IND vs ENG Shubman Gill
नवी दिल्ली : शुभमन गिलच्या क्रिकेट कारकिर्दीतील एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून लीड्स येथे सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर २५ वर्षीय शुभमन गिल कसोटी संघाची धुरा सांभाळणार आहे. यासोबतच भारतीय क्रिकेटच्या एका नव्या युगाचा आरंभ होत आहे. लीड्स कसोटीपूर्वी गिलचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. हा त्याच्या शाळेत असतानाचा फोटो आहे.
शुभमन गिलचा हा फोटो पंजाब क्रिकेट असोसिएशनने शेअर केला असून तो आता व्हायरल होत आहे. असोसिएशनने लीड्स कसोटीच्या एक दिवस आधी गुरुवारी गिलचा किशोरवयीन वयातील फोटो एक्सवर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. हा फोटो गिल १२-१४ वर्षांचा असतानाचा असावा, अशी शक्यता आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशनने लिहिले की, 'पंजाबच्या मातीपासून भारतीय क्रिकेटच्या शिखरापर्यंत, पंजाब क्रिकेट असोसिएशनचा मुलगा शुभमन गिल आता देशाचे कसोटी कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. हा प्रवास कधीच नशिबाचा नव्हता, तो नियतीचा होता. तुझी निवड झाली आहे. आणि उद्या, एका नव्या परंपरेची सुरुवात होईल. संपूर्ण पंजाब तुझ्या पाठीशी उभा आहे. आता जगाला दाखवून दे की तू तो मुकुट का परिधान केला आहेस.’
शुभमन गिल भारताच्या कसोटी इतिहासातील पाचवा सर्वात तरुण कर्णधार आहे. त्याच्या आधी भारताच्या कसोटी संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती होती, त्याने गेल्या महिन्यात अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. हिटमॅनच्या निवृत्तीनंतर ५ दिवसांनी विराट कोहलीनेही कसोटीला अलविदा म्हटले. त्यानंतर निवड समितीने गिलची भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवड केली.