ind vs eng 3rd test sachin tendulkar's portrait at mcc museum
लंडन : क्रिकेटच्या जागतिक इतिहासात एक सुवर्णक्षण ठरावा, असा सोहळा मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) संग्रहालयात पार पडला. भारतीय क्रिकेटचे दैवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या तैलचित्राचे अनावरण लॉर्ड्सच्या ऐतिहासिक संग्रहालयात करण्यात आले. या सोहळ्याला क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार स्टुअर्ट पिअरसन राईट यांनी साकारले असून ते सुमारे 18 वर्षांपूर्वीच्या एका छायाचित्रावर आधारित आहे. ही कलाकृती या वर्षाच्या अखेरपर्यंत एमसीसी संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाईल आणि त्यानंतर ती लॉर्ड्सच्या ऐतिहासिक पॅव्हेलियनमध्ये कायमस्वरूपी स्थापित केली जाणार आहे. या तैलचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे, ते पूर्वीच्या चित्रांप्रमाणे पूर्ण-लांबीचे नसून, त्यात केवळ सचिन यांचे मस्तक आणि खांद्यांपर्यंतचा भाग साकारण्यात आला आहे.
तेंडुलकर यांच्या तैलचित्राचे लॉर्ड्सच्या MCC संग्रहालयात अनावरण होणे, हे केवळ त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीचे नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या यशाचेही प्रतीक आहे. हा गौरव भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, यात शंका नाही.
चित्रकार स्टुअर्ट राईट म्हणाले, ‘एमसीसीला सचिन तेंडुलकर यांचे वेगळ्या शैलीतील पेटिंग आवश्यक होते, म्हणून मी एक नवीन पद्धत अवलंबली. मी सचिन यांच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांना ‘नायकाप्रमाणे’ दर्शवण्यासाठी त्यांच्या व्यक्तिचित्राला भव्य आकार दिला. मी पार्श्वभूमी साधी ठेवली आहे, जेणेकरून लक्ष केवळ व्यक्तीवरच केंद्रित राहील. हे व्यक्तिचित्र सचिन तेंडुलकर यांच्या दीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीला समर्पित आहे.’ यापूर्वी राईट यांनी कपिल देव, बिशन सिंह बेदी आणि दिलीप वेंगसरकर यांचीही व्यक्तिचित्रे साकारली आहेत.
सचिन तेंडुलकर हे केवळ भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अढळ स्थान प्राप्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाची दखल घेत, MCC संग्रहालयाने त्यांच्या व्यक्तिचित्राचा समावेश आपल्या दालनात केला आहे. लॉर्ड्सच्या भिंतींवर सचिन तेंडुलकर यांचे व्यक्तिचित्र झळकणे, हा भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा विषय मानला जात आहे.
या सोहळ्याला सचिन तेंडुलकर स्वतः उपस्थित होते. त्यांच्या सोबत क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज, MCC चे पदाधिकारी आणि विविध देशांतील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. MCC चे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीचा गौरव करत, त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाचे विशेष उल्लेख केले.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना तेंडुलकर म्हणाले, ‘हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. 1983 मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा मी पहिल्यांदा लॉर्ड्स दुरचित्रवाणीवर पाहता आले होते. मी कर्णधार कपिल देव यांना विश्वचषक उंचावताना पाहिले आणि तिथूनच माझ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. आज जेव्हा माझ्या पेंटिंगचे लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये अनावरण झाले, तेव्हा माझा का क्रिकेटचा दिर्घ प्रवास पूर्ण झाल्याची भावना आहे. हा क्षण अत्यंत विशेष असाच आहे.’
MCC संग्रहालय हे क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना, खेळाडू आणि त्यांच्या आठवणी जतन करणारे जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संग्रहालय आहे. एमसीसीचा ‘लॉर्ड्स पोर्ट्रेट प्रोग्राम’ गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे, परंतु एमसीसीने 1950 च्या दशकापासूनच कला आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती. एमसीसी संग्रहालय हे युरोपातील सर्वात जुने क्रीडा संग्रहालय आहे. येथील ‘लाँग रूम गॅलरी’ ही क्रीडा जगतातील सर्वात ऐतिहासिक गॅलरी मानली जाते. एमसीसीच्या संग्रहात सुमारे 3,000 चित्रे असून, त्यापैकी जवळपास 300 पोर्टेट पेटिंग्स आहेत. या संग्रहालयात सचिन तेंडुलकर यांच्या व्यक्तिचित्राचा समावेश झाल्याने, त्यांच्या जागतिक कीर्तीला आणि योगदानाला अधिकच मान्यता मिळाली आहे.