स्पोर्ट्स

Women's World Cup Semifinal : टीम इंडियाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

Pratika Rawal Injured : महिला एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य सामना ३० ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

रणजित गायकवाड

ind vs aus semifinal women world cup injured pratika rawal ruled out

भारतीय महिला क्रिकेट संघाला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली सलामीवीर फलंदाज प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाली आहे. क्रिकबझने याबाबत वृत्त दिले आहे.

दुखापतीचे कारण

बांगलादेशविरुद्ध रविवारी २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना प्रतीका रावलला गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली. पहिल्या डावादरम्यान चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. नंतर हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

प्रतीका रावलने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. त्या सामन्यात तिने उत्कृष्ट १२२ धावांची धमाकेदार खेळी केली होती. या विजयामुळेच भारताने उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले होते.

उपांत्य फेरीचा सामना

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतीय संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे हा महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. साखळी फेरीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहून उपांत्य फेरीत पोहोचला. तर ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले होते. यादरम्यान, भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव देखील पत्करावा लागला होता, त्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य सामन्यात बाजी मारण्यासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.

आता सलामीला कोण?

प्रतीका रावल विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाल्याने आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, उपांत्य फेरीत स्मृती मानधनासोबत सलामीला कोण उतरेल? बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अमनजोत कौरने सलामी दिली होती. मात्र, ती मुख्यत: मधल्या फळीत खेळते त्यामुळे नॉकआऊट सामन्यात संघ व्यवस्थापन तिला सलामीला पुन्हा आजमावतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तीन प्रमुख दावेदार

हरलीन देओल : उपांत्य फेरीत स्मृती मानधनासोबत हरलीन देओलला सलामीसाठी पाठवले जाण्याची शक्यता अधिक आहे. हरलीन सामान्यतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करते, पण ती अनेकवेळा पॉवरप्लेमध्ये फलंदाजीसाठी आली आहे. त्यामुळे तिला नवीन चेंडूचा सामना करण्याचा चांगला अनुभव आहे. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजनेही हरलीनला सलामीला पाठवणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.

उमा क्षेत्री : यष्टिरक्षक-फलंदाज उमा क्षेत्री हा एक पर्याय आहे, पण नियमित यष्टिरक्षक ऋचा घोष तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर असल्याने तिला उपांत्य सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ऋचाला बांगलादेशविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे उमाला संधी मिळाली होती.

दीप्ती शर्मा : डावखुरी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीदेखील सलामी फलंदाज म्हणून एक सक्षम दावेदार आहे. तिने यापूर्वीही भारतीय संघासाठी महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीची जबाबदारी सांभाळली आहे. दीप्तीची महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या १८८ आहे. ही मॅरेथॉन खेळी तिने आयर्लंडविरुद्ध सलामीला खेळतानाच साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT