नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज ऋषभ पंतने विजय हजारे करंडक स्पर्धेत अगदीच निराशा केल्यानंतर याचे प्रतिबिंब आगामी संघनिवडीत उमटण्याची दाट चिन्हे आहेत. सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेतून वगळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर लवकरच संघनिवड जाहीर होणे अपेक्षित आहे.
यापूर्वी ओडिशाविरुद्धच्या विजय हजारे चषक लढतीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतला केवळ 24 धावा जमवता आल्या. यातही तो धावा जमवण्यासाठी सातत्याने झगडताना दिसून आला.
ऋषभ पंतचा यापूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी भारताच्या वन डे संघात समावेश होता. मात्र, त्याला भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्येे स्थान मिळाले नव्हते. संघ व्यवस्थापनाने मधल्या फळीत त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांना पसंती दर्शवली होती.
यादरम्यान, द. आफ्रिकेविरुद्ध संधी मिळाली नसली तरी सध्याचा फॉर्म पाहता पंतला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ईशान किशनला पंतऐवजी संघात स्थान मिळू शकते, अशी चिन्हे आहेत.
या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर, ऋषभ पंतकडे आपल्या टीकाकारांना उत्तर देण्याची आणि न्यूझीलंड मालिकेसाठी आपली दावेदारी कायम ठेवण्याची सुवर्णसंधी होती. तथापि, ओडिशाविरुद्धच्या सामन्यात तो अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. तो 28 चेंडूंत 24 धावा काढून बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार बिपलाब समांत्रायच्या अर्धशतकी खेळीच्या आणि गोविंद पोद्दार व तळाच्या फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर ओडिशाने 272 धावांचे सन्मानजनक लक्ष्य उभारले. प्रत्युत्तरात, दिल्लीने प्रियांश आर्य आणि सार्थक रंजन यांच्या महत्त्वाच्या विकेट्स झटपट गमावल्या, त्यानंतर पंत केवळ 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावाच करू शकला. अकराव्या षटकात देबब्रत प्रधानने त्याला बाद केले.
ऋषभ पंतसाठी सध्या सुरू असलेली विजय हजारे करंडक स्पर्धा फारशी चांगली राहिलेली नाही. आंध्रविरुद्ध त्याने एक आकडी धावसंख्या नोंदवत स्पर्धेची निराशाजनक सुरुवात केली होती. गुजरातविरुद्ध त्याने 79 चेंडूंत 70 धावांची खेळी केली असली तरी, त्यानंतर सौराष्ट्र आणि ओडिशाविरुद्धच्या सलग 2 सामन्यांतील अपयशाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी निवडीच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.
ODI
11 जानेवारी : पहिली वन डे : दु. 1.30 वा. : बडोदा
14 जानेवारी : दुसरी वन डे : दु. 1.30 वा. : राजकोट
18 जानेवारी : तिसरी वन डे : दु. 1.30 वा. : इंदोर
T20
21 जानेवारी : पहिली टी20 : सायं. 7 वा. : नागपूर
23 जानेवारी : दुसरी टी20 : सायं. 7 वा. : रायपूर
25 जानेवारी : तिसरी टी20 : सायं. 7 वा. : गुवाहाटी
28 जानेवारी : चौथी टी20 : सायं. 7 वा. : विशाखापट्टणम
31 जानेवारी : पाचवी टी20 : सायं. 7 वा. : तिरुवनंतपूरम