पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्स राखून पराभव केला. रोहितसेनेच्या शिलेदारांनी इंग्लंडच्या 249 धावांचे लक्ष्य 12.2 षटके राखून आरामात गाठले. शुभमन गिल (87), श्रेयस अय्यर (59), अक्षर पटेल (52) यांनी दमदार खेळीचे प्रदर्शन केले आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
गुरुवारी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांत 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 38.4 षटकांत सहा गडी गमावून 251 धावा केल्या आणि सामना जिंकला. आता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ अजिंक्य आघाडी मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल (15) आणि कर्णधार रोहित शर्मा (2) स्वस्तात बाद झाले. यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 19 होती. यानंतर, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात 97 धावांची तुफानी भागीदारी झाली. दरम्यान, श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 59 धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर गिलने अक्षर पटेलसोबत चौथ्या विकेटसाठी आणखी एक मोठी भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अक्षर पटेल 52 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर गिल देखील 87 धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि साकिब महमूद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बेन डकेट आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करून इंग्लिश संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सॉल्टच्या (43) रूपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. तो धावबाद झाला. त्यानंतर इंग्लंडने डकेट (32) आणि हॅरी ब्रुक (0) यांच्या विकेट लवकर गमावल्या. बऱ्याच काळानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतलेला जो रूट 19 धावा करून बाद झाला. इंग्लंडने 111 धावांवर चौथी विकेट गमावली.
एका बाजूला सतत विकेट पडण्याच्या काळात, कर्णधार बटलरने 67 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या अर्धशतकी खेळीत 4 चौकारही मारले. दरम्यान, बटलरने जेकब बेथेलसोबत 59 धावांची उपयुक्त भागीदारी केली. बटलरचे हे वनडे कारकिर्दीतील 27 वे तर भारताविरुद्धचे चौथे अर्धशतक ठरले. त्याची विकेट अक्षर पटेलने घेतली.
इंग्लंडने 111 धावांवर चौथी विकेट गमावली तेव्हा बेथेल मैदानात आला. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना धाडसीपणे तोंड दिले आणि केवळ 62 चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. प्रभावी फलंदाजी करणारा बेथेल 64 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. अनुभवी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने एक विकेट घेतली. अक्षर पटेलने 7 षटके गोलंदाजी केली आणि 38 धावा देत एक विकेट मिळवली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. जडेजाने शानदार गोलंदाजी केली आणि विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने 26 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणानेही पदार्पणाच्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या.