मँचेस्टर : ‘प्रिन्स’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा कर्णधार शुभमन गिल याने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक शतकी खेळी केली. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने 228 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववे आणि चालू मालिकेतील चौथे शतक ठरले. यापूर्वी त्याने लीड्स येथील कसोटीत एक, तर एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावले होते.
या कामगिरीसह भारतीय कर्णधाराने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत चार शतके झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. इतकेच नव्हे, तर कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत चार शतके करणाराही तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर एक धाव घेत या फलंदाजाने आपले शतक साजरे केले.
शुभमन गिलपूर्वी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम संयुक्तपणे पाच खेळाडूंच्या नावावर होता. यामध्ये वॉरविक आर्मस्ट्राँग, सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. तथापि, या पाचही खेळाडूंनी कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत प्रत्येकी तीन शतके झळकावली होती. गिलने या सर्वांना मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम करणारा पहिला कर्णधार होण्याचा मान मिळवला.
या मालिकेत गिलने लीड्स येथे 147 धावा, एजबॅस्टनच्या पहिल्या डावात 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली होती. मँचेस्टरच्या दुसऱ्या डावात तो 238 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 103 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याचा झेल घेतला.
शुभमन गिल इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत कर्णधार म्हणून चार शतके झळकावणारा पहिलाच खेळाडू आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही इंग्लिश कर्णधारालाही आपल्या मायदेशात एका कसोटी मालिकेत अशी कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी 1938 मध्ये इंग्लंडमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून तीन शतके झळकावली होती. याव्यतिरिक्त, इंग्लंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून एका मालिकेत सर्वाधिक तीन शतके करण्याचा विक्रम खालील खेळाडूंच्या नावे आहे.
मेलव्हिल (दक्षिण आफ्रिका) : 1947
सर गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) : 1966
डेव्हिड गावर (इंग्लंड) : 1985
ग्रॅहम गूच (इंग्लंड) : 1990
जो रूट (इंग्लंड) : 2021
सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांनी कर्णधार म्हणून एका मालिकेत चार शतके झळकावली आहेत, परंतु या दोघांनीही ही कामगिरी आपापल्या मायदेशात केली होती. ब्रॅडमन यांनी 1947-48 मध्ये भारताविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत, तर गावसकर यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत प्रत्येकी चार शतके झळकावली होती.
एवढेच नाही, तर कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गिल आता केवळ ब्रॅडमन यांच्यापेक्षा मागे आहे. ब्रॅडमन यांनी 1936-37 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात 810 धावा केल्या होत्या, तर गिलच्या नावावर सध्या 722 धावा आहेत.
एकाच कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमातही गिलने आता सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे. गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर आणि त्यानंतर 1978-79 मध्ये मायदेशात अशी कामगिरी केली होती. तर, कोहलीने 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार शतके झळकावली होती. या मालिकेत अजून एक कसोटी सामना शिल्लक असून, गिलने त्यात आणखी एक शतक झळकावल्यास तो या सर्व दिग्गजांना मागे टाकेल.