पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डबल धमाका केला. ब्रिस्बेन येथील गाबा येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने ७६ धावांत सहा बळी घेतले. बुमराह या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ( IND vs AUS 3rd Test Day 3 )
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या भक्कम भागीदारीदरम्यान बुमराहनेच भारताला सामन्यात पुनरागमन करण्यात यश मिळवले. त्याने पहिल्या सत्रात उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांना बाद करून ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. हेड आणि स्मिथ यांच्यात चौथ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली. बुमराहने स्मिथला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्यानंतर हेडला यष्टिरक्षक ऋषभ पंतने झेलबाद केले. IND vs AUS 3rd Test Day 3 )
गाबा कसोटीच्या तिसर्या दिवशी बुमराहचा भेदक मारा कायम राहिला. त्याने पंतकरवी मिचेल स्टार्कला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तो त्याचा सहावा बळी ठरला. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर भारतीय गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी बुमराहच्या नावावर नोंदली गेली आहे. त्याने इरापल्ली प्रसन्ना यांना पिछाडीवर टाकले आहे. जानेवारी 1968 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात प्रसन्ना यांनी 104 धावांत सहा बळी घेतले होते.
बुमराह ऑस्ट्रेलियन भूमीवर 50 कसोटी बळी पूर्ण करण्यातही यशस्वी ठरला. अशी कामगिरीकरणार्या गोलंदाजांमध्ये तो दुसर्या स्थानावर गेला आहे. उमेश यादवने ऑस्ट्रेलियन भूमीवर बुमराहपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. उमेशने 17 सामन्यांत 53 बळी घेतले आहेत तर बुमराहने केवळ 10 सामन्यांत 50 बळी पूर्ण केले आहेत. कपिलने ऑस्ट्रेलियात 51 विकेट्स घेतल्या होते. बुमराहने दोन विकेट घेत कपिलला या बाबतीत मागे टाकले आहे.