शुभमन गिल 
स्पोर्ट्स

Shubman Gill 200 : गिल कसोटीत द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय कर्णधार, कोहली-तेंडुलकरही मागे

गिलने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील आपले द्विशतक 25 वर्षे आणि 298 दिवस वयात पूर्ण केले. भारताकडून कसोटीमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरला.

रणजित गायकवाड

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गिल इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर, कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, त्याने या विक्रमासह विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले आहे.

गिलने 311 चेंडूंत पूर्ण केले द्विशतक

शुभमन गिलने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध आपले द्विशतक 311 चेंडूंत पूर्ण केले. आपल्या या शानदार खेळीदरम्यान गिलने 2 उत्कृष्ट षटकार आणि 21 चौकार लगावले. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिलेच द्विशतक ठरले. तसेच, इंग्लंडच्या भूमीवरही हे त्याचे पहिलेच द्विशतक आहे.

तेंडुलकर-कोहलीला टाकले मागे

गिलने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील आपले द्विशतक 25 वर्षे आणि 298 दिवस वयात पूर्ण केले आणि भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरला. या कामगिरीसह गिलने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना मागे टाकले. तेंडुलकरने कर्णधार म्हणून 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते, तेव्हा त्याचे वय 26 वर्षे आणि 189 दिवस होते. तर, विराट कोहलीने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती, तेव्हा तो 27 वर्षे आणि 260 दिवसांचा होता.

कसोटीत द्विशतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय कर्णधार :

  • 23 वर्षे 39 दिवस : मन्सूर अली खान पटौदी, विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, 1964

  • 25 वर्षे 298 दिवस : शुभमन गिल, विरुद्ध इंग्लंड, एजबॅस्टन, 2025

  • 26 वर्षे 189 दिवस : सचिन तेंडुलकर, विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 1999

  • 27 वर्षे 260 दिवस : विराट कोहली, विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड, 2016

कसोटीत द्विशतक झळकावणारे भारतीय कर्णधार :

  • मन्सूर अली खान पटौदी : 1

  • सुनील गावस्कर : 1

  • सचिन तेंडुलकर : 1

  • महेंद्रसिंग धोनी : 1

  • विराट कोहली : 7

  • शुभमन गिल : 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT