ऋषभ पंत 
स्पोर्ट्स

Rishabh Pant World Records : ऋषभ पंतची लॉर्ड्सवर हुकूमत! व्हिव्ह रिचर्ड्स-धोनीचे विक्रम काढले मोडीत

इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज

रणजित गायकवाड

rishabh pant records lord's ground breaks dhoni and viv richard's records

भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांवर रोखल्यानंतर, भारताचा संघही तितक्याच धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक असलेल्या ऋषभ पंतने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत आणखी एक अर्धशतक झळकावले. आपल्या 74 धावांच्या खेळीद्वारे, पंतने इतिहासातील दोन महान क्रिकेटपटू, सर व्हिव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) आणि एमएस धोनी (भारत), यांचे दोन मोठे विश्वविक्रम मोडीत काढले.

ऋषभ पंतने आपल्या 112 चेंडूंत 74 धावांच्या खेळीत दोन षटकार मारले. यासह, त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 36 षटकार पूर्ण केले आहेत. तो आता इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध 34 कसोटी षटकार मारले होते.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज :

  • ऋषभ पंत (भारत) : 36 षटकार

  • सर व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) : 34 षटकार

  • टिम साउदी (न्यूझीलंड) : 30 षटकार

  • यशस्वी जैस्वाल (भारत) : 27 षटकार

  • शुभमन गिल (भारत) : 26 षटकार

ऋषभ पंतच्या नावावर आता इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1197 धावा जमा झाल्या आहेत. यासह, तो कसोटी प्रकारात इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा आशियाई यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. त्याने एमएस धोनीला मागे टाकले, ज्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1157 धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे आशियाई यष्टिरक्षक-फलंदाज :

  • ऋषभ पंत (भारत) : 1197 धावा

  • एमएस धोनी (भारत) : 1157 धावा

  • फारोख इंजिनियर (भारत) : 1113 धावा

  • कुमार संगकारा (श्रीलंका) : 716 धावा

  • सय्यद किरमाणी (भारत) : 707 धावा

धावबादमुळे पंतची खेळी संपुष्टात

ऋषभ पंत लॉर्ड्सवरील तिस-या कसोटीत ज्या सहजतेने फलंदाजी करत होता, ते पाहता तो मालिकेतील आपले तिसरे शतक सहज पूर्ण करू शकला असता. परंतु, धाव घेताना झालेल्या एका मोठ्या चुकीमुळे तो केवळ 74 धावाच करू शकला. बेन स्टोक्सच्या अचूक थ्रोने पंतचा खेळ खल्लास झाला. अशाप्रकारे पंत आणि के. एल. राहुल यांच्यातील एक भक्कम भागीदारीही संपुष्टात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT