IND vs NZ ODI India vs New Zealand Clash Heats Up
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेला पुढील महिन्यापासून सुरुवात होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या आयसीसी क्रमवारीवर नजर टाकणे औचित्यपूर्ण ठरेल. लवकरच न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही संघांचे रँकिंग पाहता ही मालिका अत्यंत चुरशीची आणि रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय क्रिकेट संघ नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेने करणार आहे. ११ जानेवारीपासून या तीन सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळेल. सध्या कोणतीही मोठी आयसीसी स्पर्धा नसली, तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात परतणार असल्याने या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरच संघ निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि न्यूझीलंडच्या आयसीसी क्रमवारीचा विचार केल्यास, दोन्ही संघ एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. सध्याच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघ १२१ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ असून त्यांचे ११३ रेटिंग पॉइंट्स आहेत. जरी टीम इंडियाच्या पहिल्या स्थानाला तूर्तास कोणताही धोका नसला, तरी आगामी मालिकेत न्यूझीलंडने सरशी मिळवल्यास ते भारताच्या रेटिंग पॉइंट्सच्या अधिक जवळ पोहोचू शकतात.
पहिल्या दोन क्रमांकांव्यतिरिक्त इतर संघांचा विचार केल्यास, ऑस्ट्रेलियन संघ १०९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान १०५ रेटिंगसह चौथ्या, तर श्रीलंका १०० रेटिंगसह पाचव्या स्थानावर कायम आहे. चालू वर्ष म्हणजेच २०२५ मध्ये आता अन्य कोणतेही वनडे सामने नियोजित नसल्यामुळे या क्रमवारीत सध्या बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, पुढील वर्षी जेव्हा संघ पुन्हा मैदानात उतरतील, तेव्हा या क्रमवारीत मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.