स्पोर्ट्स

148 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच.. हॅरी ब्रूकच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

पहिल्या डावात शतक हुकल्यानंतर इंग्लिश चाहत्यांना हॅरी ब्रूककडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु यावेळी त्याचे नशीब अधिकच खराब ठरले आणि त्याला आपले खातेही उघडता आले नाही.

रणजित गायकवाड

क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा फलंदाज उत्कृष्ट खेळी करूनही शतकापासून वंचित राहतो. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकसोबत लीड्स कसोटी सामन्यात असेच काहीसे घडले. भारता विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ब्रूकने अप्रतिम फलंदाजी केली आणि त्याच्याकडे शानदार शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, परंतु नशिबाने त्याला साथ दिली नाही. ब्रूक अवघ्या एका धावेने शतकाला मुकला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला 99 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. आपल्या खेळीत त्याने 112 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. खेळपट्टीवर बराच वेळ घालवूनही त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही, याची खंत पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही

पहिल्या डावात शतक हुकल्यानंतर इंग्लिश चाहत्यांना हॅरी ब्रूककडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु यावेळी त्याचे नशीब अधिकच खराब ठरले आणि त्याला आपले खातेही उघडता आले नाही. ५५ व्या षटकात सलामीवीर बेन डकेट 149 धावांवर बाद झाल्यानंतर, नवीन फलंदाज म्हणून मैदानात आलेल्या हॅरी ब्रूकला शार्दुल ठाकूरने पहिल्याच चेंडूवर बाद केले. अशाप्रकारे, हॅरी ब्रूकच्या नावावर एक असा अनोखा विक्रम नोंदवला गेला, जो यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणीही केला नव्हता.

कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच दिसले अनोखे दृश्य

खरे तर, हॅरी ब्रूक कसोटी सामन्यात 99 आणि शून्यावर (डक) बाद होणारा जगातील 5वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी पंकज रॉय, मुश्ताक मोहम्मद, मिसबाह-उल-हक आणि बाबर आझम यांच्यासोबत असे घडले आहे. इतकेच नाही, तर हॅरी ब्रूक कसोटी सामन्यात 99 आणि गोल्डन डकवर (पहिल्याच चेंडूवर शून्य) बाद होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणताही फलंदाज एका कसोटी सामन्यात एका धावेने शतक हुकल्यानंतर गोल्डन डकचा बळी ठरला नव्हता. या अनोख्या विक्रमावरून लीड्स कसोटीत ब्रूकचे नशीब खरोखरच किती खराब होते, याचा अंदाज येतो.

कसोटी सामन्यात 99 आणि शून्यावर बाद होणारे खेळाडू:

  • पंकज रॉय (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, 1959

  • मुश्ताक मोहम्मद (पाकिस्तान) विरुद्ध इंग्लंड, कराची, 1973

  • मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) विरुद्ध वेस्ट इंडिज, बार्बाडोस, 2017

  • बाबर आझम (पाकिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अबू धाबी, 2018

  • हॅरी ब्रूक (इंग्लंड) विरुद्ध भारत, लीड्स, 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT