स्पोर्ट्स

IND vs NZ ODI मालिकेदरम्यान संघाला दुहेरी झटका! दोन दिग्गज खेळाडू बाहेर

क्रिकेट बोर्डाला संघात तातडीने मोठे बदल करावे लागले आहेत

रणजित गायकवाड

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान किवी संघाच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतलेली असतानाच, न्यूझीलंडच्या गोटातून चिंतेची बातमी समोर आली आहे. संघातील दोन प्रमुख वेगवान गोलंदाज उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडले असून, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला संघात तातडीने मोठे बदल करावे लागले आहेत.

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पोटरीच्या दुखापतीमुळे (काफ इंज्युरी) मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे, तर वेलिंग्टन येथील एकदिवसीय सामन्यादरम्यान डोक्यावर चेंडू लागल्यामुळे ब्लेयर टिकनरला पुढील सात दिवस मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. दरम्यान, सलामीवीर डेव्हन कॉनवे आधीच दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला असल्याने न्यूझीलंडची संघरचना पूर्णपणे कोलमडली आहे.

क्रिकेट बोर्डाकडून संघात मोठे फेरबदल

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन टी-२० मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. दुसरीकडे, टिकनरच्या डोक्याला झालेल्या दुखापतीतून त्याला आराम मिळाला असला, तरी आयसीसीच्या 'कन्कशन' नियमांनुसार त्याला पुढील सात दिवस विश्रांती घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे तो पुढील दोन्ही सामन्यांत खेळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू क्रिस्टियन क्लार्कचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात पुनरागमन करणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कसोटी मालिकेची तयारी आणि खेळाडूंची अदलाबदल

नियोजित वेळापत्रकानुसार मॅट हेन्री आणि काइल जेमिसन यांना तिसऱ्या सामन्यानंतर वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या कसोटी शिबिरात सहभागी व्हायचे होते; मात्र दुखापतींच्या सत्रामुळे हे दोघेही आता चौथ्या सामन्यापर्यंत वनडे संघासोबतच थांबणार आहेत. तसेच मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आणखी दोन नव्या खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे. दुसरीकडे, आगामी कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीसाठी टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स आणि नाथन स्मिथ हे पाच खेळाडू तिसरा सामना संपल्यानंतर लगेचच, म्हणजेच बुधवारी वेलिंग्टनकडे रवाना होणार आहेत.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, काइल जेमिसन, निक केली, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट, नाथन स्मिथ आणि विल यंग.

चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, निक केली, टिम सायफर्ट आणि विल यंग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT