स्पोर्ट्स

IND vs NZ 2nd T20 : रायपूरमधील दुसरी टी-२० लढत रद्द होणार? चाहत्यांच्या मनात चिंतेचे ढग

India vs New Zealand Raipur T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज रायपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे.

रणजित गायकवाड

रायपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज, २३ जानेवारी रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली असून, पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४८ धावांनी मात केली होती. मात्र, या दुसऱ्या लढतीपूर्वी हवामानातील बदलांमुळे चाहत्यांच्या मनात चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

दिल्ली-एनसीआर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील या हवामान बदलाचा परिणाम रायपूरमधील सामन्यावरही होईल का? असा प्रश्न आता क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

कसे असेल रायपूरचे हवामान?

'ॲक्यूवेदर'च्या अहवालानुसार, रायपूरमध्ये सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, तर संध्याकाळी तापमानात किंचित घट होऊ शकते. विशेष म्हणजे, रायपूरमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी असून दिवसभर कडक ऊन असेल. ताशी ८ किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज असून, हवामान खात्याच्या मते पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नाही. त्यामुळे चाहत्यांना पूर्ण ४० षटकांच्या खेळाचा आनंद घेता येईल.

पिच रिपोर्ट : फलंदाज की गोलंदाज, कोणाचे पारडे जड?

शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमची खेळपट्टी सहसा फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. खेळपट्टी सपाट असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो, परिणामी येथे हाय-स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

तथापि, या मैदानाच्या सीमा भारतातील इतर मैदानांच्या तुलनेत मोठ्या आहेत. याचा फायदा फिरकीपटूंना मधल्या षटकांमध्ये होऊ शकतो. तसेच, चेंडूच्या वेगात वैविध्य राखणारे वेगवान गोलंदाजही येथे प्रभावी ठरू शकतात.

मैदानाचा इतिहास आणि टॉसचे महत्त्व

रायपूरच्या या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला आहे. २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या त्या सामन्यात भारताने १७४ धावांचा बचाव करत २० धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ आजच्या सामन्यातही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल.

हा सामना संध्याकाळी खेळला जाणार असल्याने 'टॉस' अत्यंत निर्णायक ठरेल. रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवबिंदूंचा विचार करता, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT