सर्वांचे लक्ष कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीकडे लागले आहे. Twitter
स्पोर्ट्स

गोलंदाजांचा कहर की धावांचा पाऊस? जाणून घ्या कानपूरची खेळपट्टी कशी असेल

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND v BAN 2nd Test : चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयात भारताला वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचीही साथ मिळाली. चेन्नईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या तर फिरकीपटू आर अश्विनने दुसऱ्या डावात 6 विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 9, तर फिरकीपटूंनी 11 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत आता सर्वांचे लक्ष कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीकडे लागले आहे.

दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीबाबत अनेक दिवसांपासून विविध अंदाज बांधले जात होते, मात्र आता ग्रीन पार्कच्या क्युरेटरने खेळपट्टीबाबत मोठा खुलासा केला आहे. कानपूरच्या खेळपट्टीच्या क्युरेटरने सांगितले की, दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टी अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की ती पहिल्या दोन सत्रांमध्ये वेगवान गोलंदाजांना आणि नंतर शेवटच्या तीन दिवसांत फिरकीपटूंना मदत करेल.

खेळपट्टी काळ्या मातीची असेल

पिच क्युरेटर शिवकुमार यांनी पीटीआयला सांगितले की, कानपूरची खेळपट्टीही चेन्नईसारखीच आहे. ग्रीन पार्कची खेळपट्टी बनवण्यासाठी काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे फिरकीपटूंना मदत होते. ती प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल. पहिल्या दोन सत्रात चेंडूला उसळी मिळेल. पहिले दोन दिवस फलंदाजीसाठी खूप चांगले असतील. त्यानंतर सामन्याच्या तिस-या दिवसापासून खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2021 मध्ये कानपूर येथे अखेरचा कसोटी सामना खेळला गेला होता. तो सामना अनिर्णित राहिला होता. त्या सामन्यात आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने एकूण 17 विकेट घेतल्या. त्याचवेळी वेगवान गोलंदाज उमेश यादवने 2 बळी घेतले होते. इशांत शर्माला दोन्ही डावात खातेही उघडता आले नव्हते.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सरफराज खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यश दयाला, आकाश दीप.

बांगलादेश संघ : महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास (यष्टीरक्षक), जेकर अली, मेहदी हसन मिराज, खालिद अहमद, हसन महमूद, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT