चेन्नई; वृत्तसंस्था : वन-डे विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार के. एल. राहुलला मिळाला असला, तरी 'बीसीसीआय'ने विराट कोहलीला सुवर्णपदक देऊन खूश केले. हे सुवर्णपदक त्याला सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून मिळाले.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा समावेश असलेल्या अनेक खेळाडूंनी शानदार क्षेत्ररक्षण केले. या तिघांमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या मते कोहलीची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. अशा स्थितीत त्यांनी विराटला हे चमकणारे नवे कोरे पदक सुपूर्द केले. कोहलीला पदक मिळताच तो ते घेण्यासाठी उत्सुकतेने पुढे सरसावला. यानंतर विराटने हात वर करून आनंद साजरा केला आणि मग चॅम्पियनप्रमाणे पदक दातात पकडत पोझ दिली. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने 'बीसीसीआय'च्या वतीने कोहलीला विशेष गोल्ड मेडल देत पुरस्कार प्रदान केला.