीती आणि 'दव' फॅक्टर

नाणेफेक हरल्यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादव अजिबात चिंतेत नव्हता. त्याने स्पष्ट केले की, भारतीय संघाने अलीकडच्या काळात प्रथम फलंदाजी करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे टॉस हरल्याचा फारसा परिणाम झाला नाही. दवामुळे गोलंदाजी करणे कठीण जाते, हे ओळखून भारताने २० धावांचे 'जादा लक्ष्य' ठेवले होते. म्हणजेच १८० धावा पुरेशा असल्या तरी, दवाचा फॅक्टर विचारात घेऊन भारताने २००+ धावांचे लक्ष्य साध्य केले आहे.

थोडक्यात काय तर... भारताने केवळ न्यूझीलंडच्या गोलंदाजांचाच नव्हे, तर दुसऱ्या डावात येणाऱ्या दवाचाही विचार करून ही धावसंख्या उभारली आहे. २३९ धावांचे हे आव्हान पार करण्यासाठी किवींना अशक्य कोटीतील कामगिरी करावी लागेल.

'रिंकू'नामा! शेवटच्या षटकात डॅरिल मिचेलची पिसं काढली

ज्याची चहते आतुरतेने वाट पाहत होते, तो 'रिंकू सिंह शो' आज नागपुरात पाहायला मिळाला. डावाच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंहने न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅरिल मिचेलला लक्ष्य करत धावांचा पाऊस पाडला आणि भारताला ७ बाद २३८ या मजबूत धावसंख्येवर पोहोचवले.

शेवटच्या षटकाचा थरार : ६, ६, ०, wd, ४, ०, ४

न्यूझीलंडने शेवटच्या षटकासाठी डॅरिल मिचेलच्या हातात चेंडू सोपवला, पण रिंकूने त्याचे स्वागत आपल्या खास शैलीत केले. पहिल्याच चेंडूवर रिंकूने पुढे सरसावत 'साईटस्क्रीन'च्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूवर मिचेलचा संथ चेंडू ओळखून रिंकूने तो मिड-विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर धाडला. सलग दोन षटकार बसल्याने मिचेल इतका दबावाखाली आला की त्याने एक वाईड चेंडू टाकला. षटक संथ गतीने टाकल्यामुळे न्यूझीलंडला शिक्षा म्हणून एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत ठेवावा लागला होता, ज्याचा पूर्ण फायदा रिंकूने घेतला. चौथ्या चेंडूवर रिंकूने फाइन लेगला आणि शेवटच्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार ठोकत डावाचा शानदार शेवट केला.

१९.३ व्या षटकावेळी मिचेलने चेंडू ऑफ-स्टंपच्या खूप बाहेर टाकला होता. तो स्पष्टपणे वाईड असतानाही पंच नितीन मेनन यांनी तो वाईड दिला नाही, ज्यामुळे रिंकू काहीसा संतापलेला दिसला. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याने चौकार मारून आपला राग शांत केला.

रिंकू सिंहने केवळ २० चेंडूत ४४ धावा कुटल्या (४ चौकार, ३ षटकार). त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २३९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.

टी-२० मध्ये ४४ व्यांदा द्विशतक; भारत जगातील नंबर १ संघ

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा मैदानात धावांचा पाऊस पाडत इतिहास रचला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिक धावांची धावसंख्या उभारण्याचा ४४ वा विक्रम भारताने आपल्या नावावर केला आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा २०० धावांचा आकडा गाठणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे.

भारताचा दबदबा: कोणत्या संघाविरुद्ध किती वेळा २००+?

भारताने जगभरातील जवळपास सर्वच बलाढ्य संघांच्या गोलंदाजीची पिसं काढली आहेत. भारताने नोंदवलेल्या ४४ द्विशतकी धावसंख्येचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

दक्षिण आफ्रिका : ८ वेळा

ऑस्ट्रेलिया : ७ वेळा

श्रीलंका : ६ वेळा

न्यूझीलंड आणि इंग्लंड : ५ वेळा

वेस्ट इंडिज, आयर्लंड, अफगाणिस्तान : ३ वेळा

बांगलादेश : २ वेळा

झिम्बाब्वे, नेपाळ : १ वेळा

अक्षर पटेलही 'सॉफ्ट डिस्मिसल'चा शिकार

भारताची धावसंख्या २०० च्या पार गेल्यानंतरही एकामागून एक गडी बाद होण्याचे सत्र सुरूच राहिले. आता अष्टपैलू अक्षर पटेल स्वस्तात माघारी परतला असून, न्यूझीलंडच्या युवा गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर चांगलाच लगाम लावला आहे.

पदार्पणवीर क्लार्कची पहिली शिकार

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या क्रिस्टियन क्लार्कने अक्षर पटेलला आपल्या फिरकीवजा संथ चेंडूच्या जाळ्यात ओढले. क्लार्कने चेंडूचा वेग कमी करून तो 'फुल लेन्थ' टाकला. अक्षरने लॉन्ग-ऑफवरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण फटक्यात हवी तशी ताकद नव्हती. सीमारेषेवर उभ्या असलेल्या डॅरिल मिचेलने आपल्या उजव्या बाजूला सरकत अतिशय सहज झेल टिपला.

अक्षरची खेळी : ५ धावा (५ चेंडू).

अक्षरने मारलेला फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या सूर्यकुमार यादवला वाटले होते की चेंडू सीमारेषेबाहेर जाईल, मात्र संथ चेंडूमुळे तो चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला.

डावाच्या अखेरच्या षटकांत धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी खांद्यावर असतानाच, भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या बाद झाला आहे. जेकब डफीने आपल्या चतुराईने हार्दिकला माघारी धाडत भारताच्या 'फिनिशिंग'ला मोठा धक्का दिला आहे. १५.४ षटकांत भारताची अवस्था ५ बाद १६६ धावा अशी झाली आहे.

पंड्या बाद होण्यामागे डफीची रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरली. डफीने वेगावर नियंत्रण मिळवत 'ऑफ-कटर' टाकला. हार्दिकने पुढचा पाय बाजूला सारून मिड-विकेटवरून जोरात 'पुल' मारण्याचा प्रयत्न केला. संथ चेंडूमुळे उसळी वाढली आणि चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला. डीप मिड-विकेटला उभ्या असलेल्या मार्क चॅपमनने सीमारेषेच्या आत उडी मारत एक सुरेख झेल टिपला.

हार्दिकची खेळी : २५ धावा (१६ चेंडू, ३ चौकार आणि १ षटकार).

डफीने आज ज्या पद्धतीने ईशान किशनला बाद केले होते, अगदी त्याच 'बाउन्सी' चेंडूवर त्याने हार्दिकलाही बाद केले. वेगवान आणि संथ अशा दोन्ही चेंडूंवर त्याने भारतीय फलंदाजांना नाचवले आहे.

दुबेचा 'फ्लॉप शो'!

अभिषेक शर्माने तयार करून दिलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यास शिवम दुबे अपयशी ठरला. मोठ्या फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबेला कायले जेमिसनने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत माघारी धाडले. १३.४ षटकांत भारताला चौथा धक्का बसला असून संघाची धावसंख्या १४७ धावांवर पोहोचली.

जेमिसनने टाकलेला 'शॉर्ट ऑफ लेन्थ' चेंडू खेळपट्टीवर थोडा रेंगाळून आला. दुबेने चेंडू फ्लिक करण्यासाठी बॅटचे तोंड लवकर बंद केले, ज्यामुळे चेंडू बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. चेंडू हवेत बराच काळ राहिल्याने जेमिसनला स्वतःच्या उजव्या बाजूला सरकून झेल पकडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.

दुबेची खेळी: ९ धावा (४ चेंडू, १ षटकार).

दुबे अशा प्रकारे बाद झाल्याने नॉन-स्ट्राईकर एंडला उभा असलेला हार्दिक पंड्या प्रचंड निराश दिसला.

भारतीय फलंदाज आज वारंवार एकच चूक करत आहेत. खेळपट्टी संथ असल्याने चेंडू बॅटवर येण्याची वाट न पाहता घाईने फटके मारणे टीम इंडियाला महागात पडत आहे.

अभिषेक शर्माची ३५ चेंडूत ८४ धावांची तडाखेबंद खेळी

दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर भारतीय डावाला सावरणारा आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढणारा अभिषेक शर्मा अखेर बाद झाला आहे. ईश सोढीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात अभिषेकने आपली विकेट गमावली, मात्र त्याआधी त्याने टीम इंडियाला अतिशय मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे. अभिषेक शर्माने आज केवळ फलंदाजी केली नाही, तर मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने ५ चौकार आणि तब्बल ८ गगनभेदी षटकार ठोकले.

सोढीचा चेंडू 'स्लॉट'मध्ये होता, पण फटका मारताना अभिषेकच्या हातात बॅट फिरली. चेंडू हवेत उंच उडाला आणि लॉन्ग-ऑनला उभ्या असलेल्या कायले जेमिसनने कोणताही चूक न करता झेल टिपला. अभिषेक बाद होऊन परतत असताना न्यूझीलंडचा अनुभवी फिरकीपटू ईश सोढी स्वतः त्याच्याकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून या शानदार खेळीचे कौतुक केले. ही खिलाडूवृत्ती पाहून नागपूरच्या प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात अभिषेकला निरोप दिला.

सूर्याची एक्झिट! सँटनरच्या फिरकी जाळ्यात अडकला

अभिषेक शर्माच्या वादळी फटकेबाजीमुळे भारतीय संघ सुस्थितीत असतानाच, न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरने टीम इंडियाचा मोठा झटका दिला. भारतीय डावाच्या ११ व्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मैदानावर सूर्या स्थिरावला आहे असे वाटत असतानाच सँटनरने पुन्हा एकदा आपली जादू चालवली. टी-२० क्रिकेटमध्ये सँटनरने सूर्यकुमारला बाद करण्याची ही चौथी वेळ आहे. सँटनर समोर आला की सूर्याची बॅट शांत होते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. सँटनरने टाकलेला चेंडू स्टंपवर फुल लेन्थ होता. सूर्याने तो हवेत खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट टिम रॉबिन्सनच्या हातात गेला.

सूर्याची खेळी : ३२ धावा (२२ चेंडू, ४ चौकार आणि १ षटकार).

दोन धक्के बसल्यानंतर टीम इंडिया दबावाखाली येईल असे वाटले होते, पण युवा सलामीवीर अभिषेक शर्माने मैदानावर धावांचा पाऊस पाडत न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत मिळून अभिषेकने डावाला गती दिली आणि अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अभिषेकचे 'ऐतिहासिक' अर्धशतक

अभिषेक शर्माने आज न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने के.एल. राहुल (२३ चेंडू) आणि रोहित शर्मा (२३ चेंडू) यांचा विक्रम मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक वेळा (८ वेळा) ५० धावा करण्याचा पराक्रमही त्याने नावावर केला असून, त्याने फिल सॉल्ट आणि स्वतः सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.

ग्लेन फिलिप्सला फोडला घाम: एका षटकात २० धावा

डावाच्या ८ व्या षटकात अभिषेकने पार्ट-टाइम गोलंदाज ग्लेन फिलिप्सवर अक्षरशः हल्ला चढवला. या षटकाच्या पहिल्या, दुस-या आणि तिस-या चेंडूंवर सलग तीन चौकार ठोकले. ७.४व्या षटकात एक धाव घेत अभिषेकने ७ वे टी-२० अर्धशतक पूर्ण केले.

सूर्याचा पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार

लागोपाठ दोन विकेट्स पडल्यामुळे टीम इंडियावर दडपण येईल असे वाटत असतानाच, मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले. मैदानात येताच त्याने दाखवलेला आक्रमक पवित्रा न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

पहिल्याच चेंडूवर 'SKY'चा तडाखा!

जेकब डफीने ईशान किशनला बाद केल्यानंतर लगेचच सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. डफीने सूर्याचे स्वागत करण्यासाठी 'शॉर्ट ऑफ लेन्थ' चेंडू टाकला, पण सूर्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्याने क्रीजवर येताच कोणताही वेळ न दवडता बॅकफूटवर जाऊन चेंडूला जमिनीला समांतर ठेवत कव्हरच्या दिशेने शानदार चौकार ठोकला. चेंडू गॅपमध्ये शोधताच तो इतक्या वेगाने सीमारेषेबाहेर गेला की क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधीही मिळाली नाही. या चौकाराने सूर्याने स्पष्ट केले की, विकेट्स पडल्या असल्या तरी तो आपला आक्रमक खेळ सोडणार नाही.

ईशान किशन स्वस्तात माघारी

संजू सॅमसन पाठोपाठ भारताचा दुसरा सलामीवीर ईशान किशनही स्वस्तात बाद झाला. यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या उंचीचा फायदा घेत भारतीय फलंदाजांना 'सॉफ्ट डिस्मिसल' अर्थात सहज झेल देण्यास भाग पाडले. २.५ षटकांत भारताची अवस्था २ बाद २२ धावा अशी झाली.

कसा बाद झाला ईशान?

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ईशानने दोन चौकार मारून आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, जेकब डफीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो चुकला. डफीच्या चेंडूचा सामना करण्यासाठी ईशान पुढे सरसावला, पण डफीने आपल्या उंचीचा फायदा घेत चेंडूला अतिरिक्त उसळी दिली. चेंडू बॅटच्या मधोमध न लागता वरच्या भागाला लागला आणि हवेत तरंगला. कव्हरला उभ्या असलेल्या मार्क चॅपमनने कोणताही चूक न करता ईशानचा सोपा झेल टिपला.

ईशानची खेळी : ८ धावा (५ चेंडू, २ चौकार).

सॅमसन आणि किशन या दोन्ही स्फोटक फलंदाजांनी खेळपट्टीच्या 'बाउन्स'चा अंदाज घेण्यात चूक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः मैदानात उतरला असून संपूर्ण जबाबदारी त्याच्या आणि अभिषेक शर्माच्या खांद्यावर आहे.

टीम इंडियाला बसला पहिला झटका

भारताच्या डावाची दमदार सुरुवात करणारा सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या १० धावांवर माघारी परतला. दोन खणखणीत चौकार मारून संजू मोठ्या खेळीचे संकेत देत असतानाच, कायले जेमिसनने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. भारताला १.५ षटकांतच पहिला धक्का बसला.

जेमिसनच्या दुसऱ्या षटकात संजूने दोन चौकार ठोकून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाचव्या चेंडूवर जेमिसनने 'लेन्थ'मध्ये थोडा बदल केला. संजूने चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू थेट रचिन रवींद्रच्या हातात विसावला. संजूने मारलेला शॉट इतका 'सॉफ्ट' होता की त्याला स्वतःलाही विश्वास बसला नाही.

संजूची खेळी : १० धावा (७ चेंडू, २ चौकार).

आदल्या चेंडूंवर मार खाल्ल्यानंतर जेमिसनने संजूला बाद करून जोरात जल्लोष केला. बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना संजू स्वतःवरच निराश दिसला. कदाचित तो चेंडू हवेतून अधिक ताकदीने मारता आला असता, अशी खंत त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत : संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड : टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा थरार आजपासून सुरू झाला आहे. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात किवी कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आता प्रथम फलंदाजी करून पाहुण्यांसमोर डोंगरासारखे लक्ष्य ठेवण्यासाठी मैदानात उतरेल.

सूर्याची रणनीती : दव फॅक्टर आणि फलंदाजीचे आव्हान

टॉसवेळी कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘रात्री ८:३० च्या सुमारास दव पडत असल्याने आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. मात्र, प्रथम फलंदाजी करतानाही आम्ही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे बोर्डावर मोठी धावसंख्या झळकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’

भारतीय संघातून कोण बाहेर?

सर्वात धक्कादायक म्हणजे श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना आजच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये स्थान मिळालेले नाही.

पहिल्या टी-२० सामन्यात खेळपट्टी ठरणार 'खलनायक'?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा बिगुल आज वाजला आहे. नागपूर येथे रंगलेल्या या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांना चांगलीच घाम फोडण्याची शक्यता आहे.

खेळपट्टीचा नवा अवतार, पण जुनेच आव्हान?

या मैदानाचा 'स्क्वेअर' २०२४ मध्ये पूर्णपणे नव्याने तयार करण्यात आला असून, त्यानंतरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. खेळपट्टीची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. जुने रेकॉर्ड पाहता येथे मोठी धावसंख्या उभारणे कठीण जाते. यावेळीही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खेळपट्टीवर ३ ते ४ मिमी गवत ठेवण्यात आले आहे, जे दिसायला उत्तम आहे. मात्र, त्याच्या आजूबाजूला असलेल्या भेगा फिरकीपटूंना मदत करू शकतात.

मैदानाचे गणित

साईड बाउंड्री : ६६ मीटर

समोरची बाउंड्री : ७६ मीटर

तज्ज्ञांचा कल : हा सामना हाय-स्कोअरिंग न होता गोलंदाजांच्या वर्चस्वाचा ठरू शकतो. सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू खेळपट्टीवर कसा वागतो, यावरच सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

सूर्यकुमारच्या फॉर्ममुळे टीम इंडियाची चिंता वाढली!

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे जगातील नंबर १ चा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव याचा हरवलेला फॉर्म. ऑक्टोबर २०२४ पासून सूर्याची बॅट शांत असल्याने चाहत्यांच्या आणि संघ व्यवस्थापनाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

सूर्याची आकडेवारी काय सांगते?

गेल्या काही महिन्यांत सूर्यकुमारच्या कामगिरीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर २०२४ पासून २२ डावांमध्ये सूर्याला केवळ २४४ धावा करता आल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण कालावधीत त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलेले नाही. आगामी जागतिक स्पर्धेपूर्वी कर्णधाराचा हा फॉर्म भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

ईशान किशनला नवी जबाबदारी

फलंदाजीच्या क्रमाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत सूर्यकुमार यादवने स्वतः एका पत्रकार परिषदेत मोठे संकेत दिले आहेत. फॉर्मात असलेला डावखुरा फलंदाज ईशान किशन आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. स्वतः सूर्यकुमार आपल्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर खेळणे सुरू ठेवणार आहे. फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल न करता याच कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार असल्याचे कर्णधाराने स्पष्ट केले आहे.

थोडक्यात काय तर... ईशानच्या रूपाने तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक पर्याय मिळाल्यामुळे सूर्याला स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी थोडा वेळ आणि मोकळीक मिळण्याची शक्यता आहे.

टी-२० विश्वचषकाची 'ड्रेस रिहर्सल' मानली जाणारी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. विश्वचषकापूर्वी संघाची योग्य बांधणी आणि खेळाडूंच्या चाचपणीसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडे ही शेवटची संधी असेल. या मालिकेतून भारताच्या संघ रचनेत काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत.

कर्णधार सूर्याचा फॉर्म चिंतेचा विषय भारतीय संघासाठी सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवचा ढासळलेला फॉर्म. ऑक्टोबर २०२४ पासून खेळलेल्या गेल्या २२ डावांमध्ये सूर्याला केवळ २४४ धावा करता आल्या असून, यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. भारताच्या आक्रमक फलंदाजीच्या धोरणावर त्याच्या या खराब फॉर्मचा थेट परिणाम होताना दिसत आहे. विश्वचषकापूर्वी कर्णधाराने लयीत परतणे भारतीय संघासाठी अत्यंत आवश्यक आहे.

इशान किशनला संधी

तिलक वर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणाऱ्या इशानसाठी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असेल. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारख्या स्फोटक फलंदाजांच्या उपस्थितीत, भारतीय संघ पहिल्या षटकापासूनच किवी गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

न्यूझीलंडचे तगडे आव्हान

मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ भारतासमोर कडवे आव्हान उभे करू शकतो. डेव्हन कॉनवे, डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांसारख्या अनुभवी फलंदाजांमुळे त्यांची फलंदाजी भक्कम दिसते. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडने २१ पैकी १३ सामने जिंकत या फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व राखले आहे.

हार्दिक पंड्या-जसप्रित बुमराहची वापसी

एकदिवसीय मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिकच्या येण्याने संघाचे संतुलन सुधारले आहे, तर बुमराहच्या पुनरागमनाने गोलंदाजीची धार वाढली आहे. तसेच, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'मिस्ट्री पॅकेज' ठरू शकतो. मधल्या षटकांत त्याची फिरकी सामन्याचे चित्र पालटण्यास सक्षम आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य ११ खेळाडू

भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

न्यूझीलंड : टिम रॉबिन्सन, डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मायकेल ब्रेसवेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, मॅट हेन्री, जेकब डफी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT