पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Fastest 100 Runs in Test : भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्ध कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रमांची मालिका रचली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केली आणि या काळात अनेक मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. यशस्वी जैस्वाल हा सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा भारताचा सलामीवीर ठरला आहे. याशिवाय कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही भारतीय संघाने केला. त्यानंतर टीम इंडियाने कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक पूर्ण करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
कानपूर कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळले. यानंतर टीम इंडिया जेव्हा बॅटिंगसाठी उतरली तेव्हा सलामी जोडी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अतिशय वेगवान फलंदाजी केली. या जोडीने अवघ्या 3 षटकांत 51 धावा कुटल्या. कसोटी क्रिकेटमधील हे आतापर्यंतचे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा पुन्हा एकदा तुफानी अवतार दिसला. त्याने 11 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. (Team India Fastest 100 Runs in Test)
रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही जैस्वालने शुबमन गिलसोबत वेगाने धावा केल्या. जैस्वालनेही सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. तो भारताकडून सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा सलामीवीर ठरला. यानंतर टीम इंडियाने अवघ्या 10.1 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील हे आतापर्यंतचे कोणत्याही संघाचे सर्वात जलद शतक ठरले आहे. भारतीय संघाने या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला. टीम इंडियाने यापूर्वी 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 षटकांत शतक पूर्ण केले होते. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंका संघ आहे, ज्यांनी 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध 13.1 षटकात शतकी खेळी साकारली होती. (Team India Fastest 100 Runs in Test)
10.1 षटके : भारत : विरुद्ध बांग्लादेश (कानपूर, 2024)
12.2 षटके : भारत : विरुद्ध वेस्ट इंडिज (पोर्ट ऑफ स्पेन, 2023)
13.1 षटके : श्रीलंका : विरुद्ध बांगलादेश (कोलंबो, 2001)
13.4 षटके : बांगलादेश : विरुद्ध वेस्ट इंडिज (मिरपूर, 2012)
13.4 षटके : इंग्लंड : विरुद्ध पाकिस्तान (कराची, 2022)
13.4 षटके : इंग्लंड : विरुद्ध पाकिस्तान (रावळपिंडी, 2022)
13.6 षटके : ऑस्ट्रेलिया : विरुद्ध भारत (पर्थ 2012)
टीम इंडियाने षटकारांचा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे. आता भारतीय संघ कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. भारतीय संघाने या वर्षात (2024) आतापर्यंत 90 हून अधिक षटकार मारले आहेत. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा आहे ज्यांनी 2022 मध्ये 89 षटकार मारले होते.