भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 336 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. बर्मिंगहॅममध्ये भारताने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या आणि इंग्लंडला 407 धावांवर गुंडाळून 180 धावांची मोठी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसरा डाव 6 बाद 427 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर 608 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, यजमान संघाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी 271 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने विजय मिळवला.
भारताने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर आपला पहिला सामना 1967 साली खेळला होता. तेव्हापासून संघाला येथे एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. या ऐतिहासिक विजयासह सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली, ज्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया.
भारत पहिला डाव : भारताने पहिल्या डावात शुभमन गिल (269), यशस्वी जैस्वाल (87) आणि रवींद्र जडेजा (89) यांच्या शानदार खेळींच्या जोरावर 587 धावा केल्या.
इंग्लंड पहिला डाव : प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूक (106) आणि जेमी स्मिथ (184) यांच्या खेळींच्या बळावर 407 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 बळी घेतले.
भारत दुसरा डाव : भारताने गिलच्या शतकी खेळीमुळे (161) 427/6 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला.
इंग्लंड दुसरा डाव : जेमी स्मिथचा (88) अपवाद वगळता इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आकाश दीपने 6 बळी घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला.
यशस्वी जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत एजबॅस्टनवर पहिल्या डावात इंग्लिश वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक शैलीत धावा जमवल्या. भारतीय सलामीवीराने केवळ 59 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान, जैस्वाल 107 चेंडूंमध्ये 87 धावा करून बाद झाला. बेन स्टोक्सने त्याला आपला बळी बनवले. हे जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक ठरले.
दुसऱ्या डावात 13 धावा करताच जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने सुनील गावस्कर यांचा 49 वर्षे जुना विक्रम मोडला. गावसकर यांनी 23 कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता, तर यशस्वीने केवळ 21 कसोटी सामन्यांमध्ये ही धावसंख्या गाठली. डावांच्या बाबतीत त्याने राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची बरोबरी केली. या तिन्ही खेळाडूंनी 40 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
पहिल्या डावात भारताने 95 धावांवर दुसरी विकेट गमावली असताना गिल फलंदाजीसाठी आला. त्याने एक बाजू लावून धरत संयमी फलंदाजी केली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 114 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या सत्रादरम्यान त्याने 311 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. तो 387 चेंडूंमध्ये 269 धावा (30 चौकार, 3 षटकार) करून बाद झाला. इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
गिल कसोटीमध्ये सर्वोच्च खेळी करणारा भारतीय कर्णधारही ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 2019 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावांची खेळी केली होती. या यादीत तिसऱ्या स्थानावरही कोहलीच आहे (243 धावा विरुद्ध श्रीलंका, 2017). यासह गिलने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 5,000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. त्याने केवळ 63 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
परदेशात खेळताना 250 पेक्षा जास्त धावांची खेळी करणारा गिल केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग (309आणि 254 धावा, पाकिस्तानमध्ये) आणि राहुल द्रविड (270 धावा, पाकिस्तानमध्ये) यांनी हा पराक्रम केला आहे. तो इंग्लंडमध्ये 250 पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा पाहुणा कसोटी कर्णधार ठरला आहे. तो आता बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया, 1964 ) आणि ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका, 2003) यांच्या पंक्तीत सामील झाला आहे.
गिल आता इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा भारताचा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी गावसकर (221 धावा, 1979) आणि द्रविड (202 धावा, 2002) यांनी ही कामगिरी केली आहे.
SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) द्विशतक झळकावणारा गिल पहिला भारतीय कर्णधार आहे.
25 वर्षीय गिल कसोटीत द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय कर्णधार ठरला आहे. या यादीत त्याच्या पुढे फक्त एमएके पतौडी (23 व्या वर्षी) आहेत.
पहिल्या दिवशी भारताने 211 धावांवर पाचवी विकेट गमावली असताना जडेजा फलंदाजीसाठी आला. त्याने कर्णधार गिलला उत्तम साथ देत 80 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक ठरले. चांगल्या लयीत दिसत असलेला जडेजा 137 चेंडूंमध्ये 89 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.
इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथने पहिल्या डावात 184 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे शतक होते. स्मिथ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा इंग्लंडचे 5 फलंदाज 84 धावांवर तंबूत परतले होते. असे असूनही, त्याने संयम न गमावता आक्रमक फलंदाजी केली आणि केवळ 80 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तो 207 चेंडूंमध्ये 21 चौकार आणि 4 षटकारांसह 184 धावांवर नाबाद राहिला.
स्मिथने इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद शतक झळकावले. या यादीत गिल्बर्ट जेसप पहिल्या स्थानावर आहेत, ज्यांनी 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 76 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. बेअरस्टोने 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 77 चेंडूंमध्ये, तर ब्रूकने 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 80 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
हॅरी ब्रूकने भारताविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर चषक मालिकेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने शानदार शतक (158) झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक आहे. दरम्यान, त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 6000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. भारताविरुद्धची ही त्याची पहिलीच शतकी खेळी होती. तो 158 धावांवर आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
सिराजने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आणि एकूण 6 बळी मिळवले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे आणि इंग्लंडविरुद्धचे पहिले 5 बळी होते. त्याने 19.3 षटकांच्या गोलंदाजीत 3 निर्धाव षटकांसह 70 धावा देत 6 बळी घेतले. इंग्लंडविरुद्ध सिराजने 13 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 33.74 च्या सरासरीने 35 बळी मिळवले आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावात गिलच्या बॅटमधून शानदार 161 धावा निघाल्या. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण 8 वे आणि इंग्लंडविरुद्धचे 5 वे शतक ठरले. गिलने 162 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्याने पंतसोबत (65) 103 चेंडूंमध्ये 110 धावांची भागीदारी केली.
एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून 350 पेक्षा जास्त धावा करून 11 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा गिल पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी 2014 मध्ये कुमार संगकाराने चट्टोग्राम कसोटीत 424 धावा केल्या होत्या. गिल आता एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्याने गावस्कर यांच्या 344 धावांच्या (वेस्ट इंडिजविरुद्ध, 1971) विक्रमाला मागे टाकले आहे.
गिलने भारतीय कर्णधार म्हणूनही एक मोठी कामगिरी केली आहे. तो एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दिल्लीत 293 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानी गावसकर आहेत, ज्यांनी 1978 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 289 धावा केल्या होत्या.
गिलने बर्मिंगहॅम कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावून एका विशेष यादीत स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटीत २ शतके झळकावणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम ॲलन मेलविल (1947) आणि इंझमाम-उल-हक (2005) यांनी केला होता.
केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 3039 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याची सरासरी 36.17 इतकी आहे. या दरम्यान त्याने 50 कसोटी सामन्यांमध्ये 8 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. भारतासाठी सलामीवीर म्हणून त्याच्यापेक्षा जास्त धावा केवळ गावसकर (9607), सेहवाग (8124), गौतम गंभीर 4119) आणि मुरली विजय (3880) यांनी केल्या आहेत.
पंतने SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार लगावणारा यष्टिरक्षक-फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. पंतने या मालिकेत आतापर्यंत 13 षटकार लगावले आहेत आणि डेनिस लिंडसे (12 षटकार) व ॲडम गिलख्रिस्ट (12 षटकार) यांना मागे टाकले आहे.
लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता, ज्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवनियुक्त कसोटी कर्णधार गिल यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, गिलने खचून न जाता इंग्लंडचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या एजबॅस्टनवर विजय मिळवत मालिकेत दमदार पुनरागमन केले. गिलच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिलाच कसोटी विजय आहे. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडला मात देणारा गिल हा आशियातील पहिला कर्णधार ठरला आहे.
धावांच्या फरकाने, हा भारताचा परदेशातील सर्वात मोठा कसोटी विजय आहे. यापूर्वी, संघाने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थ साउंड येथे 318 धावांनी सामना जिंकला होता. एकंदरीत, धावांच्या बाबतीत हा भारताचा चौथा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. गिलला त्याच्या उत्कृष्ट खेळीबद्दल 'सामनावीर' (प्लेअर ऑफ द मॅच) म्हणून गौरवण्यात आले.