बडोदा : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर आणि 'हिटमॅन' अशी ओळख असणा-या रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने क्रिकेट विश्वात असा पराक्रम केला आहे, जो आजवर कोणत्याही खेळाडूला जमलेला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितने २९ चेंडूंत २६ धावांची खेळी केली. या छोट्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन शानदार षटकार ठोकले. या दोन षटकारांच्या जोरावर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२० मिळून) आपल्या ६५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ६५० षटकार मारणारा रोहित हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे.
रोहितने या सामन्यात केवळ ६५० षटकारांचा टप्पाच गाठला नाही, तर त्याने 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा मान आता रोहित शर्माकडे गेला आहे. सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर आता ३२९ षटकार जमा झाले आहेत, तर ख्रिस गेलने ३२८ षटकार मारले होते.
रोहित शर्मा : ३२९
ख्रिस गेल : ३२८
सनथ जयसूर्या : २६३
मार्टिन गुप्टिल : १७४
सचिन तेंडुलकर : १६७