स्पोर्ट्स

IND vs AUS T20 : वर्चस्वाची लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरात रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार

सूर्यकुमारच्या फॉर्मवर फोकस, पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी महत्त्वाची स्पर्धा

रणजित गायकवाड

कॅनबेरा : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवार दि. 29 पासून येथे पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार असून, सर्वांच्या नजरा सूर्यकुमारच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता, ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल.

या दोन्ही दिग्गज संघांनी मागील 10 टी-20 सामन्यांपैकी प्रत्येकी आठ सामने जिंकले आहेत आणि प्रत्येकी एक सामना गमावला आहे. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला, तर ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला.

कर्णधाराचा फॉर्म चिंतेचा विषय

कर्णधाराचा प्रदीर्घ खराब फॉर्म चिंतेचा विषय असला, तरी भारतीय टी-20 संघ राष्ट्रीय स्तरावरील तीन संघांपैकी सर्वोत्तम ठरला आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासून सूर्यकुमारने आतापर्यंत 29 सामन्यांमध्ये 23 विजय मिळवून दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आक्रमकता आणि सूर्यकुमारचे नेतृत्व कौशल्य संघासाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत आणि आशिया चषकही जिंकला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारताच्या खऱ्या तयारीला ऑस्ट्रेलिया मालिकेपासून सुरुवात होत आहे आणि लय मिळवण्यासाठी संघाकडे 15 सामने आहेत. मात्र, या मालिकेच्या निकालाचा फार मोठा परिणाम होणार नाही, असे म्हटले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धचे पुढील 10 सामने घरच्या मैदानावर, म्हणजेच टी-20 विश्वचषकात मिळणाऱ्या संभाव्य परिस्थितीसारख्याच वातावरणात खेळले जातील.

मागील 3 वर्षांतील सूर्यकुमारचे योगदान

2023 मध्ये सूर्यकुमारने 18 डावांत जवळपास 156 च्या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या. यात 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर 2024 मध्ये त्याने 151 च्या स्ट्राईक रेटने 450 पेक्षा कमी धावा जमवल्या. या वर्षात मात्र त्याला 10 डावांत केवळ 11 च्या सरासरीने 100 धावा करता आल्या आहेत. यामध्ये एक गोष्ट अपवाद म्हणून समोर येते ती म्हणजे, त्याचा 105 पेक्षा जास्त असलेला स्ट्राईक रेट. यावरून असे दिसून येते की, धावा करण्यासाठी संघर्ष करत असतानाही त्याने आपला आक्रमक पवित्रा पूर्णपणे सोडलेला नाही.

गोलंदाजी आणि इतर आव्हाने

आशिया चषकात देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या अभिषेक शर्मासारख्या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरील अतिरिक्त उसळीचा सामना करणे एक नवीन आव्हान असेल. त्यामुळे कर्णधाराचे योगदान अधिक महत्त्वाचे ठरते.

सूर्यकुमारची समस्या म्हणजे त्याच्याकडे असलेल्या फटक्यांची मर्यादित श्रेणी आणि चेंडूची गती व उसळी वापरून नेहमी स्क्वेअरच्या मागे खेळण्याचा प्रयत्न करणे. मनुका ओव्हलच्या खेळपट्टीवरील उसळी त्याला फायदा मिळवून देण्याची संधी देते; पण जोश हेझलवूडचा पेचात टाकणारा मारा आणि कसोटी सामन्यांप्रमाणे ऑफ-स्टंपच्या बाहेरील टप्प्यावर टाकलेले चेंडू त्याच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

दोन्ही संघ :

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन बॉट, झेवियर बार्टलेट, माहली बियर्डमन, टिम डेव्हिड, बेन ड्वॉरशियस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुन्हेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉईनिस.

  • सामना सुरू होण्याची वेळ : दुपारी 1.45 वा.

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌‍ नेटवर्क

  • लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार

गोलंदाजीत बुमराहकडून मोठ्या अपेक्षा

गोलंदाजीमध्ये, जसप्रीत बुमराहची उपस्थिती आणि वरुण चक्रवर्तीची चतुर गोलंदाजी हे महत्त्वाचे घटक ठरतील, जर भारतीय फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली, तर बुमराह आणि अर्शदीपच्या सुरुवातीच्या षटकांसोबतच वरुण, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची 12 षटके ट्रॅव्हिस हेड आणि धोकादायक मिचेल मार्शविरुद्ध अत्यंत महत्त्वाची ठरतील.

सूर्यकुमारसाठी बॅटने उत्तर देण्याची वेळ

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमारला निःसंदिग्धपणे पाठिंबा दिला आहे आणि त्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता करण्याची गरज नाही, असे म्हटले असले, तरी आता कर्णधाराने आपल्या बॅटनेच उत्तर देण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT