स्पोर्ट्स

IND vs NZ : भारतीय ‘सलामी’चा जागतिक विश्वविक्रम! अभिषेक-सॅमसनची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी

Team India RecordT20 World Cup 2026

रणजित गायकवाड

IND vs NZ T20 World Cup 2026 Abhishek Sharma Sanju Samson record

अहमदाबाद : साबरमतीच्या तीरावर रविवारी धावांचा असा काही पूर आला की त्यात न्यूझीलंडचे गोलंदाज वाहून गेले. टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणसंग्रामात भारतीय फलंदाजांनी केवळ बॅट चालवली नाही, तर इतिहासाच्या पानावर आपल्या पराक्रमाची मोहोर उमटवली. अवघ्या ७.२ षटकांत शंभरी गाठत भारताने विश्वचषकाच्या बाद फेरीत शतकाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

सलामीचा 'सुवर्ण' अध्याय; किवींचे आव्हान पोरखेळ ठरले

मैदानावर उतरताच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धुरळा उडवला. अवघ्या २४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी रचत या जोडीने १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. २००७ पासून आजवर एकाही संघाच्या सलामीवीरांना विश्वचषकाच्या फायनलमध्ये पन्नास धावांची भागीदारी करता आली नव्हती; पण आज या युवा जोडीने तो 'अशक्य' वाटणारा टप्पा लीलया पार केला.

पाकिस्तानी विक्रम 'धुळीस'; अभिषेकचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर!

या ऐतिहासिक खेळीने पाकिस्तानचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला. २००९ च्या फायनलमध्ये कामरान अकमल आणि शाहझैब हसन यांनी केलेली ४८ धावांची भागीदारी आता इतिहासजमा झाली असून, संजू-अभिषेकच्या नावे सर्वोच्च सलामीच्या भागीदारीची नोंद झाली आहे. विशेषतः अभिषेक शर्माने टीकेच्या झोड उठवणाऱ्यांची तोंडे आपल्या १८ चेंडूंतील वादळी अर्धशतकाने कायमची बंद केली. ज्या वेळी संघाला त्याची नितांत गरज होती, त्याच वेळी त्याने आपली 'रुद्र' कळा दाखवली.

'शतकी' स्वप्न हुकले, पण न्यूझीलंडची दाणादाण उडाली!

संजू आणि अभिषेकने ४३ चेंडूंत ९८ धावांची जी तुफानी फटकेबाजी केली, त्याने विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये शतकी सलामी मिळणार असे वाटत होते. मात्र, अभिषेक बाद झाल्याने ही भागीदारी केवळ २ धावांनी हुकली. जरी हे शतकी स्वप्न अधुरे राहिले असले, तरी भारताने ७.५ षटकांचा न्यूझीलंडचाच जुना विक्रम मोडीत काढून ७.२ षटकांत सांघिक शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT