निमिष वा. पाटगावकर
भारताचा जेव्हा इंग्लंड दौरा चालू झाला, तेव्हा कोहली आणि शर्मा नसलेल्या या नव्या कर्णधाराच्या नव्या संघाचा इंग्लंडमध्ये टिकाव लागणे कठीण आहे, असेच भाकीत बहुतेक क्रिकेट पंडितांनी केले होते; पण आज आपण या मालिकेतल्या शेवटच्या कसोटीला सामोरे जाताना भारताचे मालिकेतील आव्हान अजूनही जिवंत आहे. भारताच्या या नव्या संघाने इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत सोडवणेही मोठे यश मानावे लागेल. ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ची जिद्द भारतीय संघाला नवा आत्मविश्वास देऊन गेली. ‘लॉर्डस्’च्या पराभवानंतर याची नितांत गरज होती. या आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय संघ आज ‘ओव्हल’ला सामना जिंकायच्या जिद्दीने मैदानात उतरेल. मालिकेतल्या या अखेरच्या सामन्यातही भारताच्या संघ निवडीचा प्रश्न आज सामना सुरू होईपर्यंत अनुत्तरित असेल.
भारताची फलंदाजी या मालिकेत बहरली आहे, तेव्हा सामना जिंकायला अनिवार्य असे वीस बळी घेणारे गोलंदाजीचे पर्याय आपल्याला संघात निवडावे लागतील. जसप्रीत बुमराहने जरी मालिकेच्या आधीच फक्त तीन सामन्यांत खेळायचे जाहीर केले होते, तरी या महत्त्वाच्या सामन्यात त्याने खेळायचा विचार केला पाहिजे, हे मत अनेक माजी क्रिकेटपटूंनीही मांडले होते. चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवशीच त्याच्या दुखापतीने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. बुधवारपर्यंत मिळणार्या सर्व संकेतांवरून बुमराह या सामन्यात खेळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर त्याच्या दुखापतींचा शरीरावर होणारा परिणाम बघता हा निर्णय घेतला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजचे ओव्हर वर्कलोड झाले असले, तरी त्याला खेळण्याशिवाय पर्याय नाही. सिराज हा आपला प्रमुख गोलंदाज असेल. बुमराहच्याऐवजी आकाश दीप संघात परतेल.
अंशुल कंबोजने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात निराश केले. एखाद्या खेळाडूच्या गुणवत्तेला तपासायला त्याला संधी द्यायला हवी हे खरे, पण या सामन्याचे महत्त्व ओळखून आपल्याला प्रयोग करायला वाव नाही. अंशुल कंबोजच्याऐवजी आपल्याकडे पर्याय आहेत ते अर्शदीप आणि प्रसिद्ध कृष्णा. प्रसिद्ध कृष्णाचा प्रयोग आपण करून झाला आहे, तेव्हा माझ्या मते अर्शदीपला संधी मिळाली पाहिजे. ‘ओव्हल’ची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना सहाय्य देते. तेव्हा अर्शदीपचा वेग आणि उजव्या हाताने फलंदाजी करणार्या फलंदाजांना ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या टप्प्यातील चेंडू सतावू शकतो.
नितीशकुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर हे अष्टपैलू खेळवून आपण आतापर्यंत काहीच साधले नाही. फलंदाजी बळकट करायच्या नावाखाली आपण या निवडी केल्या; पण तीस-चाळीस धावांच्या बळकटीपेक्षा तीन चार बळी मिळवणारा गोलंदाज संघात असणे सामना जिंकायच्या द़ृष्टीने केव्हाही हिताचे असते. या न्यायाने कुलदीप संघात असणे गरजेचे आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजाने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवल्याने भारताला फलंदाजी करू शकणार्या गोलंदाजांपेक्षा पूर्ण गोलंदाज संघात असणे हितावह आहे. हे सगळे लॉजिक मान्य होण्यासारखे असले, तरी संघ निवडीत गौतम गंभीरचे मत महत्त्वाचे असते आणि गंभीरचा कल फलंदाजी बळकट करण्याकडे असल्याने ठाकूरचे संघात स्थान कायम राहून कुलदीप पुन्हा संघाबाहेर राहण्याची शक्यता जास्त आहे.
ऋषभ पंत या सामन्याला मुकणार असल्याने ध्रुव ज्युरेल या सामन्यात खेळेल हे नक्की आहे. दोन सामन्यांत पंतच्याऐवजी खेळून त्याला इंग्लिश वातावरणात यष्टिरक्षणाचा उत्तम सराव झाला आहेच. त्याची फलंदाजीतील लढवय्या वृत्ती त्याने भारतासाठी संधी मिळाली तेव्हा रांचीच्या कसोटीत दाखवून दिली आहे. ऋषभ पंतने या मालिकेत धुवाँधार फलंदाजी करत त्याच्या स्टाईलने धावा जमवल्या हे खरे, पण सय्यद किरमणीच्या पठडीतला चिवटपणे फलंदाजी करून साथ देत खेळपट्टीवर उभे राहायला ज्युरेलची फलंदाजीही उपयोगी पडेल.
भारताची फलंदाजी मजबूत असली, तरी उत्तम सलामीची गरज आहे. ‘ओव्हल’च्या खेळपट्टीवरील कितीही गवत कापले, तरी चेंडूला बाऊन्स उत्तम मिळतो. तेव्हा जैस्वालने आपल्या क्रॉस बॅट फटाक्यांना चेंडू नवा असताना तरी मुरड घालणे गरजेचे आहे. राहुल, गिल रन मशिन आहेत. साई सुदर्शन का नायर या प्रश्नात आपण पुन्हा पडणार नाही आणि साई सुदर्शनलाच कायम ठेवतील. ‘ओव्हल’वर नवा चेंडू खेळपट्टी नवी असताना बॅटवर उत्तम येत असल्याने धावा काढायचीही इथे उत्तम संधी असते. तेव्हा चौदा वेळा नाणेफेक सलग हरल्यावर गिलला नाणेफेक जिंकून निर्णय घ्यायची वेळ आली, तरी फलंदाजी घेणे हाय रिस्क हाय रिटर्न्स देणारे ठरू शकते.
दुसरीकडे इंग्लंडने आपल्या खेळाडूंच्या वर्कलोडची तमा न करता मालिका जिंकण्यासाठी जीवतोड प्रयत्न केला त्याचे परिणाम म्हणून त्यांना मोठे धक्के बसले आहेत. स्वतः कर्णधार स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने सर्व सामन्यांत आपल्याला झोकून देत गोलंदाजी केल्याचे परिणाम आपल्याला ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ला बघायला मिळाले. कार्सचा वेग कमी झाला, यश मिळेनासे झाले तर स्टोक्स दुसर्या डावात फलंदाजी करताना जायबंदी झाला. या सामन्यात हे दोघेही खेळणार नाहीत. स्टोक्सच्या खांद्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे, तर कार्सला विश्रांतीची गरज आहे. त्याचबरोबर भारतासाठी उत्साहवर्धक बाब म्हणजे आपल्या डावखुर्या फलंदाजांना सतावणार्या जोफ्रा आर्चरलाही विश्रांती दिली आहे. आठ वर्षाने पुनरागमन करणार्या डॉवसनने विशेष प्रभाव न पाडल्याने त्याचीही गच्छंती झाली आहे. चार बदलांसह इंग्लंड ओली पोपच्या नेतृत्वात गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन यांना खेळवत आहे. जॉश टंगला पुन्हा संधी दिली आहे, तर नवा फिरकीपटू जेकब बेथेलचा संघात समावेश केला आहे.
इंग्लंडच्या या गोलंदाजांच्या संपूर्ण नव्या युनिटला आणि नव्या कर्णधाराला ताळमेळ बसवायला नक्कीच वेळ जाईल. इंग्लंडच्या या मालिकेतील उत्तम कामगिरीला स्टोक्सचे नेतृत्वगुण कारणीभूत होते. ओली पोपच्या नेतृत्वगुणांची परीक्षा होईलच, पण वेळोवेळी त्याची स्टोक्सशी तुलनाही होईल. एकंदरीत या मोठ्या बदलांमुळे इंग्लंडचा संघ अस्थिर असेल आणि याचा फायदा भारताला उठवून मालिकेत बरोबरी साधण्याची नामी संधी आहे.