स्पोर्ट्स

IND vs ENG 4th Test : इतिहास बदलण्याची ‘शुभमनसेने’ला संधी! ‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर आजपासून निर्णायक कसोटी

89 वर्षांत भारताला या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही. हा इतिहास बदलण्याची संधी शुभमन गिल आणि कंपनीला असेल.

रणजित गायकवाड

ind vs eng 4th test at manchester old trafford

मँचेस्टर : लॉर्डस् कसोटीतील नाट्यमय आणि दमछाक करणार्‍या संघर्षानंतर मिळालेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर, भारत आणि इंग्लंड संघ पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत. मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणारी चौथी कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

यजमान इंग्लंड हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यास उत्सुक आहे, तर दुसरीकडे मालिका गमावण्याचे संकट टाळण्यासाठी आणि आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला विजय अनिवार्य आहे. 89 वर्षांत भारताला या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही. हा इतिहास बदलण्याची संधी शुभमन गिल आणि कंपनीला असेल.

  • स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • वेळ : दु. 3.30 वाजल्यापासून

  • प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क

  • लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओहॉटस्टार

‘मँचेस्टर’मध्ये भारताची पाटी कोरीच

या मैदानावर दोन्ही संघ 9 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी इंग्लंडने चार वेळा विजय मिळवला आहे, तर 5 सामने अनिर्णीत राहिले. भारताच्या विजयाची पाटी मात्र येथे कोरीच आहे. त्यामुळे इंग्लंडची बरोबरी साधत मालिका जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मँचेस्टरच्या मैदानात आतापर्यंत जे कधीच साध्य झाले नाही ते करून दाखवण्याचे चॅलेंज असेल.

या मैदानातील कसोटी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी फारसी समाधानकारक नाही. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या मैदानात भारतीय संघाने 1936 मध्ये पहिला, तर 2014 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. 89 वर्षांच्या इतिहासात 9 वेळा भारत-इंग्लंड दोन्ही संघ या मैदानात समोरासमोर आले; पण एकदाही टीम इंडियाला इथे विजय मिळवता आलेला नाही.

1936, 1946, 1971, 1982 आणि 1990 च्या दौर्‍यात भारतीय संघाने या मैदानात आतापर्यंत 5 कसोटी सामने अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. 1952, 1959, 1974 आणि 2014 या दौर्‍यात भारतीय संघाला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात 4 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.

लियाम डॉवसनकडे लक्ष

आजपासून सुरू होणार्‍या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने सोमवारी ‘प्लेईंग इलेव्हन’ जाहीर केली. हॅम्पशायरचा फिरकीपटू लियाम डॉवसन हा दुखापतग्रस्त शोएब बशीर याच्या जागी ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये परतला आहे. 8 वर्षांनंतर लियाम डॉवसन इंग्लंडकडून कसोटी खेळणार आहे. 2017 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडसाठी शेवटची कसोटी खेळली होती. त्याने 3 कसोटी सामन्यांत एकूण 84 धावा केल्या, तर 7 विकेटस् घेतल्या आहेत.

कसोटीवर पावसाचे सावट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाचही दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे सामन्याच्या खेळात व्यत्यय येऊ शकतो. यासोबतच, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीतील दमटपणामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज

या हंगामाच्या सुरुवातीला कौंटी सामन्यांमध्ये या मैदानावर पहिल्या डावात मोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या. परंतु, ते सामने मे महिन्यात झाले होते. त्यानंतर झालेल्या पावसामुळे खेळपट्टीचे स्वरूप बदलले आहे.

सामन्यापूर्वीही येथे मुबलक पाऊस झाला असून, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीमुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीलाच पसंती देतील, असा अंदाज क्रीडा विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही संघ असे :

इंग्लंड प्लेईंग 11 : झॅक क्रॉऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, लियाम डॉवसन, ख्रिस वॉक्स, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर.

भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/अंशुल कंबोज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT