स्पोर्ट्स

Sanju Samson वर्ल्डकपचा नवा ‘सिक्सर किंग’! हिटमॅन रोहितचा विक्रम काढला मोडीत, थेट कोहलीशी साधली बरोबरी

IND vs ENG semifinal T20 World Cup 2026

रणजित गायकवाड

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना संजू सॅमसनने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. सॅमसनने खेळलेल्या ८९ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात हा हाय-व्होल्टेज सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला संजू सॅमसनने पुन्हा एकदा सावरले. त्याने केवळ ४२ चेंडूंत ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे त्याने रोहित शर्माचा विक्रम तर उद्ध्वस्त केलाच, पण एका खास बाबतीत विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली.

एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज

या विश्वचषकाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरी केल्यामुळे संजू सॅमसनचे अंतिम ११ मधील स्थान धोक्यात होते. सुपर-८ फेरीपूर्वी त्याला केवळ एकच संधी मिळाली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनचे संघात पुनरागमन झाले आणि त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत सॅमसनने रोहित शर्माचा 'एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार' मारण्याचा भारतीय विक्रम मोडला आहे. सॅमसनने या स्पर्धेत अवघ्या ४ सामन्यांत १६ षटकार ठोकले आहेत. यापूर्वी २०२४ च्या विश्वचषकात रोहित शर्माने १५ षटकार मारले होते.

एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू:

  • संजू सॅमसन : १६ षटकार (२०२६)

  • रोहित शर्मा : १५ षटकार (२०२४)

  • शिवम दुबे : १५ षटकार (२०२६)

  • ईशान किशन : १४ षटकार (२०२६)

  • हार्दिक पंड्या : १४ षटकार (२०२६)

विराट कोहलीच्या पंगतीत संजू सॅमसनला स्थान

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहलीचे वर्चस्व राहिले आहे, मात्र आता संजू सॅमसनने त्याच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकाच टी-२० विश्वचषकात दोनवेळा ७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करणारा संजू हा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने हा पराक्रम २०१६ च्या विश्वचषकात केला होता.

इतकेच नव्हे तर, टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीतील (Knockout) सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याच्या बाबतीतही संजूने विराटशी बरोबरी केली आहे. आता दोघांच्याही नावावर बाद फेरीत ८९ धावांची सर्वोच्च खेळी नोंदवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT