ravi shastri slams shubman gill and gautam gambhir in live commentary
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात स्थान न दिल्याबद्दल कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कोणतीही भीडभाड न ठेवता थेट प्रक्षेपणादरम्यान कडाडून टीका केली. एजबॅस्टन येथे सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच, ‘स्काय स्पोर्ट्स’च्या तज्ज्ञांच्या पॅनेलमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रींनी बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.
हेडिंग्ले येथे अँडरसन-तेंडुलकर चषक मालिकेतील सलामीचा सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय ‘अनाकलनीय’ असल्याची टीप्पणी शास्त्री यांनी केली. त्यांच्या मते, दोन्ही सामन्यांमध्ये जवळपास आठवड्याभराचे अंतर असताना कर्णधार आणि प्रशिक्षकाने बुमराह या सामन्यात खेळेल, याची खात्री करायला हवी होती.
शास्त्री म्हणाले, ‘तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे आणि तुम्ही त्याला सात दिवसांच्या विश्रांतीनंतर संघाबाहेर बसवता. ही गोष्ट अविश्वसनीय आहे.’
सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी, रवी शास्त्री इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अथर्टन यांच्यासह समालोचन पथकाचा भाग होते. यादरम्यान, अथर्टन म्हणाले, ‘रवी, मला हा निर्णय खूपच विचित्र वाटतो.’
त्यानंतर शास्त्रींनी माईक हाती घेतला आणि भारतीय कर्णधार व मुख्य प्रशिक्षकावर टीका करण्यास वेळ दवडला नाही. ‘माझ्या मते हे अत्यंत विचित्र आणि अनाकलनीय आहे. जर तो खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल, तर तो खेळलाच पाहिजे,’ असे शास्त्रींनी थेट प्रक्षेपणात तीव्र शब्दांत म्हटले.
भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकांनी पुढे म्हटले की, ‘जर बुमराह खेळण्यासाठी तंदुरुस्त होता, तर दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित व्हायला नको होता. माझ्या मते, तो निर्णय पूर्णपणे कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांच्या हातात असायला हवा.’
‘दोन कसोटी सामन्यांमध्ये आठवड्याभराचे अंतर आहे. भारतासाठी हा एक महत्त्वपूर्ण सामना आहे. जर मालिकेत आव्हान टिकवायचे असेल, तर तुमचा प्रमुख वेगवान गोलंदाज खेळणे आवश्यक आहे. यात कोणताही किंतु-परंतु नको होता. तो खेळायलाच हवा होता,’ असे शास्त्री म्हणाले.
कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला, भारतीय कर्णधार शुभमन गिलने बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी केली होती, परंतु त्याच्यावरील वर्कलोडचे नियोजन (workload management) लक्षात घेता त्याला संघात स्थान दिले जाणार नाही, असे संकेतही दिले होते.
बुधवारी (दि. 2) टॉसच्या वेळी या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. गिल म्हणाला, ‘आमच्यासाठी हा सामना निश्चितच महत्त्वाचा आहे, परंतु मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार असून, तेथील खेळपट्टीवर यापेक्षा अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही बुमराहाला एजबॅस्टन कसोटीत विश्रांती देणे योग्य समजले.’
मालिका सुरू होण्यापूर्वीच, बुमराहने स्वतःच आपण पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ तीनच कसोटी सामने खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथील अखेरच्या कसोटीत झालेल्या दुखापतीनंतर, डॉक्टर आणि फिजिओ यांनी त्याला त्याच्या वर्कलोडबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बुमराहला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद न मिळण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण होते.