लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल सलग पाचव्यांदा टॉस हरला. यासह त्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जात आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा अखेरचा गुरुवारी सुरू झाला. या सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऑली पोप याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, भारतीय कर्णधार शुभमन गिलला या कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात टॉस जिंकण्यात यश आलेले नाही. या लाजिरवाण्या कामगिरीमुळे गिल आता विराट कोहलीच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच दौरा असून, एक फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. परंतु, कर्णधार म्हणून या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला एकही टॉस जिंकता आलेला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असे केवळ 14 वेळा घडले आहे. 21 व्या शतकात अशी घटना घडण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे, जेव्हा 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका संघाला एकही टॉस जिंकता आलेला नाही.
यापूर्वी असे केवळ 2018 साली भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावेळी घडले होते. त्यावेळी विराट कोहली संघाचे नेतृत्व करत होता. तेव्हा त्याला एकाही सामन्यात टॉस जिंकता आला नाही.
यापूर्वीच्या 13 कसोटी मालिकांमध्ये असे घडले आहे. त्यात सर्व टॉस गमावणा-या संघाला तीन वेळा मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आले. तर तर एकदा मालिका जिंकता आली आहे. हा पराक्रम इंग्लंडने 1953 साली मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस मालिका खेळताना केला होता.
ओव्हल कसोटीत इंग्लंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऑली पोपने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच, ओव्हलवर खेळल्या गेलेल्या मागील 7 कसोटी सामन्यांमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, या मैदानावर मे 2023 पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही टॉस जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये (Playing 11) प्रत्येकी चार बदल केले आहेत.