टीम इंडियाच्या या विजयात पाच खेळाडूंचे सर्वात मोठे योगदान ठरले आहे. Twitter
स्पोर्ट्स

IND vs BAN Test : अण्णा ते पंत... टीम इंडियाच्या विजयाचे ‘हे’ आहेत 5 हिरो

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलईन डेस्क : Team India Win : भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. रोहित सेनेने बांगलादेशचा धुव्वा उडवत ही कसोटी 280 धावांनी जिंकली. टॉस गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात टीम इंडियाने 4 गडी गमावत 287 धावा केल्या आणि त्यानंतर आपला डाव घोषित करून पाहुण्या संघाला 515 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश 234 धावांवर ऑल आऊट झाला आणि 280 धावांनी सामना गमावला. टीम इंडियाच्या या विजयात पाच खेळाडूंचे सर्वात मोठे योगदान ठरले आहे.

रविचंद्रन अश्विन

लोकल बॉय रविचंद्रन अश्विनने चेन्नई कसोटी गाजवली. त्याने अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. अण्णाने भारताच्या पहिल्या डावात शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे संघाला मोठी मजल मारता आली. 113 धावांच्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. तर बांगलादेशचा दुसरा डाव उद्ध्वस्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने 6 बळी घेऊन बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच जिरवली.

रवींद्र जडेजा

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या डावात 144 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर जड्डू फलंदाजीला आला. त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने अश्विनच्या साथीने सातव्या विकेटसाठी विक्रमी 199 धावांची भागिदारी रचली. तसेच पहिल्या डावात 2 बळीही घेण्यात तो यशस्वी झाला. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जडेजाने पुन्हा 3 बळी मिळवले.

जसप्रीत बुमराह

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मारा अपेक्षेप्रमाणे भेदक ठरला. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 1 बळी घेतला. बुमराहने या कसोटीत एकूण 5 विकेट घेत बांगलादेशची अवस्था खराब केली. पाहुण्या संघाच्या सलामी जोडीने दुस-या डावात चांगली सुरुवात केली होती. या जोडीने संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले होते. टीम इंडियाला विकेट घेणे गरजेचे होते. अशावेळी रोहित शर्माने चेंडू बुमराहकडे सोपवला. त्यानेही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवत बांगलादेशची सलामी जोडी फोडली. हा ब्रेक थ्रू भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी फार उपयुक्त ठरला. यानंतर काही अंतरांनी बांगलादेशचे फलंदाज बाद होत राहिले आणि हा सामना भारताने जिंकला.

शुबमन गिल

पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर शुभमन गिलने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. शुभमनने 161 चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकारही मारले.

ऋषभ पंत

बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची बॅटही जोरदार चालली. त्याने दुसऱ्या डावात 124 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्यानंतर पंत 109 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले. ऋषभने पहिल्या डावातही 39 धावा केल्या होत्या. यादरम्यान यशस्वी जैस्वालसह अर्धशतकी भागिदारीही केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT