स्पोर्ट्स

IND vs ENG Semi Final : टीम इंडियाला फायनलपूर्वीच मोठा धोका..! सेमीफायनल खेळण्याआधीच होणार ‘टाटा बाय बाय..’

T20 World Cup 2026 : पावसामुळे खेळ खोळंबला तर ICC चे नियम नेमके काय सांगतात, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

रणजित गायकवाड

येत्या काही दिवसांत टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार शिगेला पोहोचणार आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार बलाढ्य संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यांवर पावसाचे सावट आले तर काय? चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या धडधडी वाढवणारा हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. पावसामुळे खेळ खोळंबला तर आयसीसी (ICC) चे नियम नेमके काय सांगतात, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

खेळ रंगणार की पाऊस बँड वाजवणार? जाणून घ्या 'हे' कडक नियम

सेमीफायनलचे सामने पावसामुळे विस्कळीत झाले, तर निकालासाठी आयसीसीने विशेष नियमावली तयार केली आहे.

१०-१० ओव्हर्सचा खेळ अनिवार्य

साधारण टी-२० सामन्यात ५-५ ओव्हर्सचा खेळ झाला तरी निकाल दिला जातो. मात्र, विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी नियम वेगळे आहेत. सेमीफायनलचा निकाल लागावा यासाठी दोन्ही डावांत किमान १०-१० ओव्हर्सचा खेळ होणे बंधनकारक आहे. जर पाऊस जास्त असेल आणि १० ओव्हर्सचाही खेळ शक्य नसेल, तरच पुढच्या पर्यायांचा विचार केला जाईल.

'रिझर्व्ह डे'चे संरक्षण

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही सेमीफायनलसाठी आयसीसीने 'रिझर्व्ह डे' ठेवला आहे. जर नियोजित दिवशी खेळ १०-१० ओव्हर्सचा होऊ शकला नाही, तर तो सामना रिझर्व्ह डे ला पूर्ण केला जाईल.

मैदान ओले राहिल्यास कोणाचे नशीब चमकणार?

जर दुर्दैवाने रिझर्व्ह डे ला देखील पाऊस थांबला नाही आणि सामना रद्द करावा लागला, तर मात्र समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. अशा परिस्थितीत सुपर-८ मधील कामगिरी निर्णायक ठरेल.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला लॉटरी

सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिका (ग्रुप ए) आणि इंग्लंड (ग्रुप बी) आपापल्या गटात अव्वल स्थानी होते. त्यामुळे सामना रद्द झाल्यास नियमानुसार हे दोन्ही संघ थेट फायनलचे तिकीट मिळवतील.

भारत आणि न्यूझीलंडला मोठा फटका

भारतीय संघ आणि न्यूझीलंड आपापल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे पाऊस पडला आणि सामना झाला नाही, तर टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT