निमिष पाटगावकर
कुठचीही मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर पुढचे 24 तास जसे महत्त्वाचे असतात, तसे हेडिंग्ले कसोटीत चौथ्या दिवशी पहिले सत्र आपल्यासाठी महत्त्वाचे होते. लीड्सची हवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोज बदलणार्या मतांसारखी लहरी झाली आहे. पहिले तीन दिवस गर्मी आणि पावसाचा शिडकावा झाल्यावर चौथ्या दिवशी सोसाट्याचा वारा सुटला होता. ताशी 30 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते आणि खेळपट्टीच्या गुडलेंग्थ टप्प्याच्या आसपास काही बारीक भेगा तयार झाल्या होत्या.
भारताची नाबाद जोडी राहुल आणि गिलसमोर मोठे आव्हान होते, ते या हवेत तग धरून पहिले सत्र खेळून काढायचे. प्रथमग्रासे मक्षिकापात व्हावा, तसे दिवसाच्या पहिल्या चषटकात ब्रायडन कार्सने कर्णधार गिलला बाद केले. पाचव्या स्टम्पवरचा चेंडू कट करायचा मोह गिल आवरू शकला नाही. गिलचा हा हुकमी फटका असला, तरी कार्सचा चेंडू खेळपट्टीच्या त्या बारीक भेगा असलेल्या भागात टप्पा पडून अचानक आत आला आणि गिलचा घात करून केला. कार्सला उत्तम लय सापडली होती.
खेळपट्टीचा आणि वार्याचा तो उत्तम उपयोग करून घेत होता. पहिल्या डावातील शतकवीर जैस्वाल आणि गिल स्वस्तात बाद झाल्यावर हे महत्त्वाचे सत्र आपण पार करणार की नाही, या शंकेची पाल चूकचुकायला लागली; पण के. एल. राहुल एका बाजूला खंबीरपणे उभा होता. तिसर्या दिवशी खेळ संपल्यावर इंग्लंडच्या ऑली पोपची मुलाखत समालोचक दिनेश कार्तिक घेताना त्याने विचारले होते, भारताचा कुठचा बळी महत्त्वाचा आहे? एका क्षणाचाही विलंब न करता पोपने राहुलचे नाव घेतले होते. व्हॅटिकनच्या पोपसारखे हे मैदानातल्या पोपचे बोलही देववाणीसारखे खरे ठरले.
शुभमन गिल बाद झाल्यावर उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात आला. त्याने पहिल्या डावात जशी सुरुवात केली. तशीच सुरुवात करायला तो गेला आणि वोक्सचा पहिलाच चेंडू पुढे सरसावून मारायला गेला. त्याच्या आणि भारताच्या नशिबाने बॅटची कड लागून हा चेंडू पहिल्या स्लिपच्या हातात न जाता डोक्यावरून सीमापार झाला.
वरकरणी ऋषभ पंतचे हे खेळणे बेफिकिरीचे वाटत होते आणि त्या वेळेला तो बाद झाला असता, तर पूर्ण मालिका असे बाद होण्याबद्दल चर्चा झाली असती. या क्षणी तो फटका खरंच ‘स्टुपिड..स्टुपिड.. स्टुपिड’ प्रकारातला होता; पण ऋषभ पंतची मानसिकता समजून घेतली, तर तो काय करत होता याचे आकलन होते. गिल बाद झाल्यामुळे इंग्लंड दिवसाच्या पहिल्या षटकापासूनच वरचढ ठरले असते आणि दडपणाखाली खेळताना भारताला डोके वर काढायची संधीच मिळाली नसती.
ऋषभ पंतने वार्याचा उपयोग करत फटके मारायचा प्रयत्न केला; पण तो फसत आहे, हे बघितल्यावर त्याने स्वतःला समजावले. ऋषभ पंतकडे कसोटी सामन्याचे उत्तम तंत्र आहे. तेव्हा त्याने त्याच्या मनाला समजावल्यावर त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमक वृत्तीला मुरड घालून राहुलला साथ दिली. या सर्व ऋषभ पंतच्या सुरुवातीच्या काळजाचा थरकाप उडवणार्या प्रयत्नात राहुल आपले सर्व फटके म्यान करून बसला. जेव्हा पंतची गाडी रुळावर आली, तेव्हा मात्र या जोडीने भारतीय गोटात आत्मविश्वास परत मिळवून दिला.
उपहाराला आपण सकाळपासून दोन तासात फक्त 63 धावा काढल्या; पण मुख्य म्हणजे गिलव्यतिरिक्त बळी गमावला नाही. उपहारानंतरचे सत्र हे पुन्हा सामान्यची दिशा ठरवणारे होते. भारताला सामना जिंकायचे प्रयत्न करायचे, तर कमीत कमी साडेतीनशे धावांचे लक्ष्य, इंग्लंडचा डाव बाद करायला पुरेसा वेळ आणि मुख्य म्हणजे दुसरा नवा चेंडू बुमराहच्या हातात मिळण्याइतकी षटके मिळणे गरजेचे आहे. यासाठी आता धावा वेगाने जमवायची गरज होती. हे शिवधनुष्य पंत आणि राहुलने उचलायचे ठरविले आणि भारताचा धावफलक हलता ठेवला.
उपहाराला भारताने 47.3 षटकांत 153 धावांची मजला मारली होती; पण पुढच्या 25 षटकांत पाचच्या सरासरीने सव्वाशे धाव काढल्या. राहुलचे शतक म्हणजे कलात्मक फलंदाजीचा नजराणा होता. एक जीवदान सोडले, तर त्याची फलंदाजी द़ृष्ट लागण्यासारखी होती. त्याचे कव्हर ड्राईव्हज, कटस् लोण्यातून सुरी फिरावी त्या सफाईने क्षेत्ररक्षकांच्यामधून सीमापार होत होते. दुसरीकडे ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीचा पाचवा गिअर टाकला आणि इंगलंडची गोलंदाजी सामान्य वाटायला लागली.
इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करायची याचा आदर्श राहुलने घालून दिला. त्याचे हे 9 वे शतक आणि त्यातली 8 शतके त्याने बाहेर म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, द. आफ्रिका आणि श्रीलंकेत काढली आहेत.
ऋषभ पंतने सामान्यातले दुसरे शतक काढल्यावर विक्रमादित्य सुनील गावसकरच पंतला कोलांटी उडी मारायची विनंती करत होते. हा एक मजेशीर विरोधाभास होता; पण ‘स्टुपिड.. स्टुपिड.. स्टुपिड’ची जागा ‘सुपर्ब.. सुपर्ब.. सुपर्ब’ ने घेतली होती. पंतने कोलांटी उडी मारली नाही, हे बरेच केले. कारण, त्याने जे हावभाव केले त्यावरून मानेच्या स्नायूंबद्दल तो बोलत असावा. अभ्यास करून झाल्यावर वाटेल तितके खेळायला जायची मुभा जशी आई देते तसे शतक झाल्यावर पंत सुटल्यासारखा खेळला. या फटकेबाजीत तो बाद झाला; पण तोपर्यंत इंग्लंड बॅकफूटवर गेले होते.