पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीच्या दुसर्या दिवशीही ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व कायम राहिले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांची कामगिरी खराब राहिली. संघाने 128 धावांत पाच विकेट गमावल्या. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 29 धावांनी पिछाडीवर आहे. ऋषभ पंत २८ धावा आणि नितीश रेड्डी १५ धावांसह खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन तर मिचेल स्टार्कने एक विकेट घेत कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
डे-नाईट कसोटीतील भारताचा पहिला डाव १८० धावांवर संपुष्टात आला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडने 140 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३३७ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने शनिवारी एका विकेटवर 86 धावांवर खेळ सुरू केला आणि शेवटच्या नऊ विकेट गमावून 251 धावा केल्या. सलामीच्या सत्रात संघाने मॅकस्विनी (39), स्टीव्ह स्मिथ (2) आणि मार्नस लॅबुशेन यांच्या रूपाने तीन विकेट गमावल्या. लॅबुशेनने 64 धावा केल्या. मॅकस्विनी आणि स्मिथला बुमराहने बाद केले, तर लॅबुशेनला नितीश रेड्डीने बाद केले.
दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी खूपच खराब झाली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी अपयशी ठरली आणि संघाला दमदार सुरुवात करू शकली नाही. एके राहुल याला कमिन्सने सात धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर बोलंडने यशस्वी (24) आणि विराट कोहलीला (11) बाद करून भारताला दुहेरी धक्का दिला. शुभमन गिललाही चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही आणि तो २८ धावांवर स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसऱ्या डावातही कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम राहिला, तो कमिन्सच्या चेंडूवर केवळ सहा धावावर क्लीन बोल्ड झाला. ॲडलेड कसोटीतील दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 128 धावांत पाच विकेट गमावल्या. ऋषभ पंत २८ धावा आणि नितीश रेड्डी १५ धावांसह खेळत आहेत. आता तिसर्या दिवशी या दोघांच्या खेळीवर भारतीय संघातील पुढील वाटचाल अवलंबून आहे.