पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रवाना झालेल्या भारतीय क्रिकेट संघाला प्रवासात बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. विमानाला झालेल्या अनेक तासांच्या विलंबानंतर भारतीय संघ गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पर्थमध्ये दाखल झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवार, दि. 19 रोजी मालिकेतील पहिला वन डे सामना खेळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंनी बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावरून प्रवासाला सुरुवात केली, मात्र दिल्लीतील विमानाला जवळपास चार तास उशीर झाला. या विलंबामुळे संघाला सिंगापूरमधील पुढील विमान प्रवासाचे वेळापत्रकही बदलावे लागले. यामुळे संपूर्ण प्रवासास अनपेक्षित विलंब झाला.
ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या खेळाडूंच्या पहिल्या तुकडीत विराट कोहली, रोहित शर्मा, कर्णधार शुभमन गिल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. या तुकडीसोबत संघाचा सहायक कर्मचारी वर्गही दाखल झाला असून, उर्वरित सदस्य संघाच्या पहिल्या सराव सत्रापूर्वी सामील होतील.
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी खेळाडू काही काळ येथील वातावरणाशी जुळवून घेतील, अशी अपेक्षा आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वन डे सामन्यांनंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. जगातील दोन अव्वल क्रिकेट संघांतील या लढतीमुळे रोमांचक क्रिकेट पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
परदेशात आपली प्रभावी कामगिरी कायम राखण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याने, हा दौरा संघाच्या क्षमतेची आणि मानसिकतेची एक महत्त्वपूर्ण कसोटी मानला जात आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, मोठ्या विश्रांतीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बहुप्रतीक्षित पुनरागमन. हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू संघात परतल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही दिग्गजांच्या उपस्थितीत शुभमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे. हे रंजक समीकरण या हाय-प्रोफाईल दौऱ्याची उत्सुकता आणखी वाढवणारे ठरते आहे.