स्पोर्ट्स

U-19 World Cup Final : विक्रमी सहाव्या विजेतेपदासाठी भारत सज्ज, इंग्लंडशी होणार जेतेपदासाठी झुंज

IND vs ENG U19 World Cup final

रणजित गायकवाड

हरारे : विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या निर्धाराने भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 6) इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात मैदानात उतरेल. धडाकेबाज फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत या फायनलमध्ये प्रबळ दावेदार मानला जात आहे. सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. विशेषतः, कर्णधार आयुष म्हात्रे आणि सलामीवीर आरोन जॉर्ज लयीत परतल्याने भारताची बाजू भक्कम झाली आहे.

भारताची फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली असून, फायनलमध्येही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे मॅनी लुम्सडेन (15 बळी) सारखा घातक वेगवान गोलंदाज आणि बेन मेयस (399 धावा) सारखा फॉर्मात असलेला फलंदाज आहे.

भारतीय संघ (अंडर 19) : आयुष म्हात्रे (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, हरवंश पांगलिया, मोहम्मद इनान, उद्धव मोहन, किशन कुमार सिंग.

इंग्लंड संघ (अंडर 19) : थॉमस रीव्ह (कर्णधार/यष्टिरक्षक), बेन डॉकिन्स, जोसेफ मुर्स, बेन मेयेस, कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, इसाक मोहम्मद, ल्यूक हँडस्‌‍, विल बेनिसन, अली फारूक.

इतिहास भारताच्या बाजूने

भारतीय संघ 10 व्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2022 मध्येही भारताने इंग्लंडलाच हरवून जेतेपद पटकावले होते. यापूर्वी भारताने 5 वेळा हे जेतेपद पटकावले आहे. भारत सहाव्यांदा विश्वविजेता होण्यासाठी मैदानात उतरेल, तर इंग्लंड दुसऱ्यांदा (1998 नंतर) चषक उंचावण्याचा प्रयत्न करेल. या दोन्ही संघांमधील मागील रेकॉर्ड पाहता भारताचे पारडे जड आहे. आतापर्यंत 55 सामन्यांपैकी 41 सामने भारताने जिंकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT