स्पोर्ट्स

IND vs NZ 2nd Test : निर्णायक कसोटीत टीम इंडियाची 'अग्निपरीक्षा'; सिराज-जडेजाला कट्ट्यावरच बसावे लागणार?

मालिका विजयासाठी टीम इंडिया करावे लागणार जोरदार प्रयत्न

रणजित गायकवाड

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि निर्णायक सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मालिकेचा विजेता कोण ठरणार, याचा फैसला आता आगामी सामन्यातच होणार आहे.

ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशा परिस्थितीत, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये काही बदल केले जातील की मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा संघाबाहेर राहावे लागेल, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

सिराज-जडेजाला वगळल्याने उठले होते टीकेचे मोहोळ

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ जेव्हा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर क्रीडा वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि अनेक माजी दिग्गज खेळाडूंनीही या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पहिला सामना अनिर्णित राहिला असला, तरी या सामन्यात अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांना खेळण्याची संधी मिळाली होती. मोहम्मद सिराजला संघाबाहेर का ठेवण्यात आले, याबाबत संघ व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, कंबोज आणि आकाश दीप हे सिराजपेक्षा अधिक उपयुक्त फलंदाजी करू शकतात, या विचारामुळेच त्यांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

सुंदर आणि आकाश दीप यांच्या जागेवर टांगती तलवार

दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला संधी मिळणार की नाही, याचे उत्तर २७ नोव्हेंबर रोजी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील तेव्हाच स्पष्ट होईल. जर सिराजचा अंतिम संघात समावेश करण्यात आला, तर त्याच्या जागी कोणाला बाहेर बसावे लागेल, हे सांगणे सध्या कठीण आहे. तरीही, आकाश दीप आणि अंशुल कंबोज या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दुसरीकडे, पहिल्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने प्रसिद्ध कृष्णाच्या स्थानाबाबत साशंकता होती, परंतु संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असल्याने त्याला वगळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. तसेच, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाल्यास वॉशिंग्टन सुंदरला अंतिम संघातून बाहेर जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ

यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज किंवा मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT